विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्रा - वायव्येकडील प्रांत बन्नु जिल्ह्यांतील एक प्राचीन ठिकाण, उ. अ. ३३० व पू. रे. ७०० ३६'. बन्नु गांवाजवळच हें ठिकाण असून काबूलशहाच्या मुलीचा मुलगा रुस्तुम याचें मुख्य ठिकाण होतें. रुस्तुमची बहीण बन्नु हीस स्त्रीधन म्हणून हा भाग मिळाला होता. तिच्यावरुनच या भागास बन्नु हें नांव मिळालें आहे. ग्रीक आणि पश्चिम आशियांतील तर्हेने जडावाचें काम केलेली माणकें येथें सांपडलीं आहेत.
अक्रा - (आफ्रिकन) आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावर गिनी आखाताजवळ ''गोल्ड कोस्ट'' नांवाची ब्रिटिश वसाहत आहे. त्यांत अक्रा हें मुख्य शहर व बंदर आहे. त्यांतील लोकसंख्या १० हजार त्यांपैकीं १५० यूरोपियन आहे. हें गांव सेंटजेम्स, केव्हेकुर व ख्रिश्चबर्ग या तीन किल्ल्यांभोवतीं बसलेलें आहे. ह्या किल्ल्यांपैकीं दुसरा व तिसरा अनुक्रमें डच व ड्यानिश लोकांच्या ताब्यांत होता. पण ते किल्ले इंग्रजांस मिळाले. येथें कोकोचे मळे आहेत.