विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अझमगड गांव - हें गांव संयुक्त प्रांतांत, अझमगड जिल्ह्यांत टोन्स नदीच्या कांठीं असून, बंगाल आणि नार्थवेस्टर्न रेलवेचें स्टेशन आहे. लो. सं. ( १९०१ ) १८८३५०. हें गांव गौतम राजाच्या मुलांपैकीं अझमखानानें १६६५ त, स्थापिलें. या गांवाभोंवतीं टोन्स नदी असल्यामुळें पुरांपासून गांवाचें नुकसान होतें; याकरितां १८९८ च्या सुमारास गांवा-भोंवतीं एक तट बांधिलेला आहे. १९०३-४ सालीं येथील म्युनिसिपालिटीचें उत्पन्न १९००० रु. होतें. येथें साखर स्वच्छ करण्याचे व कापड विणण्याचे कारखाने आहेत. या गांवांत २ हायस्कुलें, एक हॉस्पिटल व ७ प्राथमिक शाळा आहेत.