विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजयसिंह - ( इ. स. १२९०-१३०१ ) :- चितोडचा राणा लखमसीच्या पश्चात् चितोडचा खरा वारस अजयसिंह हा मेवाडच्या पश्चिम सरहद्दीवर अरवली डोंगराच्या खोर्‍यांत केळवाडा नामक स्थळ आहे तेथें जाऊन राहिला. लखमसीनें जोहारास निघते समयीं (लखमसी पहा ) अजयसिंगास असे सांगितलें होतें कीं तूं वृद्ध होऊन राज्य पाहण्यास असमर्थ होशील तेव्हां तुझ्या मागून तुझा वडील भाऊ ऊरसिंह हा प्रारंभीं या लढाईंत मेल्यामुळें त्याच्या पुत्रास ( हमीरास ) राज्यावर बशीव. अल्ला-उद्दिनाच्चा हातीं चितोड आल्यावर तो कांही दिवस तेथें राहिला व तेथील देवळें वगैरे उध्वस्त करून त्यानें तें शहर झालोरच्या मालदेव नांवाच्या आपल्या एका सामंताच्या स्वाधीन केलें. मेवाडांत दिल्लीचे शिपाई व स्वार जिकडे तिकडे रक्षणास ठेवले होते. त्यांच्या शिवाय अजयसिंहास डोंगरांतील भील वगैरे लोकांच्या नायकांशींहि झगडावें लागत असे. या सर्वांत पंजा भील म्हणून एक अतिशय बलिष्ठ नाईक होता. त्यानें एकदां शेरो नाल्यावर स्वारी केली व अजयसिंहाशीं गांठ घालून त्याच्या मस्तकावर भाल्याचा वार केला. अजयसिंहास सज्जन-सिंह व अजिमसिंह असे अनुक्रमें चौदा व पंधरा वर्षांचे दोन पुत्र होते, परंतु ते ह्या संकट प्रसंगी कामास आले नाहींत म्हणून अजयसिंहानें हमीर आजोळीं होता त्यास बोलावणें पाठविलें व मुंजाचा सूड घेण्याविषयीं त्यास आज्ञा केली. तेव्हां थोडक्याच दिवसांनी हमीर मुंजाचें शीर कापून आपल्या चुलत्याकडे घेऊन आला व तें त्यानें त्याच्या पुढें टाकलें. तेव्हां अजयसिंह खुष झाला व तुझ्या कपाळीं दैवानें साम्राज्योपभोग लिहिला आहे असें म्हणून त्यानें आपल्या पुतण्याच्या कपाळीं मुंजाच्या रक्ताचा टिळा लावला. अजयसिंहाच्या दोन मुलांपैकीं धाकटा अजिमसिंह राहिला त्यानें हमीराशीं आपल्या पश्चात् राज्याकरितां भांडूं नये म्हणून अजयसिंहानें त्यास देशाबाहेर पाठविलें. सज्जनसिंह मेवाड सोडून निघाला तो दक्षिणेंत आला व तेथें पुढें त्याच्या कुलांत शिवाजी उत्पन्न होऊन त्यानें महाराष्ट्र देश मुसुलमानांपासून स्वतंत्र केला; मेवाडच्या बखरींत अजयसिंहा पासून शिवाजीपावेतों अजयसिंह, सज्जनसिंह, दलीपसिंह, शिवजी, भोराजी, देवराज, उग्रसेनर, माहूलची, खेलूजी, जन-कोजी, सटवाजी, संभाजी आणि नंतर छत्रपति शिवाजी असा वंशवृक्ष दिला आहे. लोकहितवादींनीं माहूलजीच्या जागीं मालोजी व संभाजीच्या जागीं शहाजी अशीं निराळीं नांवें दिलीं आहेत. [ टॉडचें राजस्थान ]