विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अधिकमास - यास धोंडा, मलमास किंवा पुरुषोत्तममास असेंहि म्हणतात. बारा वर्षांत चैत्र, जेष्ठ व श्रावण हे अधिक होतात. अठरा वर्षांनीं आषाढ अधिक येतो. चोवीस वर्षांनीं भाद्रपद अधिक येतो. १४१ वर्षांनीं अधिक आश्विनमास येतो. व ७०० वर्षांनीं अधिक कार्तिकमास येतो. आश्वीन व कार्तीक हे दोन महिने अधिक आले तरी त्यांस अधिक म्हणत नसून भाद्रपदापर्यंत मात्र अधिक म्हणतात. ज्या वर्षी अधिक आश्विन पडतो त्या वर्षी पौषक्षय होतो. व त्या वेळीं दोनप्रहर पर्यंत मार्गशीर्ष व दोन प्रहरानंतर पौष होतो. आणि याप्रमाणें त्या दोन्ही महिन्यांचीं धर्मकर्मेहि एकाच महिन्यांत करितात. या जोडमासाचें नांव संसर्प आहे. कार्तिकापुढील चार महिने अधिक होत नाहींत, व अश्विनाचे पूर्वी क्षयमास होत नाहींत.

पू र्व इ ति हा स - चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठीं आपल्याकडे सरासरी बत्तीस तेहेतीस चांद्रमासांनीं चांद्र वर्षांत जो एक महिना अधिक घालावा लागतो त्यास अधिमास किंवा अधिकमास असें म्हणतात. चांद्र सौर वर्षांचा प्रचार आपल्याकडे वैदिक कालापासून आहे व बारा महिन्यांचें एक वर्ष ही कालगणना देखील वैदिक कालाइतकीच प्राचीन आहे. परंतु सौरवर्षाचे सुमारें ३६५- दिवस असतां बारा चांद्र महिन्यांचे सारे ३५४ च दिवस होतात. यामुळें एका वर्षाचे फक्त बारा चांद्रमासच मानले तर, पहिला म्हणून जो मास मानला असेल तो प्रथम उन्हाळयांत असेल तर पुढें हिंवाळयांत, पुढें पावसाळयांत असा उत्तरोत्तर मागें पडूं लागेल; व हल्लींच्या मुसुलमानांच्या मोहरमाप्रमाणें सुमारें ३३ वर्षांत त्याचें सर्व ऋतूंतून भ्रमण होईल. याचा दुसरा परिणाम असा होईल कीं ३३ सौरवर्षांत चांद्रवर्षांची संख्या सुमारें एक वर्षानें अधिक वाढेल. अर्थात् प्रत्येक चांद्रवर्षांत सुमारें अकरा बारा दिवस किंवा बत्तीसतेहेतीस चांद्रमहिन्यांनीं एक चांद्रमहिना अधिक धरल्याशिवाय चांद्र व सौर वर्षांचा मेळ बसणें शक्य नाहीं. ब्राह्मणें व संहिता यांत यज्ञ व संवस्तर हे पर्यायवाचक शब्द आहेत असें दाखविणारीं अनेक वचनें (ऐ० ब्रा० २. १७; ४.२२. शत० ब्रा० ११.११.११. व २.७.१. तै० सं० २.५.६.३; ७.५.७.४; ७.२.१०.३.) असल्यामुळें, कै. लो. टिळकांच्या मतें यज्ञ ही संवस्तराचीच एक प्रतिमा होती व तो त्याप्रमाणें बारा चांद्रमहिन्यांत संपूर्णहि होत असे. परंतु नवीन यज्ञाची सुरुवात संवत्सरारंभीं व्हावयाची असल्याकारणानें अथर्ववेद ४.११.