विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजमीढ :- १ पुरुवंशांतील सुहोत्रास ऐक्ष्वाकीपासून तीन पुत्र झाले. त्यापैकीं ज्येष्ठपुत्र अजमीढ यास तीन स्त्रियांपासून ६ पुत्र झाले. पहिली धूमिनी इचा पुत्र ऋक्ष; दुसरीनीली, इचे पुत्र दुष्यंत व परमेष्ठी; तिसरी केशिनी, इचा पुत्र जन्हु, यानेंच गंगा प्राशन केली ( म. भा. आदिपर्व अ. ९४ )
२ हस्तिनापूर वसविणारा सोमवंशोद्‍भव हस्ति याचा नातु विकुंठनाचा पुत्र यास ४ भार्या-कैकयी, गांधारी, विशाला व ऋक्षा यांपासून एकंदर २४ पुत्र झाले. ऋक्षेचा मुलगा संवरण वंश स्थापक होय. ( म. भा. आदि. अ. ९५ )
३ अजमीढ, द्विमीढ व पुरुमीढ हे तिघे हस्तीनराचे पुत्र होत. अजमीढापासून कण्व व त्यापासून मेधातिथी झाला. त्याजपासून काण्वायन ब्राह्मण झाले. अजमीढाचा दुसरा पुत्र बृहद्दिषु ऋक्ष नांवाच्या पुत्रापासून संवरण व संवरणाचा कुरु यानेंच कुरुक्षेत्र हें धर्मक्षेत्र केलें. ( विष्णुपुराण ४।१९ )

भरद्वाज ( वितथ ) याचा मुलगा मन्यु, मन्यूचा बृहत्क्षत्र व बृहत्क्षत्राचा हस्ती हा पुत्र असून त्याचा पुत्र अजमीढ अशी परंपरा भागवत पुराणांत सांपडते (भागवत ९।२१।३०) ही परंपरा इतर पुराणांत वेगळी आहे. अजमीढाच्या वंशजांनाहि अजमीढ असें संबोधण्यांत येतें.