विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अठरा आखाडे - गोसाव्यांच्या अठरा संप्रदायांस हे शब्द लावण्यांत येतात. येथें अठरा हा शब्द अनेक या अर्थानें वापरण्यांत येत असावा, गोसाव्यांचे संप्रदाय खालीलप्रमाणें
आहेत :-
अघोरी; अरण्य; अवधूत; आनंद; आश्रम; इंद्र; उदासी; कानफाटया; कालवेला; गोदंड; गोरखपंथी किंवा गोरखनाथी; डवरा; नंगागिरी; निरंजनी; निर्वाणी; पुरी; भराडी; भारती; राऊळ; वन; सरभंगी.
अखाडा याचा अर्थ संप्रदाय, पंथ असा आहे; तेव्हां अठरा अखाडे म्हणजे अठरा (गोसाव्यांचे ) पंथ असा रूढार्थ निघाला. यांपैकीं अनेक पंथ त्यांमध्यें विवाह सुरू होऊन म्हणजे गोसावीपण जाऊन जातिस्वरूपाप्रत पोंचले आहेत. [ गोसावी पहा ]