विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजित :- जैन लोकांतील २४ तीर्थकरांतील दुसरा. यास ते लोक दुसरा अर्हत् असें मानितात. अर्थात मूळ अर्हताच्या मागून हा झाला, असें उघड सिद्ध होतें. जैन लोकांनीं उत्सर्पिणी म्हणजे उत्कृष्ट काळ, आणि अवसर्पिणी म्हणजे निकृष्ट काल, असे जे काळाचे दोन भेद मानिले आहेत, त्यांतील दुसर्‍या कालापैकीं दु:खरूप जो सांप्रतचा पांचवा फेरा त्यांतहा जन्मला होता असें त्यांचें मत आहे. तीर्थंकर होण्यापूर्वीचा जन्म वैजयन्त नांवाचें दुसरें अनुत्तर विमान, जन्मनगरी अयोध्या, पिता जितशत्रु, माता विजयसेनादेवी, देहाची उंची ४५० धनुष्य, रंग सुवर्णासारखा, आयुष्य ७२ लाख पूर्व, दीक्षास्थान सप्‍तच्छदवृक्ष (सातवणीचें झाड), निर्वाण आसन खड्गासन ( कायोत्सर्ग ), निर्वाणस्थान सम्मेदशिखर. त्याच्यानंतर ३० लाख कोटिसागर वर्षांनीं शंभवनाथ झाले. ( जैन लोकांचा इतिहास. लेखक- ''अनंततनय ''). अजितकेश-कंबल हा सद्धर्मालंकारांत उल्लेखिलेला महावीरपूर्व तीर्थकर (ज्ञानकोश प्रस्तावनाखंड-४ था विभाग) व अजित एकच आहेत कीं काय याचा शोध केला पाहिजे.