विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगस - (किंवा अगासा) - ही कानडी धोब्यांची जात विशेषतः म्हैसूर संस्थानांत आढळते. मद्रास इलाख्याच्या दक्षिण कानडा जिल्ह्यांत व मुंबई इलाख्याच्या दक्षिणेकडेहि या जातीचे लोक दिसतात. १९११ च्या खानेसुमारीं सबंध हिंदुस्थानांत ११६०४७ अगस लोक दिले आहेत, त्यांपैकी ९७७७२ म्हैसूर संस्थानांत आहेत; बाकीचे मद्रास, कुर्ग इत्यादि प्रांतातून आहेत. ही जात द्राविडवंशसंभव दिसते. अगस हे शूद्र वर्णाचे समजण्यांत येत असून, यांचे धार्मिक संस्कार चालविण्यास ब्राह्मण पुरोहित बहुधा जात नाहींत.
यापैकी इतर काम करणारे एकंदर ३०१४१ असून यांत १३९४८ आपला वडिलोपार्जित धंदा करतात. या जातीच्या लोकांचा दुसरा धंदा म्हटला म्हणजे शेतकी होय. या जातीच्या निरनिराळ्या भाषांवरुन तिचे दोन प्रमुख विभाग पडले आहेत ते कानडी अगस व तेलंगी अगस हे होत. हे लोक महाराष्ट्रांस अलीकडेच आलेले असून त्यांचा मराठी अगर हिंदुस्थानी धोब्यांशी कांहींच संबंध नाहीं. तेलंगी व कानडी जातींत रोटी अगर बेटी व्यवहार प्रचलित नाहीं. तेलंगी अगस लोकांत आणखी पोटविभाग आहेत. त्यांच्यांत बहुपत्नीत्वाची परवानगी आहे. याशिवाय या जातींत बालविवाह व त्याचप्रमाणें प्रौढ विवाहही रुढ आहे. एखाद्या स्त्रीस जन्मभर अविवाहित रहाण्यास हरकत नाहीं. वरास अगर वरपक्षाकडील मंडळीस वधूची किंमत म्हणून पैसे द्यावे लागतात. त्याचें प्रमाण निरनिराळ्या भागांत कमी जास्त असून साधारणपणें तें १२ पासून १४ रुपयांपर्यंत असतें. विधवाविवाह रुढ आहे. पण वर विधुर असला पाहिजे. स्त्री जातिभ्रष्ट झाल्यास तिचे पतीस घटस्फोट करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणें स्त्रीसहि तिचा पती जातिभ्रष्ट झाल्यास त्याचा संबंध सोडतां येतो. या जातींत श्राद्ध करण्याची चाल रुढ नाहीं. बहुतकरुन त्यांची धार्मिक कृत्ये जंगम म्हणून त्यांचे पुढारी असतात ते करतात. कित्येक लोक ब्राह्मणांसहि बोलावितात. त्यांना ते पुरोहित म्हणतात. त्यांचा गुरु लिंगायत जातीचा असतो; व त्याला ते मधून मधून देणग्या देतात. निरनिराळ्या उत्सवप्रसंगी त्यांना मशाली धरण्याकरितां बोलावितात व वरिष्ठ प्रतीच्या लोकांस उजेड दाखविण्याचें त्याचें काम असतें. मुलीला नहाण आल्याची बातमी तिच्या नवर्याला कळविण्याचें काम धोब्याचें असतें.
