विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतीत : - सातारा जिल्ह्यांतील एक गांव सन १७३० मध्यें रामचंद्र पंडित अमात्य यास सरंजाम दिला त्यांत मौजे अतीत ( तालुके तारगांव, तर्फं हरचेरी ) याचा उल्लेख आहे. (रा. खं. ८.१२२.२५१). शके १६१८ कार्तिकमध्यें सेनापति धनाजी जाधव यांनी स्वशिक्क्याचें पत्र लिहून अतीत वगैरे गांवाच्या देशमुखी हक्काबद्दल तंटा होता त्याचा निकाल केला, व महादजी जगदाळे याजकडे सदरहू देशमुखी असल्याबद्दल कळविले (रा. खं. १५.४८.९३ ).
अतीत :-या जातीच्या लोकांना कच्छमध्यें दुसरीं अनेक नांवें आहेत. (१) गिर (२) पर्वत (३) सागर (४) पुरि (५) भारती (६) वन (७) अरन (८) सरस्वती (९) तीर्थ व (१०) आश्रम असे पोटविभाग या जातींत आहेत. आपल्या पोटजातीचें नांव आपल्या नांवापुढें लावण्याची चाल या लोकांत आहे. जसें : - चंचळ भारती वगैरे. या जातींतील लोकांना ब्रह्मचारी रहातां येतें, अगर गृहस्थाश्रम घेतां येतो. पहिल्या प्रकारच्या लोकांना मठधारी व दुसऱ्या प्रकारच्या लोकांना घर्बारि म्हणतात. हे मद्यमांस सेवन करितात. बरेच लोक भीक मागून उदरनिर्वाह करतात. परंतु इतर धंदे करण्याचीहि त्यांना मुभा आहे. यांना गोसावी असेंहि म्हणतात. हे जानवें घालीत नाहींत; यांना पुनर्विवाह संमत आहे. यांचीं मुख्य ठिकाणें म्हणजे भुजमधील कल्याणेश्वर, अंजार येथील अजेपाल आणि पश्चिमेकडील कोटेश्वर होत. बहुतेक अतीत शैव असतात. मेल्यावर यांच्या समाधी बांधून त्यांवर लिंग बसवितात. आसामांतहि यांची थोडीशी वस्ती आहे. [ Ind. Ant. V. i68. मुं. गॅ. सेन्सस रिपोर्ट.]