११ मध्यें यज्ञदेवता प्रजापतिं ही उरलेले १२ दिवस नवीन वर्षांच्या यज्ञाची तयारी करण्यांत घालविते असें म्हटलें आहे. सर्व वर्षभर श्रम केल्यामुळें ऋभू (म्हणजे ऋतू) हे ह्या अवधींत आपली गति मंद करून सूर्याचा पाहुणचार घेत बसतात असें जे ऋग्वेदांत (४.३३.७) वचन आहे तें देखील ह्या अधिक दिवसांसच अनुलक्षून आहे. यावरून ऋग्वेदकालीं केव्हां तरी चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्याकरितां प्रत्येक चांद्रवर्षांत बारा दिवस अधिक धरण्याची वहिवाट असावी असें अनुमान निघतें (Orion 1916 Ed.p.15.). या अधिक दिवसांसंबंधीं ऋग्वेद १.२५.८ मध्यें आणखी जो एक उल्लेख आला आहे तेथें संदर्भावरून अधिक मास असा अर्थ विवक्षित दिसतो. तैत्तिरीय संहितेंत १.४.१४ मध्यें अधिक मासाला संसर्प असें नांव दिलें असून पुन्हां ५.६.७ मध्यें तेरा मासांचा उल्लेख केला आहे. वाजसनेयी संहितेंत अधिक मासासाठीं अंहसस्पति (७.३०) व मलिम्लुच (२२.३०) अशीं नांवें योजिलीं आहेत. यांतील दुसर्‍या शब्दावरूनच हल्लीं अधिकमासासाठीं वापरण्यांत येणारा मलमास हा शब्द सिद्ध झाला आहे. अधिकमासाच्या अपवित्रतेचा ऐतरेय ब्राह्मणांतहि उल्लेख सांपडतो. कारण त्यांत ३.१ मध्यें तेराव्या महिन्यास निंद्य असें म्हटलें आहे. संसर्प व अहंसस्पति हे दोन शब्द क्षय मास येतो त्या वर्षी जे दोन अधिक मास येतात त्यांच्यासाठीं उपयोजिले जातात असें मुहूर्त चिंतामणिकारानें म्हटलें आहे (प्रकरण १ श्लोक ४७ पहा). यांपैकीं क्षयमासापूर्वी येणारा अधिक मास तो संसर्प व नंतर येणारा तो अहंसस्पति. ज्या वेदांत अधिकमासाचा उल्लेख आहे त्यांतील कांहीं भाग ख्रि० पू० १५०० पूर्वी तयार झाले होते असें युरोपीय पंडित म्हणतात. परंतु कै. शं० बा० दीक्षित यांच्या मतें अधिकमास घालण्याची पद्धति शकपूर्व ५००० वर्षांपासूनच आपल्या देशांत चालू असावी.

अ धि क मा स ठ र वि ण्या ची प्रा ची न व अ र्वा ची न री त :- ज्या नक्षत्रीं चंद्र पूर्ण होतो त्या नक्षत्राचें नांव महिन्यास देण्याची आपल्या देशांत प्राचीन काळीं वहिवाट असल्यामुळें, कोणत्या नक्षत्रांवर चंद्र एकामागून एक दोन महिने पूर्ण होतो किंवा कोणत्या नक्षत्रांवर तो मुळींच पूर्ण होत नाहीं तें पाहून आरंभीं अधिकमास क्षयमास धरीत असावे असें प्रथमदर्शनीं वाटतें. परंतु कृत्तिकांपासून दोन दोन नक्षत्रांवर चंद्र पूर्ण झाला म्हणजे त्या महिन्यास कार्तिकादि नांवें द्यावीं व फाल्गुन, भाद्रपद, आश्विन हे महिने तीन तीन नक्षत्रांचे धरावे या नियमानें अधिकमास व क्षयमास वारंवार येतात. कै० शं. बा. दीक्षित यांच्या मतें चंद्राच्या