विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अघोरी - अघोरी, अघोरपंथी, औगर, औघर हीं नांवें हिंदुस्थानांतील एका साधूच्या पंथाला लावितात. या पंथांतील लोक नरमांसभक्षक व इतर अघोर कृत्यें करणारे असल्यानें फार प्राचीन काळापासून यांचें नांव ऐकूं येतें.

नामार्थ - 'अघोर ' ( न घोर ) यां शिवनामापासून या पंथसंज्ञेची उत्पत्ति असल्यानें, त्याचा शैवसंप्रदायाशीं असलेला संबंध व्यक्त होतो. अघोरीश्वर या नांवानें शिवाची उपासना म्हैसूरमध्यें इक्केरीच्या देवळांत व इतर अनेक ठिकाणीं दृष्टिस पडते. या पंथाच्या अनुयायाला अघोरपंथी म्हणतात.

प्रसार - सध्यां या पंथाचा प्रसार होणें बरेंच कठिण झालें आहे. १९०१ च्या खानेसुमारीवरून पाहातां या लोकांची संख्या ५५८० होती व त्यापैकीं बरेचसे ( ५१८५ ) बिहारमध्यें व बाकीचे अजमीर, मारवाड व वर्‍हाड मध्यें आढळून आले, २ अंदमानबेटांत गुन्हेगार म्हणून होते. १८९१ सालच्या आंकड्यांपेक्षां वरील आंकडे बरेच निराळे आहेत; कारण त्यावेळीं संयुक्त प्रांतांत ६३० अघोरी व ४३१७ औगर, बंगालमध्यें ३८७७ अघोरी आणि पंजाबमध्यें ४३६ औगर नमूद केले होते. या तफावतीचीं कारणें अशीं कीं, इतर सर्व साधूंच्या वहिवाटीप्रमाणें हे लोक यात्रेकरितां व पर्वस्नानासाठीं एकसारखे इकडे तिकडे फिरत असतात; व दुसरें असें कीं, या पंथाच्या नाचक्कीमुळें खानेसुमारीच्या वेळीं यांतील बरेच जण आपला खरा पंथ लपवून ठेऊन, इतर कोणत्यातरी संभावित सदरांत आपलीं नावें नोंदवितात. जेथें यांचे मठ असत अशीं प्राचीन काळचीं प्रमुख ठिकाणें म्हणजे, अबूचा पाहाड, गिरनार, बुद्धगया, काशी व हिंगलाज होत. (पश्चिमेकडे हिंगलाजपर्यंत भारतीय अनेकेश्वरी वाद पोंचला होता.) पण सध्यां अबूच्या पाहाडावर किंवा दुसर्‍या कोणत्याहि क्षेत्री यांचे मठ किंवा काहीं पसारा आढळत नाहीं.

पंथाचा   इतिहास - ओघार्‍याप्रमाणें वर्तणार्‍या बैराग्यांचा प्रथम जो उल्लेख आढळतो, तो ह्युएन त्संगच्या प्रवासवर्णनांतील होय. अंगाला राख फांसून, कवट्यांच्या माळा धारण करणारे (कपालधारी), नागवे ( निर्ग्रंथ ) साधू त्यानें हिंदुस्थानांत पाहिले. यापुढील काळांतील कापालिकांचें विशेष वर्णन उपलब्ध आहे. शंकरविजयांत या कापालिकांबद्दल आनंदगिरीनें असें म्हटलें आहे कीं, ''चित्तेच्या राखेनें त्यांचें आंग माखलेलें असून, त्यांच्या गळ्यांत नररुंड माळा असते; त्यांच्या कपाळावर एक काळी रेघ ओढलेली असते व केंसांच्या जटा केल्या असतात. ढुंगणाला एक व्याघ्रचर्म गुंडाळलेलें असून डाव्या हातांत माणसाच्या डोक्याची कवटी व उजव्या हातांत एक घंटा घेतलेली व तोंडानें ''शंभो भैरव कालीनाथ !'' असें ओरडत तो ती एकसारखी वाजवीत जातो. मालतीमाधवांत भवभूतीनें अघोरघंट हा चामुंडादेवीला मालती बळी देत असतां तिला माधवानें सोडविल्याचें फार सुंदर कथानक दिलें आहे. प्रबोध चंद्रोदयांत कापालिक व्रताचें उत्तम वर्णन दिलें आहे. दबिस्तानांत - याचा कर्ता १६७० च्या सुमारास वारला एका योग्यांच्या पंथाची माहिती दिली आहे.  अन्नाच्या बाबतींत यांनां निषिद्ध असें कांहींच नाहीं. ते माणसांना सुद्धां मारून खातात. यांतील कांहींजण आपली विष्ठा अन्नांत मिसळून व फडक्यांत गाळून पितात, व असें सांगतात कीं या योगानें मनुष्य मोठमोठ्या गोष्टी करूं शकतो. या प्रकाराला ते 'अतिलिया' किंवा 'अखोरी' म्हणतात. गोरखनाथापासून यांची उत्पत्ति आहे असे या ग्रंथांत म्हटलें आहे. दबिस्तानाच्या कर्त्यानें असा एक माणूस पाहिला, तो आपलें नेहमीचें गाणें म्हणत एका प्रेतावर आरूढ झाला होता. त्या प्रेताला पाणी सुटेपर्यंत तसेंच ठेवून नंतर त्यानें त्यांतील मांस खाल्लें. हें कृत्य अतिशय पुण्यदायक असें ते समजतात. गोरखनाथ हा मध्ययुगांतील एक मोठा साधु होता; त्याच्यासंबंधी अनेक अद्‍भुत कथा सांगतात व कांहीं योगी त्याला आपला पूर्वज मानतात.

