विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकॅडमिक पंथ - प्लेटोचें तत्त्वाज्ञान सुमारें ९ शतकें यूरोपांत चालू होतें.  इतक्या अवधीत त्यांतील विचारांचे परंपरासातत्य नाहीसें झालें, पण त्यांवर प्लेटोनें उमटवलेला ठसा मात्र गेला नाहीं.  दुसर्‍या शब्दांत सांगावयाचें म्हटले म्हणजे, तो विचारौघ ९०० शें वर्षे अव्याहत् सुरु होता, पण त्यास निरनिराळे फांटे फुटले.  इतकीं वर्षेपर्यंत या तत्त्वज्ञानाच्या विचाराचें वळण एक होतें, म्हणून त्यांचे महत्त्व यूरोपच्या तत्त्वज्ञानाच्या वाङ्‌मयांत फार मोठें आहे. प्लेटोच्या अनुयायांत मोठेमोठे विद्वान् पंडित होते.  त्यांनी त्यांतील तत्त्वें व विचार यांस वेळोवेळीं निरनिराळें वळण दिलें. प्रथम त्यांतील फार विचार न करितां प्रमाण म्हणून मानिलेलीं आध्यात्मिक तत्त्वें प्लेटोच्या अनुयायांनीं सोडून दिलीं.  व पुढें ( प्लेटोच्या ) त्या तत्त्वज्ञानांत कार्नेडीझच्या नास्तिक मताचा व स्टोइकांच्या (सुखदुःखांविषयीं उदासीन वृत्तीच्या) मतांचा समावेश झाला.  त्यांतील प्रमाणवादाचें रुपांतर संभाव्यवादांत झालें.

प्लेटोपासून सिसरोपर्यंत प्लेटोनें प्रतिपादिलेल्या तत्त्वज्ञानांत जो फरक झाला, त्याचे खालीं दिल्याप्रमाणे ४ भाग पडतात.  

(१) प्लेटोची कल्पनासृष्टीची उपपत्ति त्याच्या दोन शिष्यांस ( झेनोक्रित व स्ययुस्टिपस यांस) मान्य नव्हती. (उदाहरनार्थ) त्याचें मत असें होतें कीं, वस्तूंचे गुणधर्म त्या वस्तूंच्या अस्तित्वास कारणीभूत होत नाहींत.

(२) ''सर्व वस्तूंमध्यें ऐक्यता आहे व तिच्या योगानें निश्चित ज्ञान मिळविण्यास मदत होते,'' हीं प्रमेंयें अर्सीलाऊसच्या काळापर्यंत मान्य होतीं; त्यांच्या खरेपणाबद्दल पुढे संशय उत्पन्न झाला, व ती वगळिलीं जाऊन, या पंथाच्या अनुयायांत अज्ञेयवादास सुरवात झाली.

(३) अकॅडेमीक तत्त्वज्ञानांत कॉर्नेडीझच्या नास्तिक मतांचा म्हणजे शंकावाद अथवा इंद्रियद्वारा वस्तूचें अयथार्थज्ञान या तत्त्वाचा पुढें समावेश होऊं लागला.

(४) या काळांत भिन्न तत्त्वांचें, शाखांचें व सरणीचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न प्लेटोच्या अनुयायांनी केला.