विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अण्णाजी दत्तो : शिवाजीच्या अष्टप्रधानांतील एक अधिकारी. सतराव्या शतकाच्या प्रारंभीं हिंदुपदपादशाहीची कल्पना मूर्त स्वरुपांत येऊं लागत आहे तोंच शहाजीचीं व शहाजीनें पाठविलेलीं वृद्ध व अनुभविक माणसें कमीकमी होऊं लागलीं तेव्हां शिवाजीच्या संग्रहांत नवीन जोमाचीं व उत्कट कळकळीचीं कांहीं स्वामिनिष्ठ माणसें गोळा झालीं. त्यांत अण्णाजी दत्तो प्रभुणीकर हा होता. हा देशस्थ ब्राह्मण असून तो इ. स. १६४७ च्या सुमारास शिवाजीस येऊन मिळाला व लहान मोठीं कामें करून त्याजजवळ राहिला. याच्याकडे संगमेश्वर तालुक्यांतील देशकुलकर्णपण होतें. अण्णाजीचा जसा पूर्ववृत्तांत उपलब्ध नाहीं तसाच त्याच्या खासगी चरित्रावर प्रकाश
पडेल अशी माहितीहि उपलब्ध झालेली नाहीं.


विजापूरकरांकडून विडा उचलून आलेल्या अफजलखानाबरोबर शिवाजी एकांगी सामना देण्यास तारीख १० नोव्हेंबर १६५९ रोजीं प्रतापगडावरुन खालीं उतरला त्या वेळीं अण्णाजीस शिवाजींने प्रतापगडावर जिजाई व संभाजी यांच्या संरक्षणार्थं ठेविलें होतें. अफजलखानास चीत केल्यानंतर, अण्णाजी दक्षिण कोंकणचा माहितगार म्हणून, त्यास शिवाजीनें ताबडतोब पन्हाळा किल्ला घेण्यास पुढें पाठविलें, व त्यानें “मालसावंत याचे हजारी सांगून” पन्हाळा सर करण्याचा प्रयत्न केला. नंतर तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजीं शिवाजीनें खासा जाऊन पन्हाळा घेतला. अण्णाजींने आपली कर्तबगारी अशाच रीतीनें शिवाजीसन्निध राहून दाखविल्यामुळें व शिवाजीसहि तो हिशेबी व लेखनकुशल दिसून आल्यामुळें तारीख २९ आगष्ट १६६१ रोजीं शिवाजीनें राज्याची वाकनिशी त्यास सांगितली व पालखी दिली. वाकनिशीत खासगीचा कारभार, पत्रव्यवहार, दफ्तर संभाळणें इत्यादि दरख असत. भोजनाची तजवीज, आमंत्रणें करणें, इत्यादि कामेंहि वाकनिसासच करावीं लागत. परंतु ही वाकनिशी अण्णाजीस देण्यापूर्वीच जमिनीची पहाणी करणें, सारामहसुलाची व्यवस्था पाहणें इत्यादि राज्यांतर्गत व्यवस्थेचीं कामें दादाजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर अनुभविक म्हणून अण्णाजीस सांगितलीं जात असत व अण्णाजी दत्तोनेंहि दादाजीचीच सारापध्दत चालू ठेवून आपलें काम फारच चोख रीतीनें केलें होतें. “राज्याची चांगलीच मशागत केली यास्तव शिवाजीनें कृपाळू होऊन यास तारीख ३ एप्रिल १६६२ रोजी सुरनिशी देऊन याचा यथारीति सन्मान केला.” सुरनीस किंवा सचीव यानें राजपत्रें होतील त्यांत न्यूनाधिक अक्षर मजकूर शोध करुन नीट करावीं व तसेंच महाल, परगणे यांच्या हिशेबाचे शोध करावे; राजपत्रावर संमत करून बार चिन्ह रुजू करावें; युध्दादि प्रसंग करून राजहित तें करावें असे होतें. अण्णाजीनें गांवकामगारांवर मुळींच विश्वास न ठेवतां स्वत: सर्व गांव फिरुन सारापट्टी बसविणें वगैरे देखरेखीचें व अन्तर्व्यवस्थेचें