विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजामिल - पूर्वी, कान्यकुब्ज देशांत राहणारा एक ब्राह्मण होता. यानें, मातापितरांचा, व विवाहित स्त्रीचा त्याग करून, एक शूद्र स्त्री बाळगून, तिच्याशीं विषय सेवन करण्यांत आपलें अमूल्य आयुष्य प्राय: घालविलें. एकदां यानें, तिला झालेल्या संततींतील नारायण नांवाच्या कनिष्ट पुत्रास सहजरीत्या हांक मारण्याच्या संधीस, विष्णुदूतांचा, व यमदूतांचा संवाद श्रवण केला, तो केवळ याच्याच विषयींचा असल्यामुळें, यास अनुताप होऊन, यानें, त्या दासीचा, व तिच्या संततीचा तत्काळ त्याग करून, उर्वरित आयुष्य गंगाद्वारीं जाऊन भगवद्ध्यानांत घालविलें, त्या योगानें यास उत्तम लोकाची प्राप्ती झाली. ( भाग. षष्ठ. अ. १-२ ).