विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अखलकोप - हें सुमारें तीन हजार लोकवस्तीचें गांव अष्ट्याच्या ईशान्येस ४ मैल व तासगांवच्या पश्चिमेस ११ मैल आहे.  हें गांव कृष्णानदी ज्या ठिकाणीं पश्चिमेकडून दक्षिणेकडे वळसा घेते त्या ठिकाणी उजव्या तीरावर आहे.  यांतून दुसर्‍या तीरावर असलेल्या भिलवडी खेड्यास कृष्णानरीच्या पुलावरुन जातात व तासगांव आणि अष्ट्याकडे जाण्यास कच्चा रस्ता आहे. कृष्णानरीची काळी माती यांत असल्यामुळें हें खेडें फार सुपीक आहे व यांत शेतकीची जमीन फार आहे.  यांत दत्तात्रेय आणि म्हसोबा यांचीं दोन देवळें आहेत.  दत्तात्रेयाच्या देवळांत तीन वेळां, मार्गशीर्ष पौर्णिमेस, माघांत कृष्णपक्षांतील पंचमीस, व आश्विनांत द्वादशीस यात्रा भरते.  दत्तात्रेयाचें देऊळ अखलकोपच्या देशपांड्यांनी पहिल्यानें बांधिलें व रा. कृष्णराव त्रिंबक बापट यांनीं (हे त्या वेळेस वळव्याचे मामलेदार होते) सन १८६० त पुन्हां बांधिलें.  देवळांत दत्ताच्या पादुकांची स्थापना केलेली आहे.  देवस्थानाकडे ११ रु. १२ आणे सार्‍याची जमीन लावून दिली आहे.  अखलकोपांतील व जिल्ह्याच्या दुसर्‍या भागांतील व्यापारी व शेटसावकार या देवस्थानास द्रव्यद्वारा किंवा अन्य तर्‍हेंनें मदत करितात.  यांत म्हसोबाचें जें देऊळ आहे, तें मूळ गणपतीचें होतें, असे कृष्णामाहात्म्यांत सांगितलें आहे.  त्यांत एप्रिल महिन्यांत यात्रा भरते व यात्रेकरूंत मांग, रामोशी व मराठे यांचीच संख्या फार असते. म्हसोबाच्या देवळाकडे ज्या इनाम जमीनी लाविल्या आहेत,  त्यावर सरकारपट्टी १३० रु. आहे व त्यांत सुमारें ५०० रु.चें उत्पन्न होतें. (बांबे ग्या. )