काम चांगल्या रीतीनें केलें असलें तरी युद्धादि प्रसंग करून त्यानें स्वतंत्रपणें एखादा मुलूख मिळविला असें झालें नाही. शिवाजीनें सन १६६४ च्या जानेवारींत कोळवणांतून (ठाणें जिल्ह्यांतून) जाऊन तारीख ६ रोजीं सुरत लुटली. त्या वेळीं त्यानें अण्णाजीस बरोबर घेतले होतें. पुढें दक्षिण पादाक्रान्त करण्यास प्रतापराव गुजर वगैरे जी कांहीं खाशी मंडळी पाळविण्यांत आली त्यांत अण्णाजी होता. परंतु या सफरींतहि अण्णाजीनें कांहीं विशेष शौर्य दाखविले नाहीं. नाहीं म्हणावयास हुबळी शहर मात्र अण्णाजीनें लुटलें असल्याचा उल्लेख सांपडतो (इ.स. १६७३). हुबळी हे त्या वेळीं व्यापाराचें मुख्य ठिकाण होतें. या शहरांत बरीच लूट, सुरतेपेक्षांहि अधिक, मिळाली असावी असा अजमास आहे. परंतु इंग्रज व इतर वखारवाले आणि शिवाजी यांच्यामध्यें नंतर वाटाघाटी झाल्या त्यांवरुन असें दिसतें कीं अण्णाजीनें शिवाजीला हुबळीच्या लुटीची पूर्ण हकीकत शेवटपर्यंत कळविली नसावी. कदाचित राजापूरच्या लुटींत दाखविलेल्या अव्यवस्थितपणामुळें शिवाजीनें जबाबदार माणसांस जें शासन केलें त्यामुळें अण्णाजीकडून असे घडलें असावें. इ.स. १६६६ त शिवाजी संभाजीसह आग्र्यास दिल्लीश्वरास भेटावयास गेला त्या वेळीं शिवाजीनें आपला राज्यकारभार ज्या त्रयीवर टाकला होता तींत अण्णाजी होता. या मंडळीनीं कार्यदक्ष राहून तारीख ५ मार्च ते २० नोव्हेंबर १६६६ पर्यंत राज्याचा कारभार चांगल्या प्रकारें सांभाळिला म्हणून त्यांच्या संबंधीं “तुम्ही राज्याचे आधारस्तंभ” वगैरे बहुत प्रकारें शिवाजीनें गौरवोद्गार काढले. अण्णाजीचा बहुतेक काल सारामहसूल ठरविणें, गांवांशिवांच्या तक्रारींची चौकशी करणें, निकाल देणें यांतच जाई. अण्णाजी युद्धादि प्रसंगांत क्वचितच सामील होई. तरी देखील अण्णाजी दक्षिण कोंकणचा माहितगार म्हणून जेव्हां जेव्हां दक्षिण भागांत युद्धप्रसंग निघे तेव्हां तेव्हां त्यास बरोबर पाठविण्यांत येत असे. इ.स. १६५९ त मिळविलेला पन्हाळा विजापूरकरांनीं इ.स. १६६२ त परत घेतला होता व नंतर मराठयांनीं आपल्या अंमलाखालीं आणलेल्या मुलुखांत खवासखान अधिकाधिक व्याप करूं लागला म्हणून शिवाजीनें दक्षिणेंतील बंदोबस्तीचें मुख्य ठिकाण जो पन्हाळा किल्ला तो घेण्याचें सन १६७३ त ठरविलें, व “अण्णाजीपंतास तो पुन्हा भेद करून घ्यावा” अशी आज्ञा करून “बाबाजी नाईक पुंडे विजापुरास वकील होता त्यास बोलावून माघारीं आणलें. कोंडाजी फर्जद यास पालखी वगैरे देऊन गौरव केला व गुप्त सलजमसलत सांगून व त्याच्या बरोबर गणाजी व मोत्याजी रवलेकार मामा यांच्या हाताखालीं बरेच लोक देऊन रवाना केलें. अण्णाजी राजापुरीं तीन दिवस आधीं म्हणजे तारीख २ मार्च १६७३ रोजीं जाऊन हेरांकडून बातमी आणणें वगैरे योजना करीत होता. तोंच तारीख ५ मार्चला कोंडाजी वगैरे मंडळी जाऊन पोहोंचली व त्यांनीं त्याच दिवशीं रात्रीं