विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अडुळसा :- या वनस्पतीचीं झाडें आपल्या देशांत सर्व ठिकाणीं सांपडतात.
नांवें :- संस्कृत-वासक, वासा, अटरुष इ०; म० अडुळसा; बं० बाकस, वासक; हिं० अरुषा; उरिया-वासं; का० आडूसा, आडसोगे; ते० अडसर; ता० अघडोडे; गु० अडूसो; Latin-Adhatoda; English-Adhatoda Vasaka.
व स्तु क्षे त्र :- हिंदुस्थानांतील बहुतेक उष्णप्रदेशांत ४०००० फूट उंचीपर्यंत हें झाड सांपडतें. हिमालयाचे खालील भागांत हीं झाडें विपुल असून पूर्व हिंदुस्थानांत साधारण व पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानांत तुरळक तुरळक आहेत. या झाडांचीं बनेंच्या बनें आढळतात. कोठें कोठें कुंपनाकरितां यांची लागवड केली जाते.
उ प यो ग - औषध, रंग, खत वगैरे कामाकरितां याचा उपयोग करतात. याशिवाय ही वनस्पति कृमिनाशकहि आहे.
पुरातन कफविकार, दमा व क्षय या रोगांवर या वनस्पतीचा उपयोग होतो. जॅकवुडच्या किसाबरोबर ( करवतीनें कापलें असतां पडणारा चुरा ) याचीं पानें उकळलीं असतां पिवळा रंग तयार होतो. यांच्या अंगीं कृमिनाशक धर्म असल्यामुळें किंवा यांत बरेंच पालाश ( पोटॅश Potash ) असल्यामुळें खताकरितां ह्या पानांचा उपयोग करतात. मौक्तिकभस्म तयार करण्याकरितांहि या वनस्पतीचा उपयोग करतात. या झाडांपासून बंदुकीचे दारूकरितां कोळसा व बंगालमध्यें मणि तयार करतात.
नाग टेकडयांवर या झाडांच्या बुंध्याचा शकुन पाहण्याकडे उपयोग करतात. ही वनस्पति कृमिनाशक किंवा कोथघ्न आहे यासंबंधीं बराच मतभेद आहे. या वनस्पतींत आल्कलॉइड आहे असा शोध हूपरनें लावून त्यास व्हॅसिसाइन (Vacisine) असें नांव दिलें. टार्ट्रेट हें बाजारांत मिळतेंच परंतु त्याच्या इतकेच गुणकारी दुसरे कमिनाशक पदार्थ असल्यामुळें त्याचा फारसा उपयोग होत नाहीं. खताच्या व कृमिनाशक गुणांच्या बाबतींत पानांच्या उपयोगाविषयीं आणखी शोध लागणें अवश्य आहे.
अडुळशाचीं पानें पेरूच्या पानासारखीं दिसतात. या झाडाचें पंचांग (मूळ, पानें, फळें, फुलें, साल) औषधी आहे. व आर्य वैद्यकांत या झाडाचा पुष्कळ रीतीनें उपयोग होतो.
अडुळशाच्या पानांचा उपयोग करतात. आर्यवैद्यकांत कित्येक रोगांत अडुळशाच्या मुळाचाहि उपयोग करण्यास सांगितलें आहे. हिंदुस्थानांत सर्वत्र मिळणारी अत्युत्तम व अत्यंत उपयोगी अशी ही वनस्पति होय. परंतु तिच्याकडे जावें इतकें जनतेचें लक्ष जात नाहीं.
अडुळशाचीं वाळलेलीं अथवा ओलीं पानें चांगली जुनाट, अगर पिकलेलीं घ्यावींत. कोंवळी घेऊं नयेत. हीं पानें कडसर असून, त्यांस उग्र व चहाप्रमाणें एक प्रकारचा गंध येतो. पानें लांबट, कोऱ्हांटीच्या पानांसारखीं असतात.
रा सा य नि क पृ थ क्क र ण :- अडुळशांत ''व्हासिसिन'' ह्या नांवाचे अल्कलॉईड (क्षार) व ''अॅटॅटोडिक अॅसिड'' ह्या नांवाचें सेंद्रिय अम्ल ( Organic Acid ) असतें.
