विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझोर्स - किंवा पश्चिमेकडील बेटें. पोर्तुगालच्या ताब्यांतील अतलांतिक महासागरामधील एक द्वीपसमूह. लोकसंख्या (१९११) २,४२,६१३; क्षेत्रफळ ९२२ चौरस मैल. हीं बेटें उत्तर अक्षांश ३६ ५५' व ३९ ५५' आणि पश्चिम रेखांश २५ व ३१ १६' यांच्या दरम्यान वायव्याग्नेय दिशेनें पसरलीं आहेत. या बेटांचे परस्परांपासून बरेच दूर दूर असलेले असे तीन समूह असून तीं अडीच मैलांहूनहि अधिक खोल समुद्रांतून वर आलेलीं आहेत. यांपैकीं आग्नेयीकडील समूहांत सेंट मायकेल्स ( साओ मायक्युएल ), सेंट मेरी ( सान्ता मेरिआ ) व फोर्मिगस; मधल्या समूहांत फायल, पायको, सेंट जॉर्ज ( साओ जॉर्ज ), टर्सेइरा व ग्राशिओसा; आणि वायव्येकडील समूहांत फ्लोर्स व कोर्व्हो हीं बेटें मोडतात, या द्वीपसमूहांत क्षेत्रफळांत व लोकवस्तीनें सर्वांत मोठें बेट म्हटलें म्हणजे सेंट मायकेल्स [ क्षेत्रफळ २९७ चौ. मै. व लोकवस्ती (१९०१), २१,३४० ] हें होय. या बेटांपासून यूरोपच्या किनार्‍याचा निकटचा भाग ८३०० मैलांहून दूर, आफ्रिकेच्या किनार्‍याचा निकटचा भाग ९०० मैलांहून दूर व अमेरिकेच्या किनार्‍याचा निकटचा भाग १०० मैलांहून दूर आहे. तथापि तेथील हवामान व वनस्पती यूरोपखंडाशी सदृश असल्यामुळें त्यांचा यूरोपखंडाच्या बेटांत समावेश करण्यांत येतो.

भू व र्ण न - या सर्व बेटांची जमीन सारखीच चढउतारांची मिळून झालेली असून त्यांत पठाराचा प्रदेश मुळींच नाहीं म्हटलें तरी चालेल. यांपैकीं सर्वांत लहान शिखर कोर्व्होचें समुद्रसपाटीपासून ३०० फूट असून सर्वांत उंच शिखर पायकोचें ७६१२ फूट वर आहे. कांहीं थोडके अपवाद वगळल्यास समुद्रकिनारा बहुतेक उंच व सुळकेवजाच आहे. हा द्वीपसमूह उघड उघड ज्वालामुखीजन्य दिसत असून त्याचा शोध लागल्यापासून येथें जे अनेक भूकंप व ज्वालामुखींचे स्कोट अनुभूत झाले आहेत त्यांवरून या गोष्टीस पुष्टि मिळते. आतांपर्यंत फ्लोर्स, कोर्व्हो, ग्राशिओसा व फायल हीं बेटें निसर्गक्षोभाच्या तडाक्यांतून बहुतेक सुटलेलीं आहेत. भूक्षोभाचें केंद्रस्थान बहुतांशीं सेंटमायकेल्स हें असून आश्चर्याची गोष्ट ही कीं त्याच्याच शेजारचे सेंट मेरीच्या बेटास मात्र त्यापासून धक्का बसलेला नाहीं. इ. स. १४४४-४५ सालीं सेंट मायकेल्स येथें एक मोठा स्फोट झाला. परंतु या स्फोटाची जी हकीकत आज उपलब्ध आहे ती बरीच अतिशयोक्तिपूर्ण दिसते. पुढें १५२२ सालच्या उग्र क्षोभांत तर त्या वेळची त्या बेटाची राजधानी व्हिल्ला फ्रांका हें शहर तेथील ६००० रहिवाश्यांसह सबंधचें सबंध पुरलें गेलें. यानंतरहि १६३०, १६५२, १६५६, १७५५, १८५२ वगैरे सालीं येथें भूकंप व ज्वालामुखीस्कोट होऊन गेले व त्यांपैकीं कित्येक उग्र स्वरूपाचेहि होते. कित्येक प्रसंगीं ( उ. १६३८, १७२०, १८११, १८६७ सालीं ) येथें भूगर्भजन्यस्फोटहि झालेले असून त्यांबरोबर बहुतेक एखादें तात्पुरतें बेट समुद्रांतून वर येतें. इ. स. १८११ सालीं जून महिन्यांत असेंच एक बेट सेंट मायकेल्सच्या पश्चिम टोकांपासून दोन मैल अंतरावर समुद्रांतून वर आलें तें साब्रिना नांवानें प्रसिद्ध आहे.

ह वा मा न :- या बेटांचें हवामान समशीतोष्ण असून सावलींतील उष्णमान सामान्यत: जानेवारींत फा. ४८० च्या खालीं व जुलैमध्यें ८२० च्या वर जात नाहीं. हिंवाळ्यांत वारा वायव्य, पश्चिम आणि दक्षिण दिशेनें व उन्हाळ्यांत बहुश: उत्तर ईशान्य व पूर्व दिशेनें वाहतो. येथें मोठमोठीं तुफानें वारंवार होतात.