निबिड अंधारांत किल्ल्यावर छापा घालून सर्वत्र दाणादाण केली. यावेळीं अण्णाजी पंडित हा पिछाडीचें रक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्यासह त्यांच्या पाठीमागें मोठया अरण्यांत लपून राहिला होता. तारीख ६ रोजींहि बर्‍याच चकमकी उडून किल्ला कोंडाजीनें ताब्यांत घेतला व जासुदाबरोबर विजयपत्रिका शिवाजीस रवाना केली. अण्णाजी पंडित देखील हर्षभरित होत्साते धांवत आले.” नंतर आठ दहा दिवसांनीं शिवाजी पन्हाळयावर आला तोंपर्यंत अण्णाजी तेथेंच राहिला होता. याप्रमाणें पन्हाळा पुन्हां एकदां घेतला तो सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत मराठयांकडेच राहिला. नंतर याच वर्षात राज्याभिषेक होण्याच्या पूर्वी शिवाजीनें अष्टप्रधानांचे कारभार वाटून दिले तेव्हां त्यांत अण्णाजीकडे चेऊलपासून दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदे व फोंडे अंकोलपर्यंत म्हणजे सर्व दक्षिण कोंकणचा कारभार सांगितला होता. शिवाय जमिनी पाहून कायम सारा करणें वगैरे जमीनमहसुलाचें काम पूर्वीप्रमाणें त्याच्याकडेच कायम ठेविलें. अण्णाजीस रत्नागिरी तालुक्याचें देशपांडेपण व कोल्हापूर इलाख्यातील भूधरगडाजवळील सामानगडची सबनिशीहि दिली होती. अण्णाजीनेंच सामानगड बांधिला असें म्हणतात. अण्णाजीकडे दक्षिण कोंकणचा कारभार असल्यामुळें सर्व समुद्रकिनारा त्याच्याकडेच असे व त्यामुळे त्याचा यूरोपीयन वसाहतवाल्यांशीं नेहमीं संबंध येई. व ते त्यास अण्णाजी पंडित किनार्‍याचा सुभेदार (व्हाइसराय ) असें म्हणत.  तारीख ५ जून १६७४ रोजीं शिवाजीस राज्याभिषेक झाला त्या वेळीं अण्णाजीकडे राज्यान्तर्गत व्यवस्थेचें काम असल्यामुळें त्यासच राजावर छत्र धरण्याचा मान मिळाला व त्या प्रसंगीं त्याचा बादली वस्त्रें, पोषाख, कंठी, चौकडा, तुरा, शिरपेंच, शिकेकट्यार, ढाल, तरवार, हत्ती, घोडा, ऐसे देऊन सन्मान करण्यांत आला.  अण्णाजीस पालखी खर्च मिळून सालिना १०,००० होनांची किंवा महिना ३००० रुपयांची नक्त नेमणूक होती. अण्णाजी राजपत्रांवर जो आपला शिक्का मोर्तब करी त्यांतील मुख्य शिक्का अष्टकोनी असून, मोठा व लांबट होता व त्यांत पुढीलप्रमाणें चार ओळी होत्या.  (१) श्री शिवचरणी (२) निरंतर दत्त (३) सुत अनाजिपं (४) त तत्पर.  जोडावर मारण्याचा किंवा लेखनसीमेचा शिक्का लहान व वर्तुलाकार असून त्यांतील मजकूर (१) लेख (२) नावधि रे (३) धते असा आहे. इ. स. १६७४ नंतर शिवाजीनें पुन्हां सर्व पहाणी करण्याचें ठरविलें व त्यांतच अण्णाजीचीं पुढील ४-५ वर्षें गेलीं. दरम्यान माळव्यावर मात्र अण्णाजीस पाठविलें होतें. इ. स. १६७८ त शिवाजी कर्नाटकांत जावयास निघाला त्या वेळीं मागें अण्णाजीस राज्यसंरक्षणार्थ ठेविलें होतें. अण्णाजी बहुतेक रायगडींच असे. तो जेव्हां गांवें पहाण्यास जात असे तेव्हां मागें त्याचा तालिक सुरनिशीचें सर्व काम पाही.

