विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजयगड संस्थान - बुंदेलखंड पोलिटिकल एजन्सीच्या अधिकारांत असलेलें मध्यहिंदुस्थानांतील एक सनदी संस्थान. उत्तरअक्षांश २४० ५' ते २५० १०' आणि पूर्व रेखांश ७९० ५०' ते ८०० २१'. क्षेत्रफळ ७७१ चौ. मै. हें विंध्यपर्वतांच्या अगदीं आंत असून पर्वत दर्या खोरीं यांनीं हें तुटक झालेलें आहे. यांत केन व बैर्मा या नद्या वाहतात. पावसाचें सरासरी मान ४७ इंच आहे.
अजयगडचे संस्थानिक राजा छत्रसालचे वंशज असून बुंदेले रजपूत आहेत. इ. स. १७३१ मध्यें राजा छत्रसालनें आपल्या राज्याचे हिस्से पाहून दिले. त्यांतील एक ३१ लाखांचा मुलुख व अजयगड त्याचा तिसरा मुलगा जगतराज यास मिळाला. जगतराजाच्या मरणानंतर त्याचा मुलगा पहाडसिंग याचे आपले पुतणे खुमानसिंग व गुमानसिंग यांच्याशीं तंटे चालू होते. सरते शेवटीं समेट होऊन गुमानसिंगला बांडाप्रांत व अजयगडचा किल्ला मिळाला. गुमानसिंगचा पुतण्या बख्तसिंग, हा त्याचे मागून बांडाच्या गादीवर बसला होता, त्यास इ. स. १७९२ मध्यें अल्लि बहादुरनें हांकून लावून त्याची अन्नान्न दशा केली. इ. स. १८०३ मध्यें बुंदेलखंड इंग्लिशांचे ताब्यांत आलें तेव्हां त्यांनीं बख्तसिंगला मुलुख देइतोंपर्यंत ३०००० रुपये पेन्शन करून दिलें इ. स. १८०७ मध्यें त्यांस कोट्रा व पवाई परगण्यांची सनद मिळाली. अजयगडचा किल्ला व सभोंवतालचा प्रांत त्या वेळेस लक्ष्मण दौवा नांवाच्या एक प्रसिद्ध लुटारुच्या ताब्यांत होता. देशांत शांतता प्रस्थापित करणें त्यावेळीं अतिशय जरूर असल्यामुळें इंग्लिशांनीं आपली सार्वभौम सत्ता त्यास मान्य करण्यास लावून तो मुलूख त्याजकडे ठेवला. परंतु मित्रत्वाच्या अटी त्याकडून पाळल्या न गेल्यामुळें इ. स. १८०९ मध्यें कर्नल मार्टिनडेलनें तो मुलूख स्वारी करून जिंकून घेतला. या प्रांताचा बराचसा मोठा भाग त्यावेळेस बख्तसिंगाच्या राज्यांत सामील करण्यांत आला. इ. स. १८१२ त नवी सनद करून हा सर्व मुलूख त्यांत नोंदण्यांत आला.
बख्तसिंग इ. स. १८३७ मध्यें मरण पावला, व त्याचा मुलगा माधवसिंग राज्यावर आला पण तोहि फार दिवस टिकला नाहीं. कारण इ. स. १८४९ मध्यें त्याच्या मरणानें गादी पुन: रिकामी झाली. त्याच्या मागून महिपतसिंग गादीवर आला व तो इ. स. १८५३ मध्यें वारल्यावर त्याचा पुत्र विजयसिंग यास गादी मिळाली; पण तो दोन वर्षानीं म्हणजे १८५५ मध्यें निवर्तला. तो निपुत्रिक होता व गादीला कोणी वारस न राहिल्यामुळें राज्य सरकारजमा झालें. याच सुमारास बंडास ( १८५७ ) सुरुवात झाली. यावेळेस राजाची आई इंग्रजांशीं फंदाफितुरी न करतां मित्रत्वानें वागली म्हणून संस्थान खालसा न करतां गादीचा वारस विजयसिंगाचा भाऊ (कीं दासीपुत्र ) रणजोरसिंग, वारस कबूल करण्यांत येऊन इ. स. १८५९ मध्यें त्याला गादीवर बसवला. इ. स. १८६२ त रणजोरसिंगला दत्तक घेण्याची '' सनद '' मिळाली. व इ. स. १८७७ मध्यें '' सवाई '' किताब वंशपरंपरेनें मिळाला. इ. स. १८९७ मध्यें त्यास के. सि. आय्. इ. हा किताब मिळाला. याला ११ तोफांच्या सलामीचा मान आहे. यास पहिला मुलगा इ. स. १८६६ मध्यें झाला. त्याचें नांव राजाबहादुर भोपाळसिंग.
