विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अटक :- (नदी) अटक हा शब्द नेहमींच्या बोलण्यांत अटक या गांवास न लावतां सिंधुनदाच्या उत्तर भागासच लावतात. अटक हें नांव अकबरानें नदीच्या दुस्तरतेमुळें दिलें असलें तर पुढें तें लोकसमजुतींत हिंदुस्थानची सरहद्द बनलें, आणि ज्या प्रदेशापलीकडे हिंदूनें जाऊं नये गेल्यास प्रायश्चित्त पडेल अशी सीमा असें झालें. अटक म्हणजे जी पलीकडे हिंदूस जाण्यास धर्मशास्त्रीय अटक आहे अशी नदी असा अर्थ बनला. अटक ही हिंदुस्थानची सीमा ही गोष्ट यानंतर स्थापित झाली असें मात्र नाहीं. कां कीं सिंधूपलीकडे हिंदुस्थान ही परकीयांची समजूत ''हप्तहिंदव:'' चा उल्लेख करणार्या अवेस्ती काळापासून आणि ज्या काळांत इंडिया हें नांव ग्रीकांत वापरलें गेलें त्या काळापासून आहे. ज्याप्रमाणें हिंदुस्थानची ही धर्मशास्त्रीय सरहद्द लोकांत मानली गेली. त्याप्रमाणें हिंदु राज्यकर्त्यांच्या राजकीय विचारांची व कार्यकर्तृत्वाची मर्यादा होती असें म्हटलें तरी चालेल. जानेवारी १७६० मध्यें, बाळाजी बाजीराव हा गंगाधर यशवंत यास पत्र लिहितो कीं तुम्हीं सर्वांनीं (दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदेवगैरे ) एकचित्तेंकरून मेहनत करून अबदालीचें पारिपत्य करून अटकपार करावा ( राजवाडे खं. १. १५६, २४५ ) खैबर घाटापलीकडे क्वेटा वगैरे ठिकाणीं जाऊन शत्रूस अडविण्याची कल्पना मराठी राज्यकर्त्यांस नसावी. तसेंच ज्याप्रमाणें हिंदुस्थानभर या अर्थानें '' आसेतुहिमाचल '' असा शब्द वापरण्यांत येई त्याप्रमाणेंच '' अटकेपासून रामेश्वरापर्यंत '' असे शब्दहि वापरण्यांत येत. शके १६७४ कार्तिकमध्यें बाळाजी बाजीराव पिलाजी जाधवरावास लिहितो कीं नबाब व मराठे एक असा लौकिक अटकेपासून रामेश्वरापर्यंत आहे. (राजवाडे खंड ६, २७१, ३५७ )