गतीचें सूक्ष्म मान समजण्यापूर्वी कांहीं काल ही पद्धति स्थूल मानानें म्हणजे फारसे अधिकमास क्षयमास न आणतां चालली असावी (Twelve year cycle, by S. B. Dixit, Indian Antiquary, January 1888.). भारतीय युद्धकालीं पांच वर्षांचें एक युग कल्पून त्यांत दोन महिने म्हणजे एक संबंध ऋतु एकाच वेळीं अधिक घालण्याचा संप्रदाय असावा असें रा. रा. चिं. वि. वैद्य यांनीं एके ठिकाणीं म्हटलें आहे. वेदांग ज्योतिषांत चांद्रमान बरेंच सूक्ष्म आहे. वेदांग तिषपद्धतीनें ३० महिन्यांत एक अधिकमास होतो. त्यावेळींहि ५ वर्षांचें एक युगमानीत असून त्यांत तिसर्‍या वर्षी आषाढ व श्रावण यांमध्यें एक अधिकमास व पांचव्या वर्षी पौषानंतर  दुसरा अधिकमास घालीत. परंतु हाहि नियम सूक्ष्म नसल्यामुळें प्रचारांतून गेला असावा. पितामहसिद्धांतांत ३२ महिन्यांनीं अधिकमास घालण्याची पद्धति आहे. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांत इत्यादि सूक्ष्म सिद्धांत झाल्यावर अधिमास सूक्ष्म गणितानें येऊं लागला. ज्या चांद्रमासांत मेष संक्रमण होईल तो चैत्र मानून पुढील मासांस वृषभदि संक्रांतीवरून वैशाखादि नांवें अनुक्रमें द्यावीं व ज्यांत स्पष्ट संक्रमण मुळींच येणार नाहीं तो अधिक मास समजावा असा हल्लीं मासनामासंबंधीं सामान्य नियम आहे. परंतु याविषयीं ज्या दोन परिभाषा आढळतात त्यांप्रमाणें अधिकमासास अगोदरच्या किंवा नंतरच्या यांतून कोणत्याहि मासाचें नांव दिलें जाऊं शकतें. या बाबतींत माधवाचार्य ( विद्यारण्य ) कृत कालमाधव ग्रंथांत ब्रह्मसिद्धांतांतलें म्हणून
समजलें जाणारें '' मेषादिस्थे सरितरि यो यो मास: प्रपूर्यते चांद्र :। चैत्राद्य:स ज्ञेय: पूर्तिद्वित्वेऽधिमासोंऽत्य:॥ असें एक वचन आहे. दुसरें एक वचन व्यासांचें म्हणून कालतत्त्वविवे-चन नांवाच्या धर्मशास्त्र ग्रंथांत '' मीनादिस्थो रविर्येषामारंभ-प्रथमे क्षणे । भवेत्तेऽब्दे चांद्रमासाश्चैत्राद्या द्वादश स्मृता: ॥'' याप्रमाणें आहे. यांपैकीं पहिला ग्रंथ शक १३०० च्या सुमाराचा व दुसरा १५४२ चा आहे. दोन्हीहि वचनांप्रमाणें इतर मासांस एकच संज्ञा येतात. परंतु अधिकमासास मात्र पहिल्या वचनान्वयें पूर्व मासाची व दुसऱ्या वचनान्वयें नंतरच्या मासाची संज्ञा मिळते. सांप्रत दुसरी पद्धति सर्वत्र चालू आहे आणि भास्कराचार्यांच्या वेळीं व खुद्द कालमाधव ग्रंथकालीं देखील हीच पद्धति चालू होती. तथापि पहिली परिभाषा कांहीं काळ चालत होती असें दाखविणारा शककालाच्या सहाव्या शतकांतील चौथा धरसेनाचा एक ताम्रपटलेख खेडा येथें मिळाला आहे.  