गांवकामगार वगैरे जमिनीची पहाणी चुकीची करीत व त्यामुळे विशेषत: राज्याचेंच नुकसान होत असे. म्हणून अण्णाजीनें बरीच सक्त मेहनत घेऊन व स्वत: गांवोगांव फिरुन पहाणी केली व सारा बसविला. अशा रीतीनें राज्याचा वसूल बराच वाढला, अन्तर्व्यवस्था नीट झाली व अण्णाजीच्या उत्कर्षासहि ह्यायोगें अधिकाधिक भर पडत चालली. परंतु या कारणानेंच त्या वेळच्या कित्येक थोर व कर्तृत्ववान् लोकांचें व अण्णाजीचें वितुष्ट आलें व हणमंते वगैरे मंडळी जमीनमहसुलाचे व गांवांशिवांचे तंटे “महाराजांनी जातीनें निवडावे” अशी मागणी करूं लागले. याचा परिणाम असा झाला कीं, सर्व जमिनीची पहाणी पुन्हां करून सारापट्टी ठरवावी म्हणून शिवाजीनें आज्ञा केली व त्याप्रमाणें राज्याभिषेकानंतर पहाणीस सुरुवात झाली. या पहाणींतहि दादाजीचीच जमीनीची तक्षिमा म्हणजे प्रत ठरविण्याची व मोजणीची पद्धति स्वीकारलेली होती. परंतु ॠतुमानाप्रमाणें कमीअधिक आंखूड होणार्‍या दोरींऐवजीं राजहस्तानें पांच हात व पांच मुठी लांबीच्या काठीचें माप चालू केलें. शिवाजी मूळचा आजानुबाहु म्हणून या मापाबद्दल कुरकुर करणें शक्य नव्हतें व शिवाय राजहस्त. उत्पन्नाच्या दोन पंचमांश सारापट्टी हेंच प्रमाण कायम ठेविण्यांत आलें, परंतु गल्याऐवजीं नगदीमध्यें सारा घेण्याची पध्दत चालू केली, शिवाय यावेळीं जी सारापट्टी मुक्रर केली ती कायम म्हणून समजण्यांत आली. पडीक जमिनीवरहि सारा बसविल्यानें पडीक जमिनीची लागवड होऊं लागली. जेथें जमिनी मोकळया पडल्या होत्या तेथें नव्या वसाहती करवून व लागवडीसाठी बियाणें, गुरें व पैसाहि २ वर्षांच्या मुदतीनें देण्यांत येऊन लागवड करण्यांत आली. दुष्काळांतहि बियाणें, गुरें वगैरे देण्यांत आल्यामुळें कायम  सारापध्दतीबद्दल तक्रारीस जागा राहिली नाहीं. सारापट्टी नवीन बसवितांना अण्णाजीनें वेळोवेळीं गांवागांवांस आज्ञापत्रें लिहिलीं त्यांवरून असें दिसतें कीं सारापट्टी बसविणें ती प्रथम कारकुनांनी व गांवकामगारांनीं गांवांतील चार शिष्टांच्या संमतीनें व मागील दोन तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या मानानें कायम करावी व त्यांत गांवांतील प्रमुख गृहस्थांनीं मदत करावी; व अशा तर्‍हेनें सारा ठरविणें वगैरे झाल्यानंतर गांवाचें लिहून यांवें व नंतर अण्णाजीनें स्वत: जाऊन राजहितास बाध येत नाहीं व गांवांत तक्रारी नाहींत असें पाहून सारापट्टी कायम करावी. परंतु असे करण्यांत व्यक्तिहिताकडे अण्णाजीस डोळेझांक करावी लागली व त्यामुळें तो कांही व्यक्तींच्या द्वेषास पात्र झाला. मोरोपंत पिंगळे पेशवा हाच मुख्यत: सर्व राज्यास जबाबदार असल्यामुळें अण्णाजीच्या विरुद्ध बरेच वेळां निकाल द्यावा लागे व शिवाजीसहि तो मान्य असे. त्यामुळें अण्णाजी मोरोपंताचा द्वेष करूं लागून मोरोपंत व अण्णाजी यांच्यामध्यें वैमनस्य आले. शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगीं मोरोपंतानें जो थोडासा विरोध दाखविला त्यामुळे अण्णाजीस मोरोपंताचा उघड उघड द्वेष करण्यास सवड सांपडली होती. अण्णाजीचा सर्व वेळ एकंदरींत राज्यांतर्गत  व्यवस्थेंत गेल्यामुळें तो कित्येक थोर लोकांच्या नुकसानीस कारणीभूत झाला होता. याचा परिणाम असा झाला कीं, अण्णाजीचा दरारा जितका आहे म्हणून वाटत होता तितकेच त्याच्याविरुद्ध सर्व प्रजा व लहानथोर कामगार झाले होते.

