विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अझोव्ह - अझोव्ह हें रशियाच्या डॉन कोसॅक्स प्रांतांतील शहर आहे. हें डॉन नदीच्या कांठीं आहे. १३ व्या शतकांत जिनोईज लोकांनीं येथें एक वखार बांधली. तिला टाना असें म्हणतात. अझोव्ह व्यापारी व लष्करी महत्त्वाचें ठिकाण होतें. १६९६ मध्यें पीटर धी ग्रेट यानें हें शहर घेतलें. परंतु तें १७११ मध्यें तुर्कांना परत दिलें. १७३९ त तें रशियन साम्राज्याला कायमचें जोडलें गेलें. त्यानंतर हें बंदर गाळ बसून बंद झालें व त्यामुळें या शहराचें महत्त्व कमी झालें. लोकसंख्या १९०० मध्यें २५२१४ होती व बहुतेक लोक मासे धरण्याचा धंदा करणारे होते.