विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतिसार – नि दा न :- वारंवार पुष्कळ आणि पातळ शौचास होणें यास अतिसार म्हणतात.
वातज, पित्तज, कफज, संन्निपातज, भयज, आणि शोकज, असे ह्या रोगाचे सहा प्रकार आहेत.
अतिशय पाणी पिणें, शुष्कमांसभक्षण, संवय नसलेले पदार्थ खाणें, अतिशय दारू पिणें, अतिशय जेवणें, अतिस्नेह-पान, जंत, मूळव्याध, मलमूत्र, इत्यादिकांचा अवरोध, इत्यादि वायू वाढण्याच्या कारणांनीं कुपित झालेला वायू सर्व शरीरांतील पातळ पदार्थ आंतडयांत आणतो. त्यामुळें अग्नि मंद होतो, व मळ पातळ होऊन पडूं लागतो.
अतिसार होण्याचेपूर्वी ह्रदय, गुदद्वार व आंतडी ह्यांत टोंचल्याप्रमाणें वेदना होतात. अंग गळतें, शौचास होत नाहीं. पोट फुगतें आणि अन्न पचेनासें होतें. याप्रमाणें पूर्वरुपें होऊन नंतर अतिसार होतो.
अतिसाराचे सहा प्रकारांपैकीं वातजन्य अतिसारांत मुरडा फार होतो, व शौचाला होतेवेळीं फरफर आवाज होतो. शौचाला थोडेथोडे होतें. मळ रुक्ष व फेंसट आणि गांडीळ असा पडतो. गुदद्वारांत कातरल्यासारखी पीडा (परिकर्तन) होते. बुळबुळीत, आणि जळलेल्या गुळाप्रमाणें काळसर तांबूस रंगाचा मळ होतो. रोग्याचें तोंड कोरडें असतें. रोमांच उभे राहतात व आंग बाहेर येतें.
पित्तजन्य अतिसारांत, पिंवळा, हिरवा, व काळा मळ होतो व त्यास अतिशय घाण येते. मळाबरोबर रक्तहि येतें. रोग्यास तहान फार लागते. बेशुद्धी, घाम, आणि अंगाची आग होते. मुरडा होतो व गुदद्वाराची फार आग होते आणि तें पिकतें.
कफानें झालेल्या अतिसारांत, मळ दाट, बुळबुळीत, पांढरा, आणि कफयुक्त असून त्यास फारच घाण येते. मुरडा सारखा चालू असतो, रोग्यास झोंप फार येते, अन्न नकोसें होतें, शौचाचे वेळेस फार कुंथावें लागतें, आळस येतो, मळमळतें, पोट, गुदद्वार आणि ओंटी पोट हीं जड वाटतात. शौचाला जाऊन आलें तरी पुन्हा होतेंसें वाटतें.
त्रिदोषाने होणारे अतिसारांत सर्व दोषांचीं लक्षणें होतात.
भयानें चित्ताचा क्षोभ झाला म्हणजे वायु पित्तयुक्त होऊन मळाला पातळ करितो. मळ अतिशय ऊन असून, फार पातळ असतो त्याबरोबर रक्तहि येतें त्यामुळें मळ गुंजेसारखा लाल असतो. वर लिहिलेलीं वातपित्तात्मक अतिसारांतील लक्षणें यांत होतात. शोकानें होणार्या अतिसाराचींहि हींच लक्षणें आहेत.
हे भय आणि शोक यांनी झालेले अतिसार कष्टसाध्य समजावे.
सर्व अतिसारांचे पुन्हा खालीं लिहिल्याप्रमाणें चार भेद आहेत.
साम, व निराम, रक्तयुक्त, व रक्तविरहित; पैकीं आमयुक्त अतिसारांत जडपणा असल्यामुळें मळ पाण्यांत बुडतो. मळ दुर्गंधी असतो. पोट फुगणे, पोट दुखणें, मळमळणें ही लक्षणें असतात.
