विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझोव्हचा समुद्र :- दक्षिण यूरोपांतील एक अंतस्थ लहानसा समुद्र - हा काळ्या समुद्राशीं येनिकेलच्या सामुद्रधुनीनें जोडला जातो. इतिहासपूर्वकालांत याचा कास्पियन समुद्राशीं संबंध होता. याची नैऋत्येशान्य लांबी २३० मैल, व जास्तींत जास्त रुंदी ११० पर्यंत मैल व क्षेत्र १४५१५ चौरस मैल आहे. हा नोव्हेंबरपासून एप्रिल मध्यापर्यंत गोठलेला असतो. यास डॉन हीच कायती एक मोठी नदी मिळते. याची जास्तींत जास्त खोली ४५ फूट असून त्याची सपाटी काळ्या समुद्राच्या वर ४३/४ फूट आहे. परंतु दिवसेंदिवस ही सपाटी कमी कमी होत आहे. पाणी बहुतांशीं इतर समुद्रांच्या मानानें गोडें आहे पण या गोडेपणांत स्थलपरत्वें व प्रवाहपरत्वें फरक होतो. रशियाच्या व्यापारास अझोव्हच्या समुद्राचें बरेंच महत्त्व असून त्याच्या किनार्‍यावर टागान रॉग, बेरड्यान्स्क, मेर्‍युपोल व येनिकेल हीं शहरें आहेत.