पं था ची स द्य: स्थि ति - हल्लीं अघोर्‍यांच्या दुष्ट चालींसंबंधी अनेक गोष्टी सांगतात. लंडन येथें १६८७ सालीं थेवेनो ( M. Thevenot ) याचा प्रवासवर्णन ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांत मुंबई इलाख्यांत भडोच जिल्ह्यांत ''डेबका'' ( Debca ) येथें एक अघोर्‍यांची वसाहत आहे असें वर्णन केलेलें आढळतें. वार्डनेंहि आपल्या ग्रंथांत ( Ward View of the Hindoos [१८१५] ii ३७३ ) अघोरी पंथानुयायांचें ("Ughorit-Punthee " ) वर्णन दिलें आहे. अबूच्या पाहाडावरील एका अघोरी वसाहतीविषयीं टॉडनें लिहिलें आहे (Tod : Travels in W. India [१८३९] p.८३ ff) फत्तेपुरी नांवाचा एक अतिविख्यात अघोरपंथी बरींच वर्षें एका गुहेंत राहात होता. त्याच्याच सांगण्यावरून शेवटीं तेथें त्याला चिणण्यांत आलें. तेथील एका संभावित गृहस्थानें टॉडला अशी गोष्ट सांगितली कीं '' नुकतेंच कांहीं दिवसांपूर्वी मी आपल्या भावाचें शव स्मशानांत नेत असतां एका अघोर्‍यानें याची उत्तम चटणी होईल असें सांगून मजजवळ तें मागितलें.'' कालिका मातेला नैवेद्य म्हणून नरमांसभक्षक अघोरी बळी देण्याकरितां माणसांना धरितात. बुकॅनन (Martin Buchanan] E. India, ii ४९२ f. ) साहेब आपल्या ग्रंथांत एका अघोर्‍याविषयीं पुढील गोष्ट लिहितो. १९ व्या शतकाच्या प्रारंभीं संयुक्त प्रांतांत गोरखपुर येथें एक अघोरी आला. येथील राजाच्या घरांत शिरून त्यानें त्याच्या अंगावर घाण टाकली तेव्हा राजानें आह्मुती ( Ahmuty ) नांवाच्या तेथील जिल्हा-न्यायाधिशाकडे तक्रार नेली. अह्मुतीनें त्या अघोर्‍याला हांकलून देण्याविषयीं हुकूम सोडला. पण पुढें लवकरच जेव्हां अह्मुती स्वत: आजारी पडला व त्या भागांतील राजाचा वारस स्वर्गवासी झाला तेव्हां त्या भागांतील लोक असें समजूं व सांगूं लागले कीं, साधूच्या अपमानाचें हे प्रायश्चित्त मिळालें. [ The Revelations of an Orderly ( Benares १८४९ ) ] या पुस्तकांत अघोर्‍यांचे अंगावर शहारे आणणारें वर्तन फार चांगलें वर्णिलें आहे व ग्रंथकर्त्यानें त्यांत शेवटीं या गोष्टी अजीबात बंद करण्याविषयीं सरकारला विनंति केली आहे. हें पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर साधूचीं नागवे हिंडण्याची वहिवाट पोलिस कायद्यानें बंद पाडली व त्यानंतर विशेष ठराव पास करवून ( ब्रिटिश हद्दींत ) नरमांसभक्षण शिक्षार्ह ठरविण्यांत आलें. तथापि अगदीं अलीकडे म्हणजे १८८७ मध्यें उज्जनीक्षेत्रांत एका यात्रेच्या वेळीं एक टोळी येऊन, तिनें तेथील अधिकार्‍यांजवळ कांहीं बकरीं मागितलीं. तीं देण्याचीं नाकारल्यावर, त्या टोळींतील लोक स्मशान-घाटावर गेले व तेथील एक प्रेत उचलून त्यांनीं तें खाण्यास सुरुवात केली. तेव्हां पाहाणारांच्या उरांत धडकी भरून त्यांनी पोलिसांना बोलाविलें; पण त्या नंग्या गोसाव्यांनीं त्यांनीं मागितलेलीं बकरीं मिळेपर्यंत आपलें खाणें बंद ठेविलें नाहीं.