याचे उलट लक्षणें असतां निराम अतिसार समजावा. कफजन्य अतिसार निराम असला तरीहि त्याचा मळ पाण्यांत बुडतो.
ज्या अतिसारांत मळाचा रंग पिकलेल्या जांभळासारखा असतो किंवा स्वच्छ असतो अथवा तूप, तेल, चरबी, मज्जा, बेसवार, दुध, दहीं, यांचेप्रमाणें किंवा काळा, निळा, अरुणवर्ण असून मळावर इंद्रधनुष्याचे रंगाचीं कर्तुळे दिसतात. तो अतिसार असाध्य असतो. अतिशय कुजलेला मळ ज्या अतिसारांत पडतो तो असाध्य असतो.
तहान, अंगाची आग, डोळयांपुढें अंधेर्या, दमा, बडबड उचकी, बरगडया दुखणें, चित्ताची अस्वस्थता, गुदद्वार पिकणें, गुदद्वार बंद न होणें, सुज, पोटदुखणें, ताप, तहान, दमा, खोकला, अरोचक, ओकारी, बेशुद्धी, उचकी हे उपद्रव, झालेला, ज्याचें शरीर थंड झालें आहे असा अतिसारानें पीडिलेला रोगी बरा होत नाही.
दमा, पोट दुखणें, तहान, आणि ताप हीं लक्षणें झालेला वृद्ध मनुष्य अतिसारांतून वांचत नाहीं.
अतिसार झालेल्या रोग्यांस शौचावांचून वेगळी लघवी होऊं लागली, आणि अपानवायू सरूं लागला, भूक लागूं लागली, हलके वाटूं लागलें म्हणजे अतिसार बरा झाला असें समजावें.
चि कि त्सा :-अतिसार हा बहुत करून अग्नीस मंद करून आमाशयापासून उत्पन्न होतो. म्हणून तो वातजन्य असला तरी देखील त्यावर प्रथम उपवासरूप लंघनच हितावह होतें.
अतिसारांत पोटशूळ, पोटफुगी, व लाळ सुटणें हे विकार असल्यास वांती करवावी. जेव्हां फार सांचलेले दोष कांहीं पक्क व कांहीं अपक्क अशा आहाराशीं एकवटून अतिसार उत्पन्न करितात, तेव्हां ते अतिशय चाळवल्यामुळें प्रवृत्त होऊन आपोआप बाहेर निघून जात असतात. म्हणून त्यांस तसेंच जाऊं देणें हेंच याचें औषध आहे. म्हणजे पाचक-वगैरे औषध न देतां नुसतें पथ्य राखावें म्हणजे झालें.
आमातिसारावर प्रथमच स्तंभक औषध देऊं नये. तसेंच पोटफुगी, जडपणा, शूळ, व ओलसरपणा हे विकार असून शौचास थोडथोडें होत असल्यास स्तंभक औषध न देतां उलट रेच करणारे हिरडे द्यावे.
ज्याचे दोष मध्यम प्रमाणांत वाढले आहेत, त्यानें लंघन करून ओंवा, पिंपळी, सुंठ, धणे, व हिरडेदळ, यांचा काढा घेणें.
ज्यांचे दोष कमी आहेत, अशा अतिसार्यांस उपास हाच प्रशस्त आहे. जेवणाची योग्य वेळ झाली म्हणजे हा रोगी भुकेनें कांहीसा व्याकुळ झाला म्हणजे त्यास हलकें अन्न बेतानें खाऊं घालावें. असें केल्यानें लौकरच त्याची अन्नावर रुचि होते. जठराग्नि प्रदीप्त होतो व शक्ति येते.
या भोजनावर पिण्याकरितां ताक, कांजी, कण्हेरी, द्राक्षासव, यांची संवयीप्रमाणें योजना करावी.
पित्तजन्य आमातिसारावर आरंभी तीक्ष्ण व उष्ण वर्ज्य करून बाकी पूर्वीचीच लंघनचिकित्सा करावी.
