विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकियन लोक व संघ - ग्रीक लोकांच्या ४ शाखांपैकीं ही एक आहे.  या शाखेचा मूल पुरुष अकियस हा होता, अशी दंतकथा आहे.  होमरकवीच्या मतें या लोकांची सत्ता सबंध ग्रीस देशावर होती.  यांचें एओलियन शाखेशीं बरेच साम्य दिसतें.

यांचा बांधा उंच व डोळे घारे होते. हे आपल्या मतें ग्रीक लोकांचा वरिष्ट देव जो झ्युस याचे वंशज होते.  यांचे पुढारी ''वेलायूस'' होते.  हे लोखंडाच्या हत्याराचा व चौकोनी ढालीचा उपयोग करीत.

यांचा ३० गांवांचा एक संघ अथवा जूट होती.  ही जूट यांनी आपल्यावरील स्वार्‍यांचा प्रतिकार करण्या करतां केली होती, असें दिसतें.  यांच्या एकीचे दुसरें कारण झ्यूसची पूजा हें होय.  ख्रिस्तपूर्व २८० च्या सुमारास यांचें महत्व फारच वाढलें होतें.  यांचा मुत्सद्दी आरेटस हा होता.  आरेटसच्या वेळीं या संघाचीं गांवें पुष्कळच होतीं.

यांच्या मध्यवर्तीय शासनसंस्थेंत लोकमताचें प्राबल्य होतें.  या संस्थेच्या वर्षांतून तीन बैठकी होत असत.  यांतच कायदे ''पास '' होत असत.  या सभेचें एक १२० सभासदांचें पोट मंडल होतें.  याच्या हातीं मुख्य संस्थेचा कार्यक्रम तयार करणें, परदेशच्या वकीलांशी ठराव करणें,  शहरांमधील तंट्यांचा निकाल करणें, वगैरे कामें होतीं.  मुख्य अधिकार्‍याचे पदाला स्ट्रेटेजिया असें नांव होतें.  या अधिकार्‍यास कोणत्याही योजनेस खो घालण्याचा हक्क होता.

ह्या जुटींत एक मोठें व्यंग असें होतें कीं तीस लष्कराची व्यवस्था चांगली ठेवितां येत नव्हतीं. व गुन्हेगारांस योग्य शासन करण्याची सोय केली नव्हती.  रोमन लोकांनीं हा संघ विध्वंसिला.