विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अत्यग्निष्टोम – सप्त सोमसंस्थापैकीं एक याग. अग्निष्टोम याग झाल्यानंतर हा याग करावयाचा असतो. त्यांतील सर्व कर्म अग्नि-ष्टोमाप्रमाणेंच करावयाचें असतें. यांतील विशेष हा कीं, अग्नि-ष्टोमामध्यें सुत्येच्या ( शेवटच्या ) दिवशीं बारा शस्त्रांचें शंसन व बारा स्तोत्रांचें गान होतें व अत्यग्निष्टोमांत ही संख्या तेरा असते. अलीकडील काळांत या सप्त सोमसंस्था ( याग ) वेगवेगळाल्या कोणी करीत नाही. अग्निष्टोमानंतर शेवटची सोमसंस्था जो सर्वपृष्ठनामक याग तोच करतात व त्यामध्यें मधील अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, वाजपेय यांचा समावेश केला जातो. याचा उल्लेख संहिता ग्रंथांत आढळत नाहीं.