हिंदु लोकांच्या वारसी हक्कांतच सर्वनाशी गृहकलहाचें बीजारोपण झालेलें आहे. नुसत्या उत्कर्षाच्या ओलाव्यानें बीज जेथल्यातेथेंच नाश पावतें, हें खरें. परंतु थोडयाहि उत्कर्षाच्या ओलाव्यास एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाची ऊब मिळतांच हें बीज अंकुर घेतें. सर्वगुणसंपन्न व विनयशील अशा सईबाईच्या मृत्यूनंतर व राजारामाच्या जन्माबरोबर उत्पन्न झालेलें गृहकलहाचें भूत जिजाबाईच्या करडया अंमलाखालीं पूर्णपणें गाडून गेलें होतें तेंच शिवाजीच्या राज्याभिषेकोत्सवामुळें व संभाजीला युवराजपदीं पाहातांच वर उसळी घेऊं लागलें व जिजाबाईच्या मृत्यूनंतर उच्छृंखल होऊन शिवाजीच्या घरांत उघडपणें खेळूं लागलें. अण्णाजी हा मूळचा महत्वाकांक्षी व बुद्धिवान पंडित. परंतु त्याच्या अंगांत शौर्य किंवा युद्धनैपुण्य नसल्यामुळें तो पहिल्यापासून कारस्थानी. याला या भुताचा वास शिवाजीसन्निध व बहुतेक रायगडींच राहिल्यानें तेव्हांच लागला व यानें अर्थातच त्या कालीं सबळ असलेल्या सोयराबाईचा पक्ष धरिला. अण्णाजीनें सोयराबाईवर लवकरच आपला पगडा चांगलाच बसविला. संभाजीविरुद्ध कारस्थानें करवून त्याला नालायक बनविण्यास सोयराबाईस सर्वांशीं मदतगार हा एवढाच सरकारकून असल्यानें सोयराबाईनेंहि त्याचाच पुरस्कार केला. हा सोयराबाईंचा गुप्तकट शिवाजी कर्नाटकच्या स्वारीवर गेल्यानंतर अधिकच जोरावला व त्यानें संभाजीला त्याच्या बायकोसह उठवून लावलें. शिवाजी परत आल्यानंतर त्याला संभाजी उठून गेल्याची बातमी कळली तेव्हां त्याने संभाजीस परत आणण्याचा प्रयत्न केला. या बळावत चाललेल्या गृहकलहास कांहीं तरी तोड काढून हिंदुपद पादशाहीचें संरक्षण करावें या विवंचनेंत शिवाजी असतां त्यास आजार झाला व त्या आजारांत शिवाजीचा अंतसमय जवळ येत आहे असें दिसतांच संभाजीच्या बंदोबस्ताच्या व इतर योजना गुप्त रीतीनें चालू झाल्या. या प्रसंगीं मोरोपंत वगैरे थोर थोर मंडळी शिवाजीनें मुद्दाम बोलावून आणली होती व बाळाजीहि जवळ होता. परंतु या थोर मंडळींचीं मनें हिंदुपदपादशाहीच्या प्रतापसूर्याच्या अस्ताचलावरून फांकणार्‍या किरणांत इतकी व्यग्र होऊन गेलीं होतीं व त्यांना या राजधानींतील व राजघराण्यांतील गृहकलहापासूनदूर राहिल्यानें इतकें भांबावून गेल्यासारखें झालें कीं त्यांना क्षुद्रबुद्धि व सापत्नभावानें प्रेरित झालेल्या सोयराबाईचा कावा व महत्वाकांक्षी अण्णाजीची स्वार्थपरायणता अगदीं दुर्बोध झाली. त्या स्वामिनिष्ठ सरकारकुनांना किंवा प्रधान मंडळाला सोयराबाई व अण्णाजी यांच्या विरुद्ध जातां येईना. इकडे अण्णाजीनें शिवाजीच्या आजार वाढत आहे ही बातमी संभाजीस न कळेल अशी पूर्ण खबरदारी घेतली व पुढें शिवाजीच्या मृत्यूनंतरहि म्हणजे त्याच्या मृत्यूची वार्ता नजर कैदेंतील ( त्यावेळीं समजल्या गेलेल्या ) संभाजीस तो पूर्ण बंदिवान केला जाईपर्यंत कळूं नये अशी व्यवस्था