ए का अ घो र्‍या चें च रि त्र -  ड्रेक ब्रॉकमन नांवाच्या इंडियन मेडिकल ऑफिसरनें मिळविलेली एका अघोर्‍याची जन्मकथा एच. बालफरनें [ JAI [१८९७] xxvi ३४० ff ] दिली आहे. हा मनुष्य जातीनें लोहार असून पंजाबांतील पतियाळा संस्थानांत राहात असे. तो प्रथम भीक मागत असे, पण पुढें एका अघोर्‍यानें त्याला आपला शिष्य केला. तो बदरीनारायण करून नंतर नेपाळांत गेला; तेथून जगन्नाथाला जाऊन शेवटीं मथुरा व भरतपुर येथें आला. भरतपुरला त्याची चौकशी झाली. त्यानें अशी जबानी दिली कीं,'' मी सध्यां कोणत्याहि जातीकडून अन्नग्रहण करितों, व जातीचा विधिनिषेध मी मानीत नाहीं. मी कोणाच्याहि हातचें खातों. मी स्वत: नरमांस खात नाहीं पण माझया पंथांतील कांही जणांना तें खाऊन पुन्हां सजीव करण्याची ताकद आहे. कांहींजवळ मंत्रसामर्थ्य असतें व तें मनुष्यांचे मांस खातात; पण माझ्यांत हें सामर्थ्य नसल्यानें मला तशी ताकद नाहीं. मी फक्त मनुष्याच्या डोक्याच्या कवटींतून अन्न खातों व पाणी वगैरे पितों. याशिवाय मी घोड्याव्यतिरिक्त सर्व मृत जनावरांचें मांस भक्षण करितों. घोडा निषिद्ध मानला आहे म्हणून खात नाहीं. माझे सर्व जातबांधवहि माझ्याप्रमाणेंच घोड्याच्या मांसाशिवाय सर्व मांस खातात.''

एक घोड्याचेंच मांस निषिद्ध कां मानिलें आहे. हा वादग्रस्त विषय आहे. कोणी म्हणतात घोडा ( घोरा ) हें नांव या पंथाच्या नांवासारखें असल्यानें अघोरी तें निषिद्ध मानीत असावेत. पण हें म्हणणें बरोबर दिसत नाहीं. उलट हिंदुस्थानांत गाईपूर्वीहि घोड्याला पवित्र मानूं लागले होते. अश्वमेधांत घोड्याला विराज् म्हटलें आहे; व अजूनहि घोड्याला पवित्र समजतात.

अ घो री पं था चा इ त र हिं दु पं थां शीं सं बं ध - आपल्या पंथांतील व्यवस्थेच्या बाबतींत अघोरी इतके मुग्ध असतात कीं, इतर पंथांशीं त्यांचे असणारे संबंध अद्याप पूर्णपणें ज्ञात झाले नाहींत. अर्वाचीन काळचा पंथ किंवा निदान काशीला ज्याचें मुख्य ठिकाण आहे त्याची शाखा, आपली उत्पत्ति एका किन्नराम नांवाच्या साधूपासून झाली असें समजते. किन्नरामाचा गुरु काळुराम गिरनार येथें १८ व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला [ Crooke, Tribes and Castes I २६ ]; म्हणून या लोकांना कधींकधीं किन्नरामी या नांवानें संबोधण्यांत येतें. अघोर्‍यांच्या धार्मिक समजुती जवळ जवळ परमहंसांप्रमाणेंच असतात. परमहंस हे ब्रह्मस्थितींत निमग्न असून त्यांना सुखदु:ख समान वाटतें; ते जगापासून इतके अलिप्‍त असतात कीं, स्वत:च्या खाण्यापिण्याचीहि त्यांना शुद्ध नसते.