गु ण ध र्म :- कफदोषनाशक, कफसंस्त्रावी आणि वातशामक असून रक्तपित्त, क्षतक्षय यांत पडणारें रक्त थांबविण्याचा विशेष धर्म यांत आहे.
पुष्कळ दिवसांचा खोकला, श्वास, वैशेषिक कफ किंवा कफक्षयाची प्रथमावस्था ( ह्या अवस्थेंत तापाचा भर विशेष नसतो, लक्षणें तीव्र नसतात. ) व इतर कफविकार यांत अडुळशाचा अत्यंत उपयोग होतो. परंतु तीव्रज्वरपरीत रोगी असल्यास मात्र ह्याचा व्हावा तसा नीट परिणाम होत नाहीं. जुनाट रोगांत विशेषत: अडुळशा बरोबरच पिंपळी दिली असतां विशेष उपयोग होतो. ( Dr. U. C. Dutt, Hindu Materia Medica ). अडुळसा कडु, थंड असून कावीळ, रक्तपित्त, कफज्वर, क्षय, श्वास यांचा नाश करणारा आहे. (राजनिघंटु). ऊर्ध्वग व अधोग रक्तपित्ताचा नाश करणारा आहे (गण). हृद्रोग, वांति, कुष्ठ, तहान, इत्यादिकांत उपयोगी आहे ( धन्वंतरी ). ज्वर, मेह, अरुचि, यांत उपयोगी असून, वातुळ व कफनाशक आहे (केयदेव नि.). येणेंप्रमाणें निरनिराळया गुणदोष निघंटूंत त्याचे गुणधर्म दिलेले आहेत. क्षयरोगावर अडुळसा हें अत्यंत उपयोगी औषध आहे असा समज होता, परंतु सर्वच क्षयांवर याचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं.
अडुळशाच्या पानांचा रस काढून तो अतिसार व संग्रहणींत देतात. विशेषत: रक्तातिसार व पित्तसंग्रहणी यांत उत्तम उपयोग होतो.
पानें वाळवून त्यांचें धुम्रपान केलें असतां श्वासाचा आवेग शमतो. अडुळशाचीं फुलें व फळें कडू, सुगंधयुक्त व शामक आहेत. फुलांचा काढा अगर वाफ देऊन रस काढून तो वापरावा. कित्येक वेळां त्यांचा हिम अगर फांटहि उपयोगी पडतो. फुलांचा हिम पूयप्रमेहावर फार उपयोगी होय. क्षयरोगाच्या तापांत होणारी तगमग व भासणारी तीव्र उष्णता यांत अडुळशाच्या फुलांचें सरबत अगर हिम दिल्यास फार फायदा होतो. अडुळशाचीं फळें लसणाच्या पाकळया अगर सतापाच्या पाल्याप्रमाणें माळ करून मुलांच्या गळयांत घालतात. त्यायोगें मुलांस थंडीवार्याची फारशी बाधा होत नाहीं.
अडुळशाच्या ताज्या पानांचा गरम गरम चहा करून तो घेतला असतां थंडीवार्यापासून आलेल्या खोकल्यास फार हितावह होतो.
अडुळशाचा सुका अर्क, ओला अर्क, मद्ययुक्त अर्क (Tincture) व सरबत अशीं करतां येतात. अडुळशाचा रस अगर काढा वाफेवर आटवून गोळा तयार करतात. त्यास सुका अर्क (Dry Extract) असें म्हणतात. तोच अर्क किंचित् पातळसर राखून त्यांत मद्यार्क मिसळल्यास त्यास पातळ अर्क (Fluid Extract) असें म्हणतात. अडुळशाचा रस फिल्टरपेपर अगर फलाणीनें गाळून त्यांत शेंकडा ४० इतका उत्तम मद्यार्क मिळवून ठेवतात, त्यात मद्यार्कयुक्त अर्क अगर रस म्हणतात. सरबत तयार करून त्यांत अडुळशाचा रस समप्रमाण मिश्र करून तें पुन्हा आटवून लोहाप्रमाणें घट्ट करावें. त्यास अडुळशाचें सरबत म्हणतात. त्याचें प्रमाण वयोमान व प्रकृतिमानपरत्वें योजावें. [ वॅट. पदे. कलावैभव, भिषग्विलास २२].