म ध्य म सं क्र म णा चे व स्प ष्ट सं क्र म णा चे अ धि क मा स :- सांप्रत अधिकमास किंवा क्षयमास मानणें तो स्पष्ट संक्रमणावरूनचे मानतात. परंतु मध्यम मानानें अधिकमास मानण्याची पद्धति एके कालीं प्रचारांत होती असें दिसून येतें. मध्यम गति नेहमीं सारखी असते. त्या गतीनें ३२ चांद्रमास, १६ तिथी, ३ घटकां आणि ५५ पळें इतक्या काळानें म्हणजें कधीं ३२ महिन्यांनीं व कधीं ३३ महिन्यांनीं अधिकमास पडतो. तसेंच या मानानें सौरमासाचें मान ३० दिवस, २६ घटिका व १८ पळें आणि चांद्रमासाचें मान २९ दिवस, ३१ घटिका व ५० पळें आहे. यामुळें एका चांद्रमासांत दोन संक्रांती कधींच व्हावयाच्या नाहींत. व त्यामुळें क्षयमास कधीं व्हाव-याचा नाहीं. सूर्याची स्पष्ट गति नेहमीं सारखी नसते. यामुळें स्पष्ट सौरमास मजास्त मानाचे होतात, आणि एका चांद्रमासांत कधीं दोन संक्रमणें होऊं शकतात. यामुळें क्षयमास होतो. क्षयमास येतो तेव्हां एका वर्षांत दोन अधिकमास येतात. स्पष्ट मानानें दोन अधिक मासांमध्यें लघुतम अंतर २८ महिने किंवा क्वचित् २७ महिने आणि महत्तम अंतर ३५ महिने असतें. वर जो चौथ्या धरसेनाचा ताम्रपट सांगितला आहे त्यावरून शके ५७० मध्यें गुजराथेंत मध्यम मानानें व मेषादिस्थे या परिभाषेनें अधिकमास मानीत असत असें दिसतें. ज्यातिषदर्पण नामक मुहूर्तग्रंथांत श्रीपतीच्या ( शके ९६१ ) सिद्धांतशेखर ग्रंथांतला एक उतारा आहे त्यावरूनहि मध्यम मानानें अधिक मास मानण्याचा पूर्वी प्रचार होता ही गोष्ट स्पष्ट दिसते. भास्कराचार्यानें क्षयमास सांगितला आहे. मध्यममानानें क्षयमास मुळींच येत नसल्यामुळें त्याच्या वेळीं ती पद्धति प्रचारांतून गेली असली पाहिजे. शक वर्ष १००० च्या सुमारास मध्यम मानानें क्षयमास धरण्याची पद्धति पूर्णपणें प्रचारांतून गेली असावी असें कै. शं. बा. दीक्षित यांचें मत आहे.

कै. शं. बा. दीक्षित व रॉबर्ट सेवेल या दोघांनीं इ. स. १८९६ त छापून प्रसिध्द केलेल्या इंडियन कॅलेंडर नांवाच्या पुस्तकांत इ. स. ३०० पासून १९०० पर्यंत स्पष्टमानाचे अधिक मास व इ. स. ३०० पासून ११०० पर्यंत मध्यम मानाचे अधिक मास कोणकोणते होते ते दिले आहेत.

सांप्रत नर्मदोत्तर भागीं पूर्णिमांत मास आहेत. वराहमिहिराच्या काळीं ज्या पूर्णिमांत मासांत मेषसंक्रमण होईल तो चैत्र अशी पद्धति होती. परंतु आतां पूर्णिमांत मानांतहि माससंज्ञा व अधिक मास अमांतमानानेंच मानतात. दोहोंकडील शुक्लपक्ष नेहमीं एकाच संज्ञेच्या मासांतले असता आणि दक्षिणेकडील कृष्णपक्ष ज्या संज्ञेच्या मासाचा असेल त्याच्यापुढील संज्ञेच्या मासाचा उत्तरेकडे तोच कृष्णपक्ष असतो.

