विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अत्राफ इ बाल्डा – हैद्राबाद संस्थानांतील एक जिल्हा. याचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. मुशी व मांजरा या नद्या या जिल्ह्यांतून वाहतात. संरक्षित व इतर जंगलांत चित्ते, अस्वल, तरस व कधीं कधीं वाघ वगैरे श्वापदें आढळतात. तळीं व पाण्याचे प्रवाह पुष्कळ असल्यामुळें या जिल्ह्यांतील हवा सर्द आहे व पावसाळयांत मलेरिया तापाचा आजार बराच सुरू असतो. आक्टोबर ते मार्चपर्यंत हवा निरोगी असते. वार्षिक पाऊस सरासरी ३३ इंच पडतो.
इ ति हा स – हा जिल्हा ११५० ते १३२५ पर्यंत वारंगळच्या काकतीय राजांच्या ताब्यांत होता; परंतु मुसलमानांनीं दख्खन जिंकिल्यापासून तो त्यांच्याच ताब्यांत आहे. सुलतान महमदशहा ब्राह्मणी ह्याच्या कारकीर्दींत तेलंगणचा सुभेदार स्वतंत्र होऊन त्यानें १५१२ त सुलतान कुली कुतुबशहा ही पदवी धारण केली. अवरंगजेब बादशहानें हा जिल्हा कुतुबशाही राजांपासून घेऊन दिल्लीच्या साम्राज्यास जोडला; पुढें अठराव्या शतकाच्या पूर्वार्धांत हैद्राबाद संस्थानची स्थापना होऊन त्यांत ह्या जिल्ह्याचा समावेश झाला.
हैद्राबादच्या पश्चिमेस गोवळकोंडयाचा किल्ला ही कुतुबशाही राजांची राजधानी होती.
हैद्राबाद शहर सोडून इतर भागाची लोकसंख्या सुमारें सवाचार लक्ष आहे. शें. ८७ लोक हिंदू आहेत; व ते तेलगू भाषा बोलतात.
शे त की :- बहुतेक जमिनींत वाळूचें प्रमाण जास्त आहे. ज्वारी, बाजरी व तांदूळ हीं येथील मुख्य पिकें होत.
कंकर, बासाल्ट व ग्रानाइट हे खनिज पदार्थ या जिल्ह्यांत सापडतात. अंबरपेट तालुक्यांत अशुद्ध सोडा ( crude car-bonate of soda) व पाटलूर तालुक्यांत शहाबादी दगड सांपडतात.
व्या पा र आ णि द ळ ण व ळ ण :-चांदूर येथें साडया व हातरुमाल, आणि असफनगर येथें तांब्याचीं व पितळेचीं चांगलीं भांडीं होतात. ज्वारी, तांदूळ व इतर धान्यें, कापूस, गूळ, तंबाखू, कातडीं, हाडें, वगैरे पदार्थ या जिल्ह्यांतून बाहेर जातात व मीठ, अफू, रेशमी सुती कापड, केरोसीन वगैरे जिन्नस बाहेरून येतात. हैद्राबाद हें व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे; पण इतर पुष्कळ ठिकाणीं दर आठवडयास बाजार भरतो.
निजाम स्टेट रेलवे या जिल्ह्यांतून पूर्वपश्चिम गेलेली आहे. हैद्राबादहून हैद्राबाद गोदावरी व्हॅली, हा आगगाडीचा फांटा निघतो. हैद्राबादहून पांच सडका निघतात. पहिली शामसाबादवरून महबूबनगरला; दुसरी नलगोंदला तिसरी बिबिनगरवरून
भोंगीरला; चवथी मेदचलला, पांचवी लिंगपलीवरून पतंचेरुला जाते. दुसरी एक सडक धारुरवरून कोहीरला जाते.
रा ज्य व्य व स्था व गै रे :- या जिल्ह्यांत सहा तालुके आहेत. मेदचल, जकल, पतलूर, असफनगर, अंबरपेट, शहाबाद, दोन तालुक्यांचा एक विभाग करून त्यावर तालुकदार नेमिलेला असतो, व प्रत्येक तालुक्यावर तहसिलदार असतो. या जिल्ह्यांत लोकल बोर्डें अद्याप स्थापन झालेलीं नाहींत. हैद्राबाद संस्थानांतील इतर जिल्ह्यांच्या मानानें हा जिल्हा शिक्षणाच्या बाबतींत बराच पुढें गेलेला आहे. १९०१ मध्यें शें ३-५ लोकांना लिहितां वाचतां येत होतें.