विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अतिविष ( सं. अतिविष, घुणप्रिया.) – इंग्रजींत ओकोनायटम हेटरोफिलम हें शास्त्रीय नांव या वनस्पतीस दिलेलें आहे. यांत पांढरें, काळें व पिवळे अशा तीन जाती आहेत; ह्या नांवावरून किंवा मराठी अथवा संस्कृत नांवावरून सुद्धां ही एक बचनागचीच जात असावी व ती विषारी असावी असा लागलीच बोध होतो. परंतु ती विषारी मुळींच नाहीं. मात्र वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरणानुसार तिच्या आकाररूपावरुन ती व बचनाग हीं एकाच वर्गांत येतात. ही वनस्पति हिमालयावर व इतर डोंगरपठारीस पुष्कळ आढळते.

वर्णन : बाजारांत मिळणारें अतिविष म्हणजे गांठी गांठी असलेल्या बारीक मुळया होत, त्यांचीं टोकें बारीक होत गेलेलीं असतात, लांबी एक इंचापासून दीड दोन इंच किंवा थोडी अधिक असते, जाडी तीन अष्टमांशापासून एक चतुर्थांश इंच असतें; त्यांचा बाह्य रंग करडा असून त्यांस उभ्या कांहींशा सुरकुत्या असतात व त्यांचे वर मधून मधून बारीक मुळयांचे वण असतात, व त्या सहज मोडल्या जातात; मुळयांच्या आंतील रंग पांढरा असतो, त्यास वास मुळींच नसतो, त्या पिठूळ असून निवळ कडू असतात व त्यांचे अंगीं अम्लता किंवा तुरटपणा मुळींच नसतो. अतिविष घेतांना प्रत्येक मुळी मोडून घ्यावीं, जी आंतून पांढरी पिठूळ व निवळ कडू नसेल ती घेऊं नये, त्यांत चावल्यावर जिभेवर रवरव झाली व थोडासा सुंदपणा आला तर ती मुळी कधींहि घेऊं नये, ती विषारी आहे असें समहून टाकून द्यावी.

गुण :-अतिविषाचे अंगीं विशेषत: ज्वरघ्न व शक्तिवर्धक धर्म आहेत. त्याचे अंगीं पाचक व स्तंभकहि धर्म आहेत. अर्थात त्यामुळें त्याचा उपयोग ज्वर – विशेषत: हिंवज्वर, ज्वरानंतरची अशक्तता, अपचन व उलटी होणें, हगवण व खोकला इत्यादिकांमध्यें करितात. याची साल वस्त्राला रंग देण्याच्या कामीं उपयोगी पडते.

प्र मा ण :- ज्वरामध्यें २०-३० ग्रेन पूड प्रत्येक तीन किंवा चार तासांनीं ताप अंगांत नसतांना किंवा असतांना सुद्धां घेण्यास हरकत नाहीं. हिवज्वराची पाळी टळण्यासाठीं मात्र कोयनेलप्रमाणें हें औषध पाळीच्या वेळाचे अगोदर दोन तीन वेळां पोंचेल अशा बेतानें किंवा घाम येऊन गेल्यावर तीन किंवा चार तासांनीं थोडया पाण्याबरोबर घ्यावें. शक्ति वाढण्यासाठीं किंवा इतर विकारांत पूड ५-१० ग्रेनपर्यंत प्यावी. मुलांना वयाचे मानानें प्रमाण योजावें.

काढा :-ज्वरांत हगवण असतांना अतिविष, सुंठ, कुडयाची साल, नागरमोथे व गुळवेलीचें मूळ हीं प्रत्येक सहासहा मासे घेऊन अच्छेर पाण्यांत काढा करुन चौथा हिस्सा उरवावा व त्यापैकीं थोडथोडा दिवसांतून तीन चार वेळां द्यावा.

चूर्ण :- लहान मुलांच्या ज्वरांत, हगवणींत, खोकल्यांत किंवा त्याचा कोठा बुघडून उलटी वगैरे होत असतांना अतिविषापासून चांगला उपयोग होतो. त्यासाठीं त्याची नुसतीच पूड देतात किंवा ती दुसर्‍या औषधांशीं मिश्र करुन देतात अतिविष, नागरमोथे व काकडशिंगी हीं समभाग घेऊन त्यांचें चूर्ण तयार करावें व तें मधांत मुलांस वयाचे मानानें द्यावें. पुष्कळदां समभाग पिंपळीची पूड वरील चूर्णांत मिसळतात. ह्या चार औषधांच्या चूर्णांस बालाचातुर्भद्रिका हें विशेषनांव चक्रदत्तानें दिलें आहे.

अतिविषास संस्कृत नाव घुणप्रिया हें जें दिलेलें आहे तें अगदीं अन्वर्थक आहे. म्हणजे त्यास लौकर कीड लागते अर्थात् तें किडीला प्रिय असें मानलें आहे.