विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]