पू र्णि मां त व अ मां त मा नें :- अमांतमानानें जेव्हां अधिक महिना येतो, त्या सुमारास वास्तव पूर्णिमांत मान घेतलें तर मुळीं अधिक महिनाच नसतो. कारण अमांतमानाचा अधिक महिना येतो त्यावेळीं एक संक्रांति अधिक मासापूर्वीच्या कृष्णपक्षाच्या अखेरीस होते व दुसरी अधिक मासानंतरच्या शुक्लपक्षाच्या आरंभी येते. पूर्णिमांत मानानें अधिकमासाचा शुक्लपक्ष मागील महिन्याचा दुसरा पक्ष होतो व कृष्णपक्ष पुढील महिन्याचा पहिला पक्ष होतो. अशा रीतीनें त्यावेळीं दोन्हीहि पूर्णिमांत महिन्यांत संक्रमणें होत असल्याकारणानें त्यांपैकीं कोणताच वस्तुत: अधिक होऊं शकत नाहीं. अमांतमानाची माससंज्ञा व अधिकमास पूर्णिमांत मानावर लादलीं गेल्यामुळें पूर्णिमांत मानांत अधिकमासास नांव देण्यासंबंधींहि बरीच अव्यवस्था होते. समजा कीं अमांतमानाप्रमाणें वैशाख महिना अधिक आला आहे. यावेळीं पूर्णिमांतमानाच्या वैशाख महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे पहिला पंधरवडा अगोदरच झालेला असतो. अमांतमानास अनुसरून पूर्णिमांतमानांत अधिक मासास वैशाख असें नांव दिलें, तर शुद्ध वैशाख महिन्याचा कृष्णपक्ष अगोदर, त्यानंतर अधिक वैशाख व त्याच्यानंतर शुद्ध वैशाखाचा कृष्णपक्ष असा विचित्र क्रम येईल. ही अव्यवस्था टाळण्याकरितां अशा प्रसंगीं पहिल्या व दुसर्‍या पक्षास मिळून पहिला वैशाख आणि तिसर्‍या व चौथ्यापक्षास मिळून दुसरा वैशाख अशीं नावें देतात.

अ धि क मा स म हा त्म्य :- बृहन्नारदीय पुराण व पद्यपुराण यांमध्यें रुषोत्तमामसमहात्म्य व मलमासमहात्म्य या नांवाखालीं अधिकमासाचें महात्म्य वर्णन केलें आहे. पहिल्याचे एकतीस अध्याय असून दुसर्‍याचे एकोणतीस अध्याय आहेत. अर्थांत् हीं महात्म्यें भिक्षुकी थाटाचीं असून त्यांत अधिक मासांत कोणतीं व्रतें करावीं, कोणतीं दानें द्यावीं, व्रताचें उद्यापन वगैरे कसें करावें व त्या व्रतांपासून कोणती फलप्राप्ति होते इत्यादि ठराविक पद्धतीचें विेवेचन आहे व अधिकमास-महात्म्यश्रवणाची फलश्रुतिहि वगळलेली नाहीं. विशेषत: मलमासमहात्म्यांत व्रतें व दानें यांस प्रमुख स्थान दिलें आहे. यापैकीं नमुन्याकरितां म्हणून बृहन्नारदीय पुराणांतील पुरुषोत्तम महात्म्यांत काय सांगितलें आहे तें थोडया शब्दांत येथें देतों. हें महात्म्य कोणापासून कोणाला कळलें व तें कसकसें पुढें चालत आलें याची परंपरा देऊन सूत शौनकादिकांस कथन करीत आहे असा उपोद्घात केला आहे (अ. १). शुकागमन हें नांव पहिल्या अध्यायास दिलें आहे. पुरुषोत्तम मासासंबंधीं नारायण व नारद यांचा पूर्वी संवाद झाल्याचें सांगितलें आहे (अ. २). अधिकमास हा व्रतवैकल्य करण्यासअप्रशस्त