विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्रोर - हझारा जिल्ह्यांत मानशेर तहशिलींत असलेलें वायव्य सरहद्दीवरील एक खोरें. उत्तर अक्षांश ३४.२९ ते ३४.३६ व पूर्व रेखांश ७२.५८ ते ७५.९. लांबी १० मैल, रुंदी ६ मैल. खालच्या अंगाच्या भागांत खेडीं, झोंपड्या व राया जिकडे तिकडे दिसून येतात व येथें पीक उत्तम येतें. व सभोंवर पाईन झाडांनीं ( पांगारा ) आच्छादित पर्वत उंच आकाशांत गेलेले आहेत. हा प्रदेश सारखा सपाट नसून एकावर एक जिन्याच्या पायर्‍यांप्रमाणें चढत गेला आहे. येथें पाणी मुबलक असल्यामुळें पीक क्वचितच बुडतें. येथें स्वाति व गुजर लोकांची वस्ती विशेष आहे. लोकसंख्या सुमारें सतरा हजार. येथील बहुतेक लोक इस्लामी धर्माचे आहेत. राजतरंगिणीमध्यें या प्रदेशाचा उल्लेख अत्युग्रपुर या नांवानें आलेला आहे. तैमुरलंगच्या काळापासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हा प्रांत कर्लुख तुर्कांच्या घराण्याकडे होता. इ.स.१७०३ मध्यें जलाल बाबा सय्यद नांवाच्या माणसानें त्यांस हुसकावून देऊन तो प्रांत स्वाति लोकांत वांटून दिला. इ.स.१८३४ मध्यें अम्ब येथील नबाबानें हें खोरें घेतलें परंतु इ.स.१८४१ मध्यें शीख लोकांनीं तो प्रांत पुन्हा सादुद्दिनचा वंशज अटा महमद यास दिला. शीख मुलूख खालसा करतांना अटा महमदाला अग्रोरचा ( चीफ ) संस्थानिक करून सरहद्दीच्या या भागाचा बंदोबस्त त्याकडे सोंपविण्यांत आला. परंतु ही व्यवस्था सुरळीत चालली नाहीं म्हणून इ.स.१८५२ मध्यें एक सैन्य धाडावें लागलें व १८६८ मध्यें एक पोलीस ठाणें या खोर्‍यांत ठेवण्यांत आलें. खानाला या गोष्टीनें राग आला व त्यानें डोंगराळ मुलुखांतील जमातींना चिथवून तें ठाणें जाळून टाकलें. तेव्हा सैन्य धाडून त्याला पदच्युत करून लाहोर येथें आणून ठेविलें. परंतु इ.स. १८७० मध्यें त्यास पुन: ( चीफ ) संस्थानिक नेमिलें. त्याचे मागून त्याचा मुलगा अल्ली गहोर हा संस्थानिक झाला. परंतु त्यानें ब्रिटिश मुलखांत स्वार्‍या करण्यास मदत केल्यामुळें त्याला दूर करण्यांत आलें. व इ.स.१८९१ च्या अग्रोर व्हॅली रेग्युलेशन प्रमाणें त्याचें संस्थान सरकारजमा करण्यांत
आलें.

इ.स.१९०१ मध्यें जमिनीची पहाणी होऊन सध्या उत्पन्न १३३०० रु. आहे.

येथें फक्त कापसाचें कापड तयार होतें. या खोर्‍यांतील मुख्य गांव ओघी खेडें आहे. तेथें हझारा सरहद्दीवरील सैन्याचें एक पोलीस ठाणें आहे.