प्रा णी व व न स्प ती :- पाळीव पशूंशिवाय या बेटांत ससा, उंदीर, पाकोळी वगैरे दुसरे थोडेच सस्तन प्राणी आहेत. पक्षी बरेच असून त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होऊं लागल्यामुळें चाळीस पन्नास वर्षांपूर्वी सेंट मायकेल्स येथें लाखों पक्ष्यांचा संहार करण्यांत आला होता. फायल येथें व्हेल मासे पकडण्याचा धंदा किफायतशीर प्रमाणावर चालतो. येथील वनस्पतींच्या जाती सामान्यत: यूरोपांतल्याप्रमाणेंच आहेत. बहुतेक बेटांत गवत वगैरे विपुल वाढतें; परंतु १९ व्या शतकापर्यंत उंच वृक्षांचें येथें बहुतेक दुर्मिक्षच होतें. नारिंग, लिंबू, डाळिंब व दुसर्‍या कित्येक जातींच्या फळांची लागवड करण्यांत येते. एके काळीं उंसाच्या लागवडीकडे बरेंच लक्ष देण्यांत येत होतें; परंतु आतां ती जवळ जवळ बंद झाली आहे. १६ व्या शतकांत निळीची लागवड प्रथम करण्यांत आली पण तिचीहि अवस्था उंसाप्रमाणेंच झाली आहे.

लो क व स्ती व शा स न प द्ध ति :- या बेटांतील लोक बहुतेक पोर्तुगीजसंभव असून त्यांच्या रक्तांत पूरिश व फ्लेमिश रक्ताचा बराच अंश आहे. बरेचसे नीग्रो, इंग्लिश, स्कॉच व आयरिश लोकहि-विशेषत: फायल व सेंट मायकेल्स बेटांत-येऊन राहिलेले आहेत. राज्यकारभाराच्या सोयीकरतां या द्वीपसमूहाचे तीन जिल्हे केले असून त्यांना त्यांतील मुख्य शहरांवरून पाँटा डेलगाडा ( सेंट मायकेल्सची राजधानी ), आंग्रा ( टर्सेइराची राजधानी ) व होर्टा ( फायलची राजधानी ) अशीं नांवें पडलेलीं आहेत. लिस्बनच्या लोकप्रतिनिधिसभेस पाँटा डेलगाडास चार व इतर दोन जिल्ह्यांस प्रत्येकी दोन दोन प्रतिनिधि  पाठविण्याचा हक्क आहे. लष्कराच्या छावण्या आंग्रा व पाँटा डेलगाडा येथें आहेत. लिस्बनशहर हें सेंट मायकेल्समधील व्हिल्ला फ्रांका डो कांपोशीं व तेथून पायको, फायल, सेंट जॉर्ज व ग्राशिओसा या बेटांशीं तारायंत्रानें जोडलेलें असून शिवाय १९०१ मध्यें फायल व आयर्लंड यांच्या दरम्यानहि तार टाकण्यांत आली आहे. आंग्रा व पाँढा डेलगाडा येथें वातावरणीय वेधशाळा आहेत.

व्या पा र :- या बेटांचा पोर्तुगाल, ग्रेटब्रिटन, जर्मनी, युनायटेड स्टेट्स वगैरे देशांशी व्यापार चालतो. आयात मालांत कापड, कोळसा, साखर, लिहिण्याच्या वस्तू, लोखंडी सामान, रासायनिक द्रव्यें, रंग, तैलें वगैरे वस्तूंचा समावेश होत असून निर्गत होणार्‍या वस्तू म्हटल्या म्हणजे फळफळा-वळ, मद्य व खाद्य पदार्थ या होत. पाँटाडेलगाडा जिल्ह्यांत मातीचीं भांडीं, सुती कापड, मद्यें, गवताच्या टोप्या, व चहा या जिनसा; आंग्रा जिल्ह्यांत तागाचें व लोकरीचें कापड, लोणी, साबू, विटा, कवलें, वगैरे पदार्थ आणि होर्टा जिल्ह्यांत टोपल्या, चटया यांसारख्या वस्तू तयार होतात.

इ ति हा स :- कोर्व्हो येथें बरींच कार्थेजियन नाणीं सांपडतात त्यावरून त्या धाडशी लोकांनीं या बेटांत पाय ठेवला होता असें दिसतें. १२ व्या शतकांतील अरब भूगोलवेत्ता इद्रिसि हा कॅनरी बेटांनंतर पश्चिम महासागरांत जीं दुसरीं नऊ बेटें वर्णितो तीं बहुधा अझोर्सच असावींत. अरबी ग्रंथकारांच्या वर्णनांत या बेटांत दाट वस्ती व साधारण मोठीं शहरें असल्याचा उल्लेख आला असून येथील लोक आपसांतील लढायांमुळें निकृष्टावस्थस पोंचले असल्याचें म्हटलें आहे. तथापि या बेटांचा स्पष्ट उल्लेख इ. स. १३५१ च्या नकाशांत सांपडतों, परंतु त्यांत त्यांचीं नांवें निराळीं आहेत. या बेटांचा मागमूस यूरोपीय राष्ट्रांस प्रथम १४३२ मध्यें लागून पोर्तुगीज व फ्लेमिश लोकांनीं येथें वसाहत करण्यास सुरुवात केली. १५८० पासून १६८० पर्यंत हीं बेटें स्पेनच्या अंमलाखालीं होतीं. १९ व्या शतकाच्या आरंभीं पोर्तुगालच्या गादीसाठीं भांडणार्‍या पक्षांत या बेटांच्या मालकीबद्दल झगडा लागून शेवटीं मेरिआ राणीचा अंमल या बेटांत प्रस्थापित झाला. मेरिआराणीचें वास्तव्य १८३० पासून १८३३ पर्यंत आंग्रा येथें होतें. [ संदर्भ ग्रंथ-डब्ल्यू. एफ. वाकर, अझोर्स; ए. एस. ब्राउन, मदिरा अँड कॅनरी आयलंड्स वुइथ अझोर्स ]