विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अदिचनल्लुर – तिनिवेल्ली जिल्ह्यांतील ( मद्रास इलाखा) श्रीवेंकटम् तालुक्यांतील एक खेडें. हें उत्तर अक्षांश ८० ३८’ व पूर्व रेखांश ७७० ५०’वर असून श्रीवेंकटम् शहरापासून तीन मैलांवर व पालमकोट्टापासून १५ मैलांवर आहे. हें ताम्रपर्णीनदीच्या उजव्या तीरावर वसलें आहे. इ. स. १८९९ व त्याचे पुढील वर्षांत पुराणवस्तुससंशोधन खात्याचे सुपरिन्टेंडन्ट री साहेब यांच्या देखरेखीखालीं झालेल्या खोदणींत असें आढळून आलें आहें कीं दक्षिण हिंदुस्थानांत आतां पावेतों सांपडलेल्या स्मशानभूमींपैकीं ही सर्वात मोठी व इतिसहपूर्वकालीन आहे. ताम्रपर्णीनदीच्या दक्षिण तीरावर एका भागांत शेंकडों नृतांचे अवशेष घालून पुरलेलीं भांडीं सांपडली आहेत. म्हणून या जागेच्या लगतची १०० एकर जागा सरकारनें संशोधनाकरितां राखून ठेवली आहे. हीं भांडीं ३ पासून १० फूट खोल व एकमेकांपासून ६ फूट अंतरानें पुरलेलीं आढळतात. या भांडयांतील अवशेष व इतर वस्तू अजून चांगल्या स्थितींत सांपडतात. शुद्ध सोन्याचे दागिने, लोखंड व कांसें यांचीं अपूर्व व उत्तम कारागिरीचीं भांडीं व तसेंच मातीचीं भांडीं सुमारें १२०० वस्तू आतांपर्यंत मिळाल्या आहेत. लोखंडाच्या वस्तू म्हणजे टांगायचे दिवे, तलवारी, भाले, चाकू, हातोडे, अंगठया, बांगडया, त्रिशूळ, तिवया वगैरे होत. तसेंच कांशाच्या वस्तू म्हणजे पेले, सुबक नकशीच्या सुरया, वाडगे व सुंदर दिवे. ह्या सर्व वस्तू मद्रास येथील पदार्थसंग्रहालयांत जतन करून ठेवण्यांत आल्या आहेत. लोकांत अशी एक दंतकथा आहे कीं, पुरातन कालीं या ठिकाणीं एक मोठें शहर होतें. रीसाहेबांचें मत असें आहे कीं हें शहर पाण्डयराजांच्या वेळचें असावें; व प्रेतें पुरण्याच्या पद्धतीवरून या मतास पाठिंबा मिळतो. संशोधनाचें काम चालू आहे व त्यामुळें पूर्व इतिहास जास्त स्पष्ट होईल [ इं. गॅ. ५].