विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगस्त्यमलें अथवा अगस्त्यकूटम - मद्रास इलाख्यांत त्रावणकोर संस्थानांत नेय्या तिनकर तालुक्यांतील पश्चिम घाटांत हें एक कोनाकृत गिरिशृंग. उत्तर अक्षांश ८०० ३७०, व पूर्व रेखांश ७७० १५० यावर आहे. त्या प्रांतात त्याला सह्य पर्वत म्हणतात. त्याची उंची ६२०० फूट आहे. त्रावणकोर व तिनेवेली जिल्हा यांच्या सीमेवर हा पर्वत आहे. तार्यांचे वेध घेण्यास हें ठिकाण फार सोयीचें आहे. ताम्रपर्णी व नेंयार नद्यांचें हे उगमस्थान आहे. दक्षिण हिंदुस्थानांत आर्य संस्कृतीचा फैलाव करणारे महान अगस्त्य ॠषि या पर्वतावर योगनिद्रेंत अजून राहतात, असा लोकांचा समज आहे.