विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकलुज - हें मुंबई इलाख्यांत सोलापूर जिल्ह्यांत माळशिरसच्या ईशान्येस ६ मैलांवर नीरा नदीच्या कांठीं एक मोठें बाजाराचे गांव आहे. लोकसंख्या सुमारें पांच हजार. पूर्वी येथें कापसाचा फार मोठा व्यापार चालत असल्यामुळें हें गांव फार भरभराटीत होते. येथें एक पडका किल्ला आहे. येथें पोष्ट ऑफिस आहे. सोमवारी बाजार भरतो. इ.स. १६८९ साली औरंगजेबानें विजापुरास प्लेगाचा उपद्रव झाल्यामुळें या ठिकाणीं आपला तळ दिला होता व येथें रोगाची सांथ हटली होती. ( ग्रांट डफ. ) कॅप्टन मूर यानें १७९२ मध्यें येथील बाजार मोठा असून येथें एक किल्ला व कांहीं सुंदर इमारती व विहिरी आहेत असें वर्णन केलें आहे. इ.स. १८०३ मध्यें जनरल वेलस्ली हा श्रीरंगपट्टणाहून पुण्याकडे दुसर्या बाजीरावास पुन्हा गादीवर बसवून देण्याकरितां जात असतां येथें तीन दिवस मुक्काम करुन राहिला होता.