विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अदिलाबाद शहर - यालाच दुसरे नांव एदलाबाद. हैद्राबाद संस्थानमधील त्याच नांवाचा तालुका व जिल्हा यांचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश १९ ४’व पूर्व रेखांश ७८ ३३’.  इ. स. १९२१ मध्यें लोकसंख्या ८२७१ होती. येथें पहिला वर्ग तालुकदार, पोलिस सुपरिन्टेन्डेंट, जकात इन्स्पेक्टर व जंगल खात्याचा दरोगा यांच्या कचेर्‍या असून एक दवाखाना, टपालगृह व शालागृह हीं आहेत. येथें एक हिंदु मंदिर असून तेथें दरवर्षी जत्रा भरते. ही एक धान्याची पेठ आहे.  ( इं. गॅ. ५ ).