विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अक्कलकोटचे स्वामीमहाराज - हे गेल्या शतकाच्या उत्तरार्धांत होऊन गेलेले महाराष्ट्रीय साधुपुरुष कधीं व कोठें जन्मले याविषयीं माहिती मिळत नाहीं.  अक्कलकोटास स्थायीक होण्यापूर्वी ते मंगळवेढ्यास कांहीं वर्षे होते.  तेथे दिगंबरबाबा या नांवानें लोकांस स्वामी अवगत होते पण शिष्यसंप्रदाय किंवा दैवी अंश असल्याविषयीं प्रसिद्धी मुळींच नव्हती म्हटले असतां चालेल.  उलट पुष्कळ जण त्यांना वेडा म्हणत.  स. १८५७ मध्यें स्वामी अक्कलकोटास आले.  तेथेंहि बरीच वर्षे, आपल्या गावांत कोणी महान् साधु आहे अशी फार थोड्या अक्कलकोटकरांस कल्पना होती. हैदराबाद संस्थानांतील माणिकनगर (हुमणाबाद) चे माणिकप्रभु समाधिस्थ झाल्यावर हे स्वामीमहाराज प्रकट झाले म्हणतात.

स्वामी अक्कलकोटास देहावसान होई पावेतों होते.  त्यांची कीर्ति जिकडेतिकडे पसरल्यावर राजेरजवाडे धरुन सर्व भाविक लोक अक्कलकोटची यात्रा करूं लागले.  त्यांच्या भक्तांत सर्व जातीचे व दर्जाचे लोक आहेत.  स्वामींची राहाणी व वागणूक पुष्कळांस चमत्कारिक वाटे पण त्यांत पूर्ण विरक्तता भरलेली असे.  ते कधींच कोणाच्या तंत्रानें वागले नाहींत व कोणाला कधीं त्यांनी धड उत्तर दिलें नाहीं. मात्र ते जें कांहीं बोलत तें त्यांच्या दर्शनास येणार्‍यांच्या मूक प्रश्नाला उत्तर म्हणून तंतोतंत जुळे असें सांगतात. त्यांची बरदास्त राजाला शोभेशीच असे, तरी राजविलासांत ते कधींच गुरफटलेले दिसत नसत.

स्वामींनी दाखविलेल्या चमत्कारांच्या गोष्टी पुष्कळ सांगतात.  अक्कलकोट येथील एका कडुलिंबाच्या झाडाची पानें त्यांनीं जी गोड करुन टाकिलीं ती अद्यापि तशींच लागतात असें भाविक लोक सांगतात.

शके १८०० चैत्र वद्य १२ स स्वामी  'निजानंदीं निमग्न' झाले.  समाधीच्या जागीं त्यांचें स्मारक बांधलें आहे.