लंघन करतांना तहान लागल्यास किराईत व उपळसरी यांसहित ज्वरांत सांगितलेलें ऊन पाणी द्यावें. भूक लागली असतां शतावरी, चिकणा, रानमुग च उडीद यांनी सिद्ध केलेलें अग्निदीपक असे पेयदि अन्न खाणें हितकर आहे. इतकें करू नहि अतिसार बंद न झाल्यास इंद्रजव, कुडयाची साल, व अतिवीष यांचा कल्क तांदुळांच्या धुवणांतून मध घालून द्यावा.
पित्तातिसारांत पित्तकर पदार्थ खाल्यानें रक्त पडूं लागतें व गुदपाक होतो त्यांवर मोचरस, उपळसरी, ज्येष्ठमध, व लोध्र यांनीं तयार केलेलें शेळीचें दुध, मध व साखर घालून प्यावें. त्याच्याबरोबर भात जेवावा व त्या दुधांत कापसाच्या घडया भिजवून गुदावर ठेवाव्या. शतावरीच्या मुळयांचा कल्क दुधांतून प्यावा व अन्न न खाता दुध पिऊन रहावें. म्हणजे रक्ता तिसार लौकर बरा होतो.
ज्यास मुरडा होऊन वारंवार थोडथोडें रक्त पडतें आणि वायूचा अवरोध झाल्यामुळें तो कष्टानें सरतो किंवा मुळींच सरत नाहीं त्यास पिछाबस्ती द्यावा. शिसवा व पांढरा कांचन यांचा पाला ठेंचून तो वजव यांचा काढा करावा आणि त्यांत तुप व दुध घालून आंव, गुदभ्रंश, व कुंथण्याच्या वेदना यांवर त्याचा पिछावस्ती द्यावा.
कफक्षीण होऊन पुष्कळ दिवस अतिसार राहिल्यानें गुद अशक्त झालें म्हणजे स्वस्थानांतील वायु हटकून प्रबळ होऊन रोग्यास एकाएकीं मारतो. म्हणून ताबडतोब त्यास शमवावें. वायूच्या नंतर पित्त व पित्ताच्या नंतर कफ जिंकावा. किंवा तिघांत ज्याचा जोर असेल त्यास प्रथम शमवावा.
भीति व शोक, यांपासूनहि वायु लवकर कुपित होतो. म्हणून भयातिसार व शोकातिसार यांवर वातनाशक चिकित्सा करावी, आणि रोग्यास समाधान व आनंद होईल असे उपाय करावे.
ज्यास मळ पडल्यावांचून लघवी होते, वार सरतो आणि ज्याचा अग्नि प्रदीप्त असून कोठा हलका आहे त्याचा अतिसार बरा झाला असें समजावें.
उपास, आोकारी, झोंप, पेज, जुने तांदुळाचा भात, ससा किंवा हरिण यांचे मांसाचा रस, शेळीचें तूप, दुध, दहीं व ताक, मध, जांभळें, डाळिंबें, जायफळ, अफू, जिरें, इत्यादि पदार्थ अतिसारांत हितकर आहेत.
शेकणें, रक्तस्राव, पाणी पिणें, स्नान, मैथुन, उसळी, पावटे, संवय नसलेलें अन्न, द्राक्षें, लसुण, नारळ, पालेभाज्या अंबट व खारट रस, इत्यादि पदार्थ अतिसारांत अपथ्य आहेत.
बेबीचे खाली दोन आंगळें किंवा माकडहाडाचे वर अर्ध-चंद्राकार डाग दिल्यानेंहि अतिसार जातो. शंखोदररस, अगस्ति-सुतराज, कुंकुमवटी, इत्यादि योगरत्नाकरांत सांगितलेलीं औषधें अतिसारांत गुणकारी आहेत. [ वाग्भट; चरक, योगरत्नाकर इ. ]