विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकोला शहर - हें अकोला जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे.  उ.अ. २० ४३' आणि पू.रे. ७७ ०४'. समुद्रसपाटीपासून उंची ९२५ फूट. पूर्णा नदीस मिळणारीं मोर्णा नदी या गांवांतून वाहते.  पश्चिम तीरावर असलेल्या भागास शहर म्हणतात.  शहराभोवती भिंत आहे.  पूर्वतीरावरील भागास ताजनापेठ म्हणत असून सरकारी इमारती, सरकारी ठाणें व इतर बहुतेक चांगली वस्ती याच भागांत आहे.  पूर्वी नदीस पूर येत असे म्हणून मुसलमानांनी दोन्ही तीरावर जुम्मामशिदी बांधलेल्या आहेत.  परंतु हल्ली चांगला दगडी पूल नदीवर इ.स. १८७३ सालीं बांधलेला आहे.  पूर्वी नदीवर तरता पूल असावा अशाबद्दल कांही खुणा अजून दृष्टीस पडतात.  हें जी.आय.पी. रेलवेचें भुसावळ-नागपूर रेलवे लाइनवरील स्टेशन असून येथें सर्व गाड्या उभ्या राहतात.  म्युनसीपालिटीचें क्षेत्रफळ १६७४ एकर.  लोकसंख्या १८६७ मध्यें १२ हजार होती ती हल्लीं सुमारें तीस हजार झाली आहे.  हल्ली वर्‍हाडांत हें दुसर्‍या प्रतीचें गांव आहे.  गांवाला पाणी विहीरींचे असून मोर्ना नदीस गांवाजवळ दोन ठिकाणीं बांध घातला आहे.  पाण्याची टंचाई असल्यामुळें गांवांत बागा फार थोड्या आहेत.  हल्लीं कापशी येथें तलाव बांधून नळ आणले आहेत.  एक सरकारी बाग आहे.  येथें जिल्ह्यांतील सर्व कचेर्‍या, वाचनालयें, ख्रिस्ती मंदिरें, सराई वगैरे आहेत.  येथें श्रीरामाचें देऊळ व नाटक गृहें आहेत.  शहरातील इमारती कांही पहाण्यासारख्या नाहींत.  कापसाचा व्यापार येथें बराच चालत असून पूर्वी येथें सट्टे फार होत होते.  पण हल्लीं सट्टयाचा व्यापार कमी झाला आहे.  येथें सरकी काढण्याचे कारखानें ३० वर आणि कापूस दाबण्याचे कारखानेहि पुष्कळ आहेत.  तेलाच्या दोन गिरण्या आहेत.  एका गिरणींत सर्कीचें तेलहि काहीं दिवस काढीत असत.  एक कापडाची गिरण आहे.  येथे महूची दारूं तयार करण्याचा कारखाना आहे.  येथें मजूरी फार महाग आहे.  येथील उन्हाळा अतिशय कडक असतो.  परंतु रात्रीं थंडी पडते.  येथें जानू नांवाच्या श्रीमंत महारानें महार विद्यार्थ्यांकरतां एक वसतिगृह बांधलें आहे.  दहिदांडा दरवाज्यावरील शिलालेख हिजरी सन १११४ (इ.स. १६९७ ) असून अवरंगजेब बादशहा होता; आणि ख्वाजा अबदूल लतीफ याच्या वेळीं नबाब असदखान हा जहागीरदार होता असें लिहिलें आहे.  'इदग्यावर देखील एक शिलालेख आहे.  हिजरी सन १११६ सालीं ख्वाजा अबदूल लतीफ यानें ही इमारत पुरी केली असें लिहिलें आहे. निजामचें सैन्य आणि मराठे यांच्यांत येथें एक लढाई झाली.  वेळ नक्की कळत नाहीं. इ.स. १७९० सालीं गाझीखान पेंढारीं याचा भोसल्यांच्या सेनापतीनें या गांवासमोर पराजय केला.  येथें एक किल्ला होता.  परंतु इ.स. १८७० च्या सुमारास पाडून टाकला.  येथें ७५ वर्षांपूर्वी मुसलमान आणि रजपूत यांच्यामध्यें भांडणे होत असत.  निरनिराळ्या मोहल्यांतील मुसलमान देखील परस्परांत भांडत असत.  इ.स. १८१७ सालीं जनरल डोव्हटन हा नागपूर सर करण्यापूर्वी कांही महिनें येथे राहिला होता.  हल्ली जेथें डेप्युटी कमिशनरची कचेरी व तुरूंग आहे तेथें त्याच्या सैन्याची छावणी पडली होती.  इ.स. १८३३ साली नदींस मोठा पूर आला होता.  या गांवापासून ६ मैलांवर कान्हेरी म्हणून एक खेडें आहे.  तेथील अकोलसिंग नांवाच्या एका रजपुतानें हें गांव वसविले व त्याच्याच नांवावरुन अकोला हें नांव पडलें अशी एक येथें दंतकथा आहे.  पूर्वी येथें एक दाट जंगल होतें.  महादेवाच्या देवळाशिवाय दुसरी इमारत नव्हती.  अकोलसिंगाची पत्‍नी दर्शनास एकटी येत असे.  त्यास आपल्या बायकोचा संशय येऊन तो नागवी तरवार घेऊन तिचा पाठलाग करण्यास निघाला.  हें जेव्हां तिनें पाहिलें तेव्हां तिनें आपलें रक्षण करण्याविषयीं परमेश्वराची प्रार्थना केली.  इतक्यांत मूर्ति दुभंग झाली व तिला आंत घेतले.  तिचा नवरा तेथें आला.  परंतु फक्त तिच्या साडीच्या पदराशिवाय त्यास कांही सांपडले नाहीं.  मूर्तिच्या बाहेर ती साडी पुष्कळ वर्षे दिसत होती.  अकोलसिंगानें आपल्या बायकोविषयीं फार शोक केला व ज्याठिकाणी त्यास तिचे शेवटचें दर्शन झालें होतें त्याठिकाणी त्यानें वस्ती केली.  त्यानें एक मातीची गढी बांधली.  त्याच जागेवर हल्लीचा किल्ला बांधलेला आहे अशी आख्यायिका आहे.