विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंगपाल :- (१) महंमद गिझनीनें ज्याचा अनेकदां पराभव केला तो लाहोरचा राजा. महंमदानें हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली तेव्हां (१००१ ) याचा बाप जयपाळ यानें प्रथम त्याला तोंड दिले; पण या लढाईंत जयपाळाचा पराभव झाला, व त्याला बरीच खंडणी देऊन आपली सुटका करून घ्यावी लागली. या नामुष्कीबद्दल जयपाळाला बरीच लाज वाटून त्यानें अग्निकाष्टें भक्षण केलीं. त्याचा मुलगा अनंगपाळ हा कांहीं दिवस महंमदाशीं सलोख्यानें वागला, व तो त्याला निमूटपणें दरसाल खंडणी पाठवीत गेला. पण पुढें महंमदाचा मुलतानचा सुभेदार अबदुल फत्ते लोदी याला आपल्या बाजूला वळवून तो महंमदाला विचारीनासा झाला. तेव्हां महंमदानें इ. स. १००५ ते पंजाबवर स्वारी करून अनंगपाळास काश्मीरकडे पळवून लाविलें. पण महंमद परत गेल्यावर अनंगपाळानें, उज्जन, ग्वाल्हेर, कनोज, दिल्ली, अजमीर इत्यादि ठिकाणच्या राजांचा एक संघ स्थापून महंमदाला पार हांकून लावण्याची जंगी तयारी केली. पेशावरच्या मैदानांत चाळीस दिवसपर्यंत दोन्ही पक्षांकडील सैन्यें एकमेकांकडे पहात तटस्थ उभीं होतीं. पुढें प्रत्यक्ष लढाईला सुरुवात होऊन बराच वेळपर्यंत हिंदूंनीं मुसुलमानांवर मात करून त्यांनां जेरीस आणिलें होतें. हिंदूंचा विजय होणार हें निश्चित झाल्यासारखें होतें. पण इतक्यांत एक दुर्दैवाचा प्रसंग ओढवला व विजयश्री परतून गेली. अनंगपालचा हत्ती तीर लागून घायाळ झाला व घाबरून पळत सुटला. तेव्हां हिंदु सैन्याचा धीर तुटून तेंहि मागें सरू लागलें, व अशा रीतीनें महंमदाचा जय होऊन, हिंदूंचें नष्टचर्य ओढवलें. १०२१-२३ त महंमदानें लाहोरप्रांत खालसा केला. अनंगपाळ कधीं वारला याचा उलघडा होत नाहीं. एके ठिकाणीं तो १०१३ च्या सुमारास निवर्तल्याचें लिहिलें आहे, तर दुसर्‍या एका इतिहासांत महंमदानें लाहोरप्रांत खालसा केला त्या वेळीं ( १०२१-२३ ) तो जिवंत असल्याचें दृष्टीस पडतें.

अनंगपालाचें पुष्कळ ठिकाणीं '' आनंदपाळ '' असें दुसरें एक नांव सांपडतें. हें दुसरें नांव बरोबर आहे असें वाटतें. लल्ली यानें स्थापन केलेल्या काबूलच्या ब्राह्मणी राज्याच्या घराण्यांत ( काळ ८८०-१०२१ ) जयपाळ, नंतर अनंगपाळ, नंतर त्रिलोचनपाल असे शेवटचे तिघे राजे होऊन गेले व १०२१ त महंमदानें तें घराणें बुडविलें असा उल्लेख सांपडतो व या राजांचा कालहि वरील जयपाळ, अनंगपाळ यांच्या कालांशीं जुळतो ( मध्ययुगीन भारत भाग २ रा. प्र. ११ वें. ) तेव्हां अनंगपाळ किंवा आनंदपाळ या काबूलच्या ब्राह्मणी घराण्यांतील असला पाहिजे हें उघड झालें.

(२) - दिल्लीच्या तोमर वंशांतील या नांवाचे राजे. तुंवर किंवा तोमर घराण्याचा संस्थापक अनंगपाळ हा असून त्याचा राज्याभिषेक शक इ. स. ७३६ हा आहे. ह्यानें प्रथम दिल्लीस गादी  स्थापिली. पण त्याच्या वंशजांनीं ती तेथून हलवून कनोजला नेली. तेथून त्यांना राठोडांचा मूळपुरुष चंद्रदेव यानें हांकून दिल्यावर, दुसरा अनंगपाळ दिल्लीस आला व त्यानें दिल्ली आपली राजधानी केली. अनंगपाळानें दिल्लीस राज्य केल्याचा सन तेथें असलेल्या प्रख्यात लोहस्तंभावर '' संवत् दिहली ११०९ अनंगपाळ बही '' अशा अक्षरांत दिलेला आहे; यावरून इ. स. १०५२ मध्यें अनंगपाळ दिल्लीस राज्य करीत होता हें उघड दिसतें. पुढल्या शतकांत तोमर घराण्याचा शेवटचा राजा तिसरा अनंगपाळ याजपासून अजमीरच्या विशाळदेव चव्हाणानें दिल्ली जिंकून घेतली व त्याला दुसरें लहानसें राज्य देऊन आपला मांडलिक केलें. चव्हाण व तोमर यांचा शरीरसंबंध होऊन पृथ्वीराज जन्मास आला; व तो पुढें दिल्लीचा अधिपति झाला.