विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडोवा - अबिसीनियामधील टायग्रे प्रांताची राजधानी. हें शहर गोंडारच्या ईशान्येस १४५ मैलांवर आहे. अडोवा हें धनधान्यादिकांनीं समृध्द अशा जिल्ह्यांत वसलें आहे. मसावापासून मध्य अविसीनियापर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावर असल्यामुळें हें अरबस्तान व सुडानमधील व्यापाऱ्यांचें जमण्याचें स्थान आहे. १८८७-९६ यांच्या दरम्यानच्या इटाली व अबिसीनिया यांच्यामधील लढायांत अडोवाचें फार नुकसान झालें. तथापि येथील धर्मस्थानें मात्र युध्दाग्नींतून बचावलीं. १८९६ सालीं अविसीनियनांनीं इटालिअन सैन्याचा अ‍ॅडोवाचे लढाईंत पूर्ण मोड केला.