समजला गेला असल्यामुळें त्याच्या ठिकाणचा कमीपणा जावा म्हणून तो वैकुंठास विष्णूची प्रार्थना करण्याकरितां गेल्याचें वर्णन आहे (अ. ३) व त्यानें केलेली विष्णूची प्रार्थना दिली आहे (अ. ४). विष्णु अधिकमासासह गोलोकांत गेल्याचें वर्णन आहे व विष्णूनें अधिकमासाकरितां श्रीकृष्णाची केलेली प्रार्थना दिली आहे (अ. ५). पुरुषोत्तम मासास श्रीकृष्णाकडून वरप्राप्ति व ऐश्वर्यप्राप्ति झाली हें सांगितलें आहे (अ. ६). पुढें श्रीकृष्ण पांडवांस त्यांच्या दु:खाचें कारण सांगतो कीं, द्रौपदी ही पूर्वजन्मीं मेधावी नांवाच्या ब्राह्मणाची मुलगी असून आईबाप वारल्यावर पोरकी झाली तेव्हां अतिशय शोक करिती झाली. अशा स्थितींत तिला दुर्वासाचें दर्शन झालें. त्यानें तीस पुरुषोत्तम मासाचें महत्त्व वर्णन करून सांगितलें परंतु तिनें इतर महिन्यांपेक्षां पुरुषोत्तम मासासच अधिक कां मानावें असा प्रश्न केला असतां दुर्वासास क्रोध आला. परंतु त्यानें तिला शाप न देतां तिला सांगितलें कीं ज्या अर्थी तूं पुरुषोत्तममासाचा अनादर केला आहेस त्या अर्थी तुला पुढें दु:ख होईल. तेव्हां तिनें शिवाराधना करण्याचा निश्चय केला. पुढें शिव प्रसन्न होऊन तिला वर माग असें म्हणाला असतां तिनें पति द्यावा अशी विनंति पांच वेळां पति शब्द उच्चारून केली म्हणून तिला पुढील जन्मीं पांच पति होतील असा शंकराने वर दिला. पुढील जन्मांत ती यज्ञकुंडांतून द्रौपदीरूपानें जन्म पावली, व पांडवांची पत्नी झाली. तिनें पुरुषोत्तम मासाचा अनादर केल्यामुळें तिला दु:शासनापासून पीडा व वनवास प्राप्त झाला. असें श्रीकृष्णानें सांगून युधिष्ठिरास पुरुषोत्तम व्रतोपदेश केला (अ. ७ ते १२). येथून पुढें दृढधन्वा नांवाच्या राजाच्या कथेला आरंभ होतो. तो एकदां शिकारीस गेला असतां अरण्यांत एका शुक्राच्या तोंडून एक श्लोक ऐकल्यामुळें त्याला हुरहुर लागते. इतक्यांत वाल्मीकिमुनि येऊन त्याच्या चिंतेचें कारण समजावून देण्याकरितां त्यास त्याच्या पूर्व जन्मींची कथा सांगतात. तो पूर्व जन्मीं द्रविड देशांत सुदेव नांवाचा ब्राह्मण होता. त्यानें पुत्रप्राप्तीकरितां तपाचरण केलें असतां त्याच्या नशिबीं नव्हता तरी गरुडाच्या विनतीवरून विष्णूनें त्याला एक पुत्र दिला. पण तो बाराव्या वर्षी पाण्यांत बुडून मरेल असें देवलानें सुदैवास