जीवितसाधनांविषयीं बेपर्वाईनें वागणारा दुसरा पंथ म्हणजे सरभंगी. पण आयुष्यांतील गरजांविषयीं या दोन पंथांची बेपर्वाई अघोर्‍यांच्या दुष्ट चालींहून फार भिन्न आहे. पंजाबच्या औघर योग्यांशीं यांचा कसा संबंध आहे हें निश्चित नाहीं. अघोर्‍यांत विशेष म्हणजे ते कधींकधीं नरमांस व मल खातात.

न र मां स व म ल भ क्ष ण - अघोर्‍यांसंबंधी महत्त्वाचेप्रश्न म्हणजे पहिला, नरमांस व मल भक्षण; व दुसरा, खाण्यापिण्याकरितां मनुष्याच्या कवटीचा उपयोग, हे होत. काली,दुर्गा इत्यादि स्वरूपांत असलेल्या देवीचे शाक्त उपासक जे गूढ संस्कारविधी करितात, त्यांच्यांशीं नरमेध व नरमांस भक्षण या चालींचा मुख्यत्वेंकरून संबंध पोहोंचतो. या कालीपूजेला ५ व्या शतकांत पूर्व बंगालमध्यें सुरुवात झालेली दिसते. कालिका पुराणांत मनुष्यबलिदान करण्यास स्पष्टपणें सांगितलें आहे; मनुष्याऐवजीं खबूतरें, बकरीं व क्वचित् बैलरेडे बळी देतात. हिंदुधर्मांत असले प्रकार अनार्यांकडून घेतलेले असावेत; व तेसुद्धां भिल्लांकडून नव्हे तर पूर्वेकडील रानटी जातींकडून असावेत असे स्पष्ट दिसतें. अजूनहि आसाम वगैरे ठिकाणीं हे प्रकार घडून येतात. तेव्हां अघोरी पंथाचा हिंदुधर्मांतील या बाजूशीं निकट संबंध आहे.

कदाचित् दुसर्‍या बाजूनेंहि या चालींची उपपत्ति लागेल. रानटी जातींत आपण असें पाहतों कीं, चटके व वैदू आध्यात्मिक उन्नतीकरितां दुसर्‍यांना किळसवाणे वाटणारे पदार्थ खातात. या समजुतींत अघोरी चालीचें मूळ सांपडेल; व शैवसिद्धांताप्रमाणें सर्व गोष्टी सारख्या दर्जाच्या व हलक्या असतात, असे जें अर्वाचीन अघोरी विवरण करितो ती कल्पना वृद्धीहि अलिकडची आहे.

मा ण सा च्या क व टी चा भां ड्या प्र मा णें उ प यो ग - खाण्यापिण्याकरितां कवटीचा उपयोग करण्यांत वरच्या प्रमाणेंच हेतु असावा. अशा तर्‍हेनें उपयोगिल्या जाणार्‍या कवट्यांत विशेष जादू असते असें पुष्कळ ठिकाणीं समजण्यांत येतें. उदाहरणार्थ, पूर्व आफ्रिकेंतील वाडो (Wadoe) लोकांत राजा नेमण्याच्या वेळीं एखाद्या नवख्या मनुष्याला मारुन त्याच्या कवटीचा अभिषेक विधींत पिण्याच्या भांड्याप्रमाणें उपयोग करितात. बगडांच्या ( Baganda ) राजाचा नवीन उपाध्याय पूर्वी आपल्या जागीं असलेल्या उपाध्याच्या कवटीनें पाणी वगैरे पितो, असे केल्यानें त्याचें भूत नवीन उपाध्यायांत शिरतें अशी समजूत आहे. हिमालयांत हिमवातामध्यें मरण पावलेल्या स्त्रियांच्या कवट्या भूत वेताळांना पाचारण करण्यासाठी नगार्‍याप्रमाणें तयार करीत (Waddell,-Among the Himalayas ). या व यासारख्याच दुसर्‍या गोष्टींत असें दिसून येतें कीं, उपयोगांत आणिली जाणारी कवटी फार काळजीपूर्वक निवडलेली असते. कवटी वापरण्याची अघोर्‍यांची चाल जर याप्रमाणेंच उद्भूत झाली असेल तर ती सध्यां निकृष्ट स्वरुपाची आहे असें म्हणावें लागतें; कारण वापरावयाच्या कवट्या निवडण्यांत ते विशेष काळजी घेत नाहींत.