केली. शिवाजीच्या मृत्यूनंतर १८ दिवसांनींच म्हणजे तारीख २१ एप्रिल १६८० रोजी अण्णाजीनें सर्वाधिकार आपल्याकडे घेऊन नऊ दहा वर्षांच्या राजारामास `मंचकारोहण’ करविलें व मोरोपंतांशीं`तह’ करून तो संभाजीस कैद करण्यास रायगडाहून निघाला. अण्णाजीच्या या वरचढ वर्तणुकीनें मोरोपंताला आपल्या भावी आयुष्याचा संशय वाटूं लागून त्याच्या मनांतील अढी साहजिकच द्दढ होऊं लागली. इकडे जनार्दनपंतास व हंबीररावासहि अण्णाजीनें-बाळाजीनें नाकारिलें तरी-त्याच्या मुलाकडून जबरदस्तीनें लिहवून आज्ञापत्रें पाठविलीं होतीं; खरें पाहिलें तर हंबीरराव याचा दर्जा व राज्यांतील वजन यांकडे लक्ष दिलें तर अण्णाजीनें सर्व कारभार त्याच्या संमतीनेंच करावयास पाहिजे होता. परंतु स्वामिनिष्ठ हंबीररावास सोयराबाईचा पक्ष मान्य होणार नाहीं म्हणून अण्णाजीची खात्री होती. याकरितां अण्णाजीनें त्याच्या संमति वगैरेच्या भानगडींत न पडतां सोयराबाईस हाताशीं धरून, स्वार्थांधतेमुळे आपल्या स्वत:च्या दरार्‍यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजारामाचें बाहुलें पुढें केलें व सर्व राज्यकारभार आपणाकडे ठेवण्याची महत्वाकांक्षा धरिली. यामुळें सर्व राजमंडळ व कारकून वगैरे अण्णाजीबद्दल बरेच शंकित झाले. मोरोपंत व जनार्दनपंत हणमंते तर त्याचा पूर्वीपासूनच द्वेष करीत होते, व हंबीररावहि अण्णाजीची वर्तणूक अपमानकारक जाणून जास्तच चिडीस पेटला. जिकडे हंबीरराव तिकडे सेना व प्रजा अशी वस्तुस्थिति. तेव्हां जनार्दनपंत लागलीच अण्णाजीविरुद्ध बाजू धरुन संभाजीस जाऊन मिळाला, व हंबीररावानेंहि संभाजीशीं व इतर थोर मंडळीशीं पत्रव्यवहार करून अण्णाजी, मोरोपंत व प्रल्हादपंत यांस कराडहून जाऊन वाटेंत धरिलें व संभाजीपाशीं नेले. पुढें हंबीररावानें कुलफौज एक करून राज्य संभाजीस दिलें व संभाजी जूनमध्यें रायगडास येऊन राज्य करू लागला, व त्यानें सोयराबाईस ठार करून राजारामास कैद केले. अशा रीतीनें अण्णाजीचा डाव फसला. पुढे ४-५ महिन्यांनीं म्हणजे सप्टेंबर महिन्यांत संभाजीनें अण्णाजीस बंधमुक्त केलें व मजमूहि त्याजकडे दिली परंतु अण्णाजी झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप न पावतां उलट अपमानाबद्दल सूड घेण्याचा हट्ट धरून होता. अवरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीकडे आश्रयार्थ पळून आला त्याजजवळ अण्णाजीनें शिरके मंडळीस चिथाऊन संभाजीविरुद्ध कारस्थान केलें. तें अकबरानें संभाजीच्या भीतीस्तव स्वत:च संभाजीस कळविलें. त्यामुळें संभाजीस फार क्रोध येऊन त्यानें शिरक्यांचें शिरकाण करविलें व अण्णाजीबरोबर इतरहि मातबर मंडळीस परळीखालीं कैद करून हत्तीच्या पायाखाली तुडविलें. अशा रीतीनें या पुरुषाचा सन १६८१ च्या आगष्ट महिन्याच्या अखेरीस शेवट झाला. परंतु त्यानें केलेल्या कारस्थानाचे अनिष्ट परिणाम मात्र मराठयांना व महाराष्ट्राला कायमचे भोगावे लागले.