सांगितलें. त्याप्रमाणें तो मरण पावला त्यावेळीं त्याच्या आई-बापांनी फार शोक केला. तेव्हां श्रीहरीनें त्या पुत्रास जिवंत करून दीर्घायु केलें; व त्याला पूर्व कथा सांगितली कीं, पूर्वी धनु नांवाचा एक ऋषि होता. त्यानें अमर पुत्र व्हावा या इच्छेनें तपाचरण केलें तेव्हां त्यास अमर पुत्र नव्हे पण समोरील पर्वत जाग्यावर असेपर्यंत जगणारा पुत्र मिळाला. पुढें त्या पुत्रानें महिष नांवाच्या ऋषीचा शालिग्राम विहीरींत टाकला तेव्हां त्यानें त्यास ' तूं आज मरशील ' असा शाप दिला पण तो मेला  नाहीं तेव्हां त्याच्या मृत्यूचें कारण ओळखून हजारों महिष उत्पन्न करून त्यानें तो पर्वत नाहींसा केला. तेव्हां तो मुनिपुत्र तात्काल मरण पावला. नंतर धनुऋषीनें पुत्राच्या कलेवरासह चिता प्रवेश केला. याप्रमाणें पूर्वकथा सांगून पुढील जन्मीं तूं दृढधन्वा नांवाचा राजा होशील व जेव्हां तुला विष्णूचें विस्मरण होईल तेव्हां हा पुत्र शुकरूपानें तुला स्मरण देईल व तुला वैराग्य प्राप्त होईल असें श्रीहरीनें त्या सुदेवास सांगितलें (अ. १३ तें. १९) नंतर पुरुषोत्तम मासमहात्म्य वर्णन करून त्यामुळें तुला पुत्र प्राप्ति झाली असें सांगितलें. नंतर त्याला व्रताचें आहिक (अ. २०) पूजनविधि ( अ. २१) व व्रतनियम (अ. २२) कथन केले. तेवीस व चोविसाव्या अध्यायांत पुरुषोत्तम मासांत दीपदान केलें असतां काय फल मिळतें हें दाख्विण्याकरितां चित्रबाहु राजाला अगस्ति ऋषीनें त्याच्या पूर्वजन्मींचें वृत्त कथन केल्याचें वर्णन आहे त्यांत तो चमत्कार पुरांत मणिग्रीव नांवाचा नास्तिक दुष्ट व जीवहिंसापरायण असा शूद्र असतां त्यानें उग्रदेव नांवाच्या ब्राह्मणाची एकदां सेवा केली व त्यानें
त्यास पुरुषोत्तम मासांत दीपदान करावयास सांगितलें व त्याप्रमाणें त्यानें केल्यामुळें तो पुढील जन्मीं चित्रबाहु राजा म्हणून जन्मास आला अशी कथा आहे. (अ. २३-२४). पंचविसाव्या अध्यायांत वाल्मीकि मुनीनें दृढधन्वा राजास उद्यापनविधि सांगितला आहे. सविसाव्या अध्यायांत गृहीत नियमत्यागाबद्दल विवेचन केलें आहे. याप्रमाणें वाल्मीकिनें कथा सांगितल्यावर दृढधन्वा राजा राज्यावर पुत्रास बसवून तपाचरणास गेला व पुढें पत्नीसह हरिसन्निध गेला. सत्ताविसाव्या अध्यायाच्या अवशिष्ट भागांत चित्रशर्मा नांवाच्या एका
कृपण ब्राह्मणाची कथा आहे. त्यानें कोणतेंहि पुण्या केलें नसून चोरी वगैरे पापें केल्यामुळें त्यास मरणानंतर प्रेतयोनि व नंतर कपियोनि प्राप्त झाली. तेथें तो पुरुषोत्तम मासाच्या वद्य दशमीच्या दिवशीं एका कुंडांत पडला व पांचव्या दिवशीं मरण  पावला. त्यामुळें पोआपच व्रताचरण होऊन तो दिव्य देह धारण करून विमानांत बसून श्रीहरिसंनिध गेला. एकोणतिसाव्या अध्यायांत एकंदर दिवसाचें आहिक सांगितलें आहे. तिसाव्या अध्यायांत पतिव्रताधर्मनिरूपण केलें आहे. याचा अधिमासाशीं अर्थाअर्थी कांहीं संबंध नाहीं. शेवटच्या एक-
तिसाव्या अध्यायांत अर्थात् पुरुषोत्तममासमहात्म्याची श्रवण फलश्रुति सांगितली आहे.