विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अतारी : हें खेडेगाव ( ३०.२६’ उत्तर अक्षांश; ७२.१’ पूर्व रेखांश ) पंजाब प्रांतात, मुलतान जिल्ह्यांतील कबीरवाला तहसिलीमध्यें आहे. अलेक्झांडरनें हिंदुस्थानावर स्वारी केली त्यावेळीं त्यानें घेतलेलें हें तिसरें गांव होय. हेंच ब्राह्मणाबाद असावें असें कनिंगहॅम याचें मत आहे. हल्ली या गांवाला कांहीच महत्व नाहीं. येथें एक पडका किल्ला आहे. तो पूर्वी फार अभेद्य असावासें दिसतें. हा ७५० चौरस फूट असून, ३५ फूट उंच आहे. याच्या दोन्ही बाजूंना प्राचीन शहराचे अवशेष पसरले आहेत. या अवशेषांचा इतिहास किंवा जुन्या शहराचें नांव कोणाला माहीत नाहीं. या शेजारचें अतारी गांव अगदी अर्वाचीन आहे. (इं. गॅ.).