विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अघारिया - आग्र्याहून आलेले. एकंदर हिंदुस्थानांत १९११ सालीं ५५४११ अवारिया होते. पैकीं जवळ जवळ निम्मे वर्हाड, मध्यप्रांत व निमे बिहार ओरिसा प्रांतांत होते. हे संबलपूर जिल्ह्यांत राहतात. संख्या २७०००. रायगड, सारंगगड, बिलासपूर जिल्हा छोटानागपूर येथेंहि सांपडतात. यांची परंपरागत माहिती अशी आहे कीं हे आग्र्याजवळ राहणार्या रजपुतांचे वंशज आहेत आणि दिल्लीच्या राजाला डोकें न लववतां एका हातानेंच सलाम करण्याचा त्यांचा हक्क होता. दिल्लीच्या बादशाहानें यांना कापून काढण्याची युक्ति केली. त्यांत एक खेरीज करून सर्वांचा नाश झाला. त्यालाहि बोलावणें गेलें, तेव्हां त्यानें आपल्या ऐवजीं एका चांभारास पाठविलें, व स्वत: छत्तीस गडाकडे पळाला. हे पितृतर्पण करतांना प्रथम या चांभारास पाणी देतात. गजपति उडिया राजानें तीन भाऊ सैन्यांत नोकरी मागण्याकरितां आले तेव्हां दोन तरवारीचीं म्यानें समोर आणविलीं आणि ज्याकडून जें निवडलें जाईल त्यावरून त्याचा धंदा ठरेल असें सांगितले. त्याप्रमाणें सोन्याच्या मुठीची तरवार एका भावानें उचलली पण त्यांतून बैलास हांकण्याचा चाबूक निघाला म्हणून हे शेतकरी झाले अशी कथा आहे. यापैकीं एकाला जानवें देऊन बाकीच्यांचीं जानवीं तोडलीं. हे स्वत:ला सोमवंशी रजपूत समजतात, व त्यांचा आकार, चेहरा पूर्णपणें आर्यन् मानव वंशाच्या मानलेल्या चेहर्याप्रमाणें आहे अशी कांहीं लेखकांची समजूत आहे. (Russell and Hiralal-Tribes and Castes of C. P.)
यांत दोन जाती आहेत. बडे व छोटे छोटे हे अघारिया पुरुष आणि अहीर बायका यांपासून झाले आहेत. यांची ८४ गोत्र आहेत. यांतील ६० गोत्रांस पटेल, १८ गोसास नाईक आणि ६ गोत्रांस चौधरी अशा पदव्या आहेत. यांच्या गोत्रांमध्यें ब्राह्मण गोत्रें व रजपूतकुलनामें व काहीं प्राण्यांची नावें व कांहीं अज्ञातार्थ शब्द यांचे मिश्रण आहे. जातींतील लग्नाला योग्य वधुवरांची लग्ने ५।६ वर्षांत एकदां एकाच मुहूर्तावर उरकून घेण्यात येतात.
जा ति दै व त - यांचा ''दूल्हा '' नांवाचा देव आहे. हा गोंडांचाहि आहे. उडिया ब्राह्मणांच्या हातचें पाणी हे लोक पीत नाहींत. शेतकींत हे लोक प्रवीण आहेत. पुष्कळ लोक मालगुजार आहेत. यांच्यांत पुरुषांपेक्षां बायकांची संख्या जास्त आहे. यांच्या बायका शेतांत काम करीत नाहींत. घराच्या बाहेरचें कामहि करीत नाहींत.