अजयगडच्या किल्ल्याखेरीज या संस्थानांत दोन ठिकाणें पुराणसंशोधन दृष्ट्या महत्त्वाचीं आहेत. अजयगडच्या ईशान्येस १५ मैलांवर एक खेडें आहे तें पूर्वी एका मोठ्या शहराचें ठिकाण होतें. तें शहर इ. स. ११६५ ते १२०३ मध्यें चंदेल राज्याचा शेवटचा राजा परमाल देव याचा प्रधान बच्छराज यानें वसविलें होतें अशी समजूत आहे. दुसरें ठिकाण म्हणजे गंजपासून २ मैलांवर असलेलें नाचना हें गांव होय. याला पूर्वी कुठार असें म्हणत असत व तें तेराव्या शतकांत सोहनपाल बुंदेला याच्या वेळीं महत्त्वास आलें. तेथें पूर्वी एक मोठें भरभराटीस आलेलें शहर असावें असें पुष्कळ गोष्टींवरून दिसतें व तें चवथ्या शतकांतील म्हणजे गुप्तराजांच्या वेळचें असावें.
इ. स. १९०१ मध्यें संस्थानची लोकवस्ती ७८२३६ होती, त्यापैकीं हिंदु शेंकडा ८९ म्हणजे ७०३६०; वन्य विशेषत: गोंड शेंकडा ६ म्हणजे ५०६२; व मुसुलमान शेंकडा ३ म्हणजे २३१४ होते. या संस्थानांत राजधानी अजयगड व ४८८ खेडीं आहेत. १९११ त लोकसंख्या ८४०९३ होती.
ये थी ल जा ती - ब्राह्मण १११००, चांभार ९२०० कच्छि, बुंदेले ठाकुर, लोध, अहीर आणि गोंड प्रत्येकीं ३००० ते ४०००. शेंकडा ४० लोक शेतकीवर उपजीविका करणारे आहेत व शें. १७ मजूरीवर राहतात. एकंदर ४०७ चौ. मै. क्षेत्रापैकीं शें. ५३ लागवडीची जमीन आहे. त्यापैकीं शें. १० बाहेरच्या पाण्यावर आहे. १४४ चौ.मे. जंगल आहे. १४१ चौ. मै. लागवडीस योग्य असून पडीत आहे. आणि ७९ चौ. मै. रुक्ष आहे. चणे, कोदन, गहूं, ज्वारी, धान, बाजरी, आणि कापूस हीं येथें होणारीं पिकें आहेत. केन नदीच्या कालव्याचें काम चालू आहे. एके वेळीं लोखंडाच्या खाणी चालू होत्या, पण सध्यां त्या बंद आहेत. कांही ठिकाणीं हिरे सांपडतात. बंदुका, तलवारी, पिस्तुलें हीं येथें तयार होतात. या संस्थानचा व्यापार जवळ जवळ कांहींच नाहीं. कारण तें अगदीं डोंगरांत दूर वसलेलें आहे. एकंदर ७२ मैल लांबीचे रस्ते आहेत. त्यांतील २४ मैल पक्के असून ४८ मैल कच्चे आहेत. या संस्थानचें उत्पन्न २३/१० लाख आहे. तें बहुतेक सर्व जमिनीचा सारा आहे.
सै न्य - ७५ घोडेस्वार, ३५० पायदळ, ४४ गोलंदाज व ९ तोफा, त्याशिवाय ६८ पोलीस व २११ गांव पोलीस आहे. शाळा थोड्या आहेत व त्यांत शेंसवाशें विद्यार्थी शिकत आहेत. अजयगड शहरीं एक दवाखाना आहे. ( इं. गॅ. भाग ५. )