विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्कलकारा - ह्यास संस्कृतमध्यें अकल्लक गुजराथींत अक्कलकरो, इंग्रजींत Pallitary Root इत्यादि नांवें आहेत. अक्कलकार्याचीं झाडें लहान असतात. त्यांची उंची सुमारें हातभर असते. बंगाल, अरबस्थान व ईजिप्त देशांत ती सापडतात. त्या देशांतून अक्कलकार्याचें मूळ हिंदुस्थानात येतें. या झाडास पिंवळ्या रंगाची झेंडूसारखी फुलें येतात. त्यांची चव मुळांप्रमाणेंच असते. ही फुलें खोकल्यावर विड्यांत घेतात (१) दांत दुखत असल्यास अक्कलकारा आणि कोरांटीचा पाला एकत्र कुटून दांताखाली धरतात (२) जिव्हा शुद्ध व्हावयास - अक्कलकारा दाढेखालीं धरुन रस गिळतात. (३) शेंदूर पोटांत गेल्यास त्या विषावर अक्कलकारा व वेखंड पाण्यांत उगाळून घेतात. अपस्मारावर अक्कलकार्याचें चूर्ण मधांत घ्यावें व नस्यही द्यावें, असें म्हणतात. जिव्हारोग जिव्हेसंबंधीं कांहीं व्यंग म्हणजे अस्पष्ट वर्णोच्चार, बोबडेपणा वगैरे विकार असल्यास अक्कलकारा तोंडात धरुन लाळ गळूं द्यावी म्हणजे हे विकार बंद होतील. संधिवातावर याचा काढा गुणकारी आहे.
(पदे – वनस्पति गुणादर्श, गुप्त. वैद्यक शब्द सिंधु, सेन-आयुर्वेदिक सिस्टिम ऑफ मेडिसिन)