अगस जातीचे लोक शैव व वैष्णवहि आहेत. त्यांची देवता ' लक्ष्मीदेवी ' आहे. त्याचप्रमाणें त्यांचा जातीचा देव 'भूमी देवरु ' (पृथ्वीचा ईश्वर) म्हणून आहे त्याचा उत्सव ते गौरी उत्सवाचे वेळीं ( म्हणजे ऑगष्ट – सप्टेंबरचे सुमारास ) करतात. भट्टींत कपडे जळू नयेत म्हणून, भट्टीच्या भांड्याची पूजा करितात व त्याला प्राणी बली देतात. वक्कालिग व कुरुब या सारख्या वरिष्ठ जातींतून त्यांचे जातींत लोकांस घेण्याचे त्यांचे कांही विधी आहेत. दक्षिण कानडा जिल्ह्यांत धोब्यांच्या तीन स्वतंत्र जाती आहेत, (१) कोंकणी ख्रिस्ती; (२) कानडी बोलणारे धोबी (म्हैसूरच्या अगसांशी यांचा संबंध दिसतो); आणि (३) तुलू बोलणारे धोबी. या तिसर्या जातींत वारसा मातेच्या वंशाकडे असतों. अगसांनाच ''मडिवाल '' (मडी = स्वच्छ कपडा, सोवळें ) असें दुसरें नांव आहे. अगस हा शब्द अगसि = पागोटें यापासून बनला आहे. तुलू मडिवालांत सगोत्रविवाही वर्ग आहेत. बिल्लवा जातीहून श्रेष्ठ जातींचे व ख्रिस्ती मुसलमान यांचे कपडे हे धुतात; लग्न मंडपाकरितां व प्रेतगाड्यांकरितां कपडे पुरवितात व मशाली फिरवितात. ते भूतपिशाच्च्यांची पूजा करितात. भूतांपुढें वधार्थ आणिलेल्या प्राण्याचें डोके उडविण्याचा हक्क यांचा (मडिवालांचा) असतो. मूल जन्मल्याच्या सातव्या दिवशीं परटीण त्याच्या कमरेला करगोटा बांधितें. या मडिवालांच्या संस्कारांतील चाली भटांप्रमाणें असतात. गुरिकर किंवा गुट्टिनय म्हणून कांही गांवीं यांचा एक नायक असतो. लग्नांत वधुवरांच्या संयुक्त हातांवर पाण्याची धार धरण्याचें काम यांच्यांत गुरिकराचें नसून मुलीचा बाप किंवा मामा यांचें असते. अगस लोकांना असग असेंहि नांव आहे. म्हैसूरमधील अगस लोकांप्रमाणेंच हया अगस लोकांचा एकच मूळ पुरुष आहे. त्याचें नांव ''विराघेट मडिवाल एश्वरम्.'' ह्या लोकांत गोत्रें अथवा बेदगू नांवाचे विभाग आहेत. मामेबहिणीशीं व आतेबहिणीशी विवाह लावितां येतो; मुलींची लग्नें दहा वर्षानंतर व मुलांचीं १८ वर्षांनंतर होतात. या लोकांत पुनर्विवाहाची चाल आहे; पंचांची व आप्तांची संमति असल्यास काडीमोडहि करितां येतो. हे लोक मांसाहारी आहेत व ह्यांचा दर्जा शेतकर्यांहून खालीं पण अस्पृश्य जातीहून वर असा आहे. हे लोक शिव, केदारलिंग, भवानी, मारुती इत्यादि देवतांचे भक्त आहेत. त्यांचे पुनर्विवाहाचे व मृत्यूचे संस्कार लिंगायत अगसप्रमाणेंच असतात. पूर्वजांच्या तर्पणार्थ हे महालय नांवाचा विधी करितात.
त्या लोकांची प्रत्येक खेड्यांत एक पंचायत असते व तींत एक मुख्यपंच व इतर १० सभासद असतात. मुख्यपंच लोकमतानुसार निवडला जातो. मुख्यपंच ''कोलकर '' नांवाच्या अधिकार्याची नेमणूक करितो व सभा भरण्याचे वेळीं सभासदांना बोलावण्याचें काम ह्याचेकडे असतें. गुन्ह्याबद्दल दंड केला जातो. दंडाचा २/३ भाग जातीच्या देवाला देतात व बाकीचा भाग पंचांच्या सभासदांना जेवण देण्यांत खर्च करितात. (सेन्सस रिपोर्ट १९०१-११ व, ग्याझे. )