सारांश, शिवकालीं जितकी स्वधर्माविषयी जागृति झाली होती त्याच्या दशांशानेंहि स्वराज्यविषयी प्रेम किंवा राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली नव्हती. मुसुलमान व हिंदू यांमधील तेढ अवरंगजेबाच्या दक्षिणेंतील स्वारीनंतर जितकी तीव्रतेनें भासूं लागली तितकी ती शिवकालीं नव्हती. इंग्रजांच्या हाताखाली सेवक म्हणून वागण्यांत ज्याप्रमाणें अजूनहि समाधान मानलें जातें त्याप्रमाणेंच मुसुलमान राजाची नोकरी पतकरण्यांत समाधान किंबहुना मोठेपणा त्यावेळीं वाटे; आणि ज्या काळीं सेव्यसेवकधर्मच प्रधान असतो त्याकाळीं स्वराज्य किंवा स्वधर्मासाठी स्वार्थत्याग केला जाणें शक्य नसतें. अष्टप्रधानाच्या मिळकती व मोठाले पगार यांकडे पाहिलें तर त्या वेळचे कर्तृत्ववान् म्हणून ठरलेले पुरुषहि केवळ विकत घेतले जात असेंच म्हणावें लागेल. अवरंगजेबासारखा शत्रु हिंदुपदपादशrहीचा समूळ नाश करण्याकरितां बाहेर पडला असतां सवाईशूर संभाजीला दूर सारून राजारामासारख्या बाहुल्याला पुढे करणार्‍या स्वार्थसक्त अण्णाजीचें वर्तन चमत्कारिक वाटेल इतकेंच नव्हे तर शिवाजीच्या हाताखालीं अनुभवी व कार्यदक्ष समजल्या गेलेल्या अण्णाजींने आपल्या चुकींबद्दल पश्चाताप न पावतां हटवादीपणानें पुन्हां तितकीच भयंकर चूक करून हिंदुपदपादशाहीच्या चिंधडया उडविण्यास प्रवृत्त होणें कोणालाहि तिरस्करणीय वाटल्याशिवाय रहाणार नाहीं. परंतु त्यावेळीं परिस्थितीच अशी होती कीं पुढार्‍यांनाहि स्वार्थ व स्वामिनिष्ठा यांखेरीज अन्य संस्कृतीचा संसर्ग झाला नव्हता. मात्र या घनघोर चुकीचा परिणाम असा झाला की अण्णाजीच्या पहिल्या कारस्थानांत अडकल्या गेलेल्या प्रधान मंडळीवरील संभाजीचा विश्वास कायमचा नष्ट झाला. कित्येक मृत्युमुखीं पडले व जे राहिले ते उदासीन झाल्यामुळें नामशेष होऊन गेले. यायोगेंकरून महाराष्ट्राची कुवत ऐनप्रसंगीं नाहीशीं झाली व संभाजीसारख्या वीराला आनुवंशिक मुत्सद्दयांच्या अभावीं स्वधर्माचा बचाव करणें कठिण झालें. जिकडे तिकडे बेबनाव झाला व शिवाजीनें व इतर थोर मंडळीनी सतत अर्धे शतक आपलें रक्त सांडून व अहनिंश झटून केलेला हिंदुपदपादशाहीचा सर्व प्रयत्न अण्णाजीनें केवळ स्वार्थासाठी हटवादीपणानें वायां दवडिला. परंतु शिवाजीनें तयार केलेल्या महाराष्ट्रांत औरंगजेबाच्या इस्लामी तरवारीनें सर्रास सर्व मराठ्यांचे रक्त पडूं लागतांच महाराष्ट्राच्या नव्या पिढींत स्वराज्यविषयक भावनांचें बीजारोपण होऊन त्यांच्यांत स्वार्थ त्यागाची जागृति व परधर्मीयांविषयीं तेढ कायमची उत्पन्न झाली व मराठयांना जिवंत राहण्यासाठीं नंतर २५ वर्षेंपर्यंत आपले सर्वस्व खर्ची घालून रक्त सांडावें लागलें.

- वा. सी. बेंद्रे.