विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगर - रेवाकांठा एजन्सींत सांखेड मेहवा म्हणून एक संस्थान आहे, त्यांत २७ लहान पोटविभग आहेत. त्यांत अगर हा एक आहे. सांखेड मेहवाच्या चोहाण संस्थानसंघांत जे आठ तुकडे आहेत त्यांत अगर हा एक तुकडा आहे. १८७९ सालची अगर संस्थानासंबंधीं बाँबे गॅझीटियरमध्यें खालील माहिती सांपडते :-
संघ संस्थान गांवें चौरस मैल उत्पन्न खंडणी गायकवाडांस
पौं. पौं. शि.
चोहाण अगर २८ १७ १००० १८ १२
अगरच्या उत्तरेस, व पूर्वेस वनमाल, दक्षिणेस कामसोली आणि पश्चिमेस वजिरिया आहे. अगर सांखेड मेहवाच्या मध्यांत आहे. येथील जमीन कांहीं चिकण मातीची व कांही रेताड आहे. कापूस, ज्वार, तीळ, तांदुळ व हरभरे येथें पिकतात. बहुतेक वस्ती भिल्लांची आहे. येथील शेतकी सुधारलेली नसून उलट अव्यवस्थित दिसते. अगर आणि वजिरिया यांच्या मध्यभागीं मोठ्या सडकेवर कुक्रेज किल्ल्याचा अवशेष दृष्टीस पडतो. हा किल्ला बराच प्राचीन आहे असें म्हणतात. (बांबे गॅ. भाग ६)
अगर - (शिंदेशाही) मध्यहिंदुस्थानच्या ग्वाल्हेर संस्थानांतील शाजापुर जिल्ह्यांत असलेलें शहर व सैन्याचें राहण्याचें ठिकाण. हें समुद्रसपाटीपासून १७६५ फूट उंचीवर असून उज्जनी पासून सडकेनें ४१ मैल दूर आहे. उ.अ. २३० ४३० पू. रे. ७६० १ लोकसंख्या सुमारें अकरा हजार. हें शहर दोन तलावांच्या मध्ये वसलेलें आहे व त्याच्या सभोंवार तटबंदी आहे. १० व्या शतकांत अग्राभिल्लानें ह्या ठिकाणी वसाहत केली. व त्याच्यावरुन या शहरास अगर हें नांव पडलें. लवकरच तें झाल रजपुतांच्या हातीं गेलें. अठराव्या शतकांत धारच्या यशवंतराव पवारानें तें जिंकून घेतलें. इ.स. १८०१ मध्यें बापूजी शिंदे यानें स्वारी केली व शहर उध्वस्त केलें पण दौलतराव शिद्यानें तें पुन्हां बांधलें. इ.स. १९०४ मध्यें ते त्याच नांवाच्या जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें. येथें धान्य व कापूस यांचा व्यापार मोठा चालतो. येथें एक कमाविसदारची न्यायकचेरी, एक शाळा, टपाल कचेरी आणि दवाखाना आहे. रटरिया तलावाच्या पलिकडे सैन्याची वस्ती आहे. इ.स. १८५७ मध्यें येथें शिंद्याची मदत फौज होती. (इंपी.ग्या. १९०८ )