विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकोला तालुका -  जिल्हा अकोला. उ.अ. २० ५३' ते २०० २३' व पू.रे. ७७ २५' ते ७६ ५४'. उत्तर दक्षिण लांबी सुमारें ३० मैल.  पूर्व पश्चिम रूंदी सुमारें २५ मैल.  क्षेत्रफळ ७३९ चौरस मैल.  यांत ३३९ खालसा आणि १९ जहागिरीचीं गांवें मिळून एकंदर ३५८ गांवें आहेत.  पश्चिमेस बाळापूर तालुका, उत्तरेस पूर्णा नदी व पलीकडे अकोट आणि दर्यापूर तालुके; पूर्वेस मूर्तिजापूर तालुका;  दक्षिणेस मंगरुळ आणि बाशिम तालुके.  या प्रमाणे चतुःसीमा असून हा तालुका जिल्ह्याच्या मध्यभागी आहे.  तालुक्यांतील जमीन सुपीक सपाट प्रदेश आहे.  फक्त दक्षिणेकडे थोडीशी डोंगराळ आहे.  या तालुक्यांतील नद्यानाले दक्षिणकडून उत्तरेकडे वाहतात.  यां तालुक्यात सरासरी दर गांवास ११ या प्रमाणें विहिरींचें प्रमाण आहे.  तरी देखील या तालुक्यांत, मुख्यत्वेंकरुन ज्या भागांत खारें पाणी लागतें त्या भागांत, पाण्याची टंचाई भासते.  जी. आय.पी. रेलवेची भुसावळ नागपूर लाइन या तालुक्यांतून जात असून, तिची या तालुक्यांत अकोला, या वलखेड, बोरगांव आणि काटेपूर्णा हीं स्टेशने आहेत.  या तालुक्यांत आठवड्याचे बाजार १४ ठिकाणीं भरतात.