विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अथगड :- ओरिसांतील एक देशी संस्थान याच्या उत्तरेस धेनकानालचें संस्थान, पूर्वेस व दक्षिणेस कटक जिल्हा, आणि पश्चिमेस टिग्रिया व धेनकानालचीं संस्थानें आहेत. येथील जमीन सपाट व सुपीक असून येथें मुख्यत्वेंकरून भाताचें उत्पन्न होतें.

या संस्थानचा मूळपुरुष श्री. करणनीलाद्री बवार्त पाटनाईक हा होय. तो प्रथम पुरीच्या राजाचा प्रधान होता. राजानें खूष होऊन त्याला हे संस्थान दिलें असें कांहींचें मत आहे व कांही असें म्हणतात कीं, राजानें आपली बहीण त्यास देऊन हे संस्थान आंदण दिलें. संस्थानाची लोकसंख्या सुमारें चवेचाळीस हजार आहे. १९०१ मध्यें यांपैकीं फक्त २६४३ हिंदु नव्हते. ( इं. गॅ. ).