विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अक्कण्णा — कुतुबशाहींतील एक सुप्रसिद्ध ब्राह्मण मुत्सद्दी. याचें मूळनांव अकरस असून याच्या बापाचें नांव भानजी व उपनांव पिंगळी होतें.  रियासतकार याचें मूळनांव एकनाथपंथ असें देतात.  याचा जन्म विपन्नावस्थेंत असलेल्या अशा एका आश्वलायन शाखेच्या देशस्थ, ॠग्वदी, भारद्वाजगोत्री ब्राह्मण कुलांत झाला होता.  इ.स. १६६६ मध्यें हा व याचा भाऊ मादण्णा उर्फ मदनपंत यांनीं सय्यद मुस्ताफा नामक एका गोवळकोंड्याच्या सरदाराच्या पदरीं शराफ म्हणून नोकरी धरली.  पुढें इ.स. १६७३ च्या सुमारास मदनपंत उर्फ मादण्णा कुतुबशहाचा कारभारी झाला तेव्हां महंमद इब्राहिम यास सर-इ-लष्कराच्या जागेवरुन काढून त्याच्या जागीं अक्कणाची नेमणूक करण्यांत आली.  इ.स. १६७६ त शिवाजीनें मोंगल व विजापुरकर यांच्या विरुद्ध गोवळकोंड्याच्या दरबाराशीं जो तह केला त्यांत अक्कण्णास विजापुरच्या कारभार्‍याची जागा मिळवून देण्याची लालूच दाखविलेली होती असें ग्रांट डफ म्हणतो.  इ.स. १६८६ च्या मार्च महिन्यांत याचा व त्याचा भाऊ मदनपंत याचा गोवळकोंड्याच्या चिडलेल्या मुसलमान सरदारांकडून खून होऊन याचें मस्तक हत्तीच्या पायीं देण्यांत आलें.  (मादण्णा पहा. ) हा मोठा धूर्त व कावेबाज होता पण याच्या अंगी याचा भाऊ मदनपंत याच्याप्रमाणें बुद्धिमत्ता नव्हती असें याचें डी. हावर्ट नामक एका समकालीन डच लेखकानें वर्णन केलें आहे.  अक्कण्णा व मादण्णा हे बंधू वैष्णव सांप्रदायी असून त्यांचे वंशज वारगळनजीक हनमकोंडा येथें व आसपास देशमुखी वृत्तीवर उपजिविका करतात.  निजामसरकारच्या हद्दींत भानजीपेठ म्हणून गांव आहे त्याचा या बंधुद्वयाच्या वडिलांच्या नांवांशी संबंध दिसतो.

(संदर्भग्रंथ - जदुनाथ सरकारचा अवरंगजेबाचा इतिहास, पुस्तक ४ थें; ग्रांट डफ, पुस्तक १ लें; भारत इतिहास संशोधक मंडळ, वार्षिक इतिवृत्त शके १८३८ )