कवट्यांचा पात्रांप्रमाणें उपयोग करण्याची वहिवाट यूरोपखंडांत देखील आहे. प्राचीन जर्मन व केल्ट लोकांत अशी वहिवाट होती. तिच्या बापाच्या कवटींतून पेय घेण्याचा  अल्बॉईन ( Alboin ) नें जेव्हां आपल्या राणीस आग्रह केला तेव्हां त्याचें मरण ओढवलें अशी एक कथा आहे (Paulus Diaconus:Hist.Langob.ii.२८ in Gummere. Germ. Orig. I२० ) अजूनहि अशी समजूत आहे कीं, आत्महत्या करून मरण पावलेल्याच्या कवटीनें पाणी वगैरे पिण्यास सुरुवात केल्यास अपस्मार बरें होतें.

अ घो र्‍यां ना शि क्षा - माणसांची प्रेतें खाण्याबद्दल किंवा त्यांचा उपमर्द करण्याबद्दल हल्लीं पुष्कळ अघोर्‍यांना कोर्टानें शिक्षा दिलेल्या आहेत. १८६२ गाझीपूरच्या सेशन  जज्जानें एका अघोर्‍याला एक प्रेत रस्त्यावरून ओढून नेल्याबद्दल इ.पि.कोड २७०-२९७ कलमांखालीं एक वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा दिली होती. अशाच तर्‍हेचे खटले १८८२ मध्यें पंजाबांत ( रोहटक येथें ) व १८८४ सालीं डेर्‍हाडून येथें झाले होते. १८८४ त गंगेंतील एका बेटावर नरमांस खात असलेल्या एका अघोर्‍याला दोघां युरोपियनांनीं पकडलें होतें; त्याच्या झोंपडीभोंवतीं अनेक मुंडकीं व कवट्या बांबूंवर लटकत होतीं; एक तर नुकतेंच धडावेगळें झालेलें दिसत होतें.

अ घो री दी क्षा - बहुतेक साधुवर्ग नवशिक्याला दीक्षा देण्याचे मंत्र व विधि गुप्‍त ठेवितात. तेव्हां अघोरीपंथाच्या दीक्षेबद्दलची माहिती बरोबर मिळणें कठिण आहे. एकानें अशी माहिती दिली आहे कीं, त्यावेळीं गुरु शंख वाजवितो व त्याबरोबर इतर भाडोत्री वाद्यें वाजवितात. नंतर गुरु माणसाच्या कवटींत लघवी करून, ती शिष्य होऊं घातलेल्याच्या डोक्यावर ओततो व न्हाव्याकडून त्याचें मुंडन करवितात नंतर तो नवशिष्य थोडी दारू व हलक्या जातींकडून मिळविलेलें भिक्षान्न सेवन करतो; आणि कमरेला भगवें वस्त्र गुंडाळून हातांत दंड धारण करितो. या दीक्षाविधींत गुरु आपल्या शिष्याच्या कानांत कांहीं मंत्र सांगतो. असें सांगतात कीं कांहीवेळां नरमांसभक्षणहि या विधीचाच एक भाग असतो. यासंबंधीची आणखी एक माहिती अशी:- ही दीक्षा काशींत या पंथाचा उत्पादक जो किन्नराम त्याच्या समाधीच्या ठिकाणीं देण्यांत येते. त्यावेळीं समाधीवर दोन पेले, एक भांगेचा व एक दारूचा, ठेवलेले असतात. ज्यांना आपली जात कायम राखावयाची असेल त्यांनी फक्त भांग घ्यावी व ज्यांना पुरती दीक्षा हवी असेल त्यांनी दोन्ही पेयें घ्यावींत. नंतर किन्नरामाच्या वेळेपासून जागृत असलेल्या अग्नीला फळें अर्पण करण्यांत येतात. व एक जनावर ( बहुधा बकरा ) बळी देण्यांत येतें. यानंतर शिष्याचें डोकें गुरुच्या लघवीनें ओलें करुन त्याची हजामत करवितात व शेवटी जमलेल्या लोकांना मेजवानी देण्यांत येते. बारा वर्षांच्या उमेदवारीनंतर पूर्णपणें पंथांत शिरकाव होतो.

पे हे रा व व रू प - अघोर्‍यांची चित्रें जीं जमा केलीं आहेत. (Anthropological Society of Bombay ) त्यांत चिताभस्मानें आच्छादिलेलें त्यांचें शरीर दिसून येतें. ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्या एकीचें चिन्ह त्यांच्या कपाळावर असतें. रुद्राक्षांच्या माळा व सापाच्या हाडांच्या आणि रानडुकरांच्या सुळ्यांच्या कंठ्या त्यांच्या गळयांत दिसतात; व त्यांच्या हातांत एक कवटी असते. या पंथांतील कांहीं लोकांच्या गळ्यांत माणसांच्या दांतांच्या माळाहि असतात, असें ऐकिवांत आहे.