विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्नि - (देवता ) मानववंशाच्या प्रगतींतील अगदीं पहिली महत्त्वाची पायरी म्हटली म्हणजे अग्नीची उत्पत्ति करण्याचा शोध ही होय. हा शोध अत्यंत प्राचीन कालीं म्हणजे ४०८००० वर्षांपूर्वीच्या दुसर्या हिमांतर युगांत (Second Inter Glacial Epoch) लागला असावा असें तज्ज्ञानीं निर्णीत केलें आहे. ह्या अग्नीभोंवतीं जमलेल्या अनेक मानववंशांतील दंतकथात्मक वाङ्मयावरुनही ह्या शोधाची प्राचीनता दिसून येते. जगांतील अत्यंत प्राचीन वाङ्मय जे वेदग्रंथ त्यामधील अग्नीच्या संबंधीं अनेक कल्पना, व दंतकथा ह्यांचा विचार विभग २ दैवतेतिहास या प्रकरणांत झालाच आहे.
एकंदर सर्व संस्कृतीमध्यें अग्निदेवतेची उत्पत्ति इतर सर्व देवतांपेक्षां कांहीं विशेष तर्हेनें झालेली दिसते. वास्तविक दृष्टीनें एकंदर जगांतील धर्मांचा इतिहास पाहतां खरी अग्निदेवता अशी वैदिक हिंदुधर्म व झरदुष्ट्राचा धर्म ह्या दोन धर्मामध्येंच दिसून येते. मानवी कल्पना, अग्नीची उत्पत्ति, सूर्य, कांगरुसारखा एखादा प्राणि, ओक वृक्ष किंवा असल्याच दुसर्या कांही निसर्गांतील वस्तु, यांजपासून झाल्याचें मान्य करतें. त्याचप्रमाणें अग्न्युत्पत्तीची युक्ति मानवजातीस उकलून देणारी व्यक्ति ही अग्निदेवता नसून ती अथर्व्यासारखा संस्कृतीचा प्रणेता असतो. तो दैवी गुणांनी नंतर युक्त होता, प्रॉमिथिअसची गोष्ट अशीच आहे.
अ ग्नि ( भारतीय ) - अग्नि हा शब्द इंडोयूरोपीय असला तरी त्याची अग्नि या नांवानें ख्याति व उपासना फक्त भारतीयांतच आहे. अग्नीचें वैदिक स्वरुप ''वेदविद्या '' ( ज्ञानकोश – प्रस्तावना खंड, पा. २९० – ३०१ ) विभगांत सविस्तर वर्णिलें आहे. पौराणिक काळीं अग्नीभोवतीं इतर देवतांप्रमाणेंच बर्याचशा कथा उपकथा गुंडाळल्या जाऊन त्याला पूर्ण सगुण स्वरुप प्राप्त झालें. वन्हि, अनल, पावक, वैश्वानर, अब्जहस्त, धूमकेतु, हुतभुज, क्रचि, रोहिताश्व, च्छागरथ, जातवेद, सप्तजिव्हा, तोमरधर वगैरें नांवें अग्नीचीं वैशिष्ट्यें सांगतात. अंगिरसपुत्र, पितरांचा राजा, मरुत्, शंडिलाचा नातू, तामसमन्वंतरांतल्या सप्तॠषींपैकीं एक तारा अशा भूमिका अग्नीला पुराणांस दिलेल्या आढळतात. त्याचें ध्यान निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळें दिसून येतें. सात हात, चार शिंगें, सात जिभा, दोन डोकीं, तीन पाय, इत्यादि वैश्वदेव मंत्रांतील अग्नीचें ध्यान हरिवंशांत नाहीं तर त्या ठिकाणीं चार हात असलेला, मेषावर बसलेला किंवा सात वार्यांचीं चाके असणार्या रथांत बसलेला, डोक्यावर धुराचा किरीट धारण केलेला अग्नि दाखविला आहे. असो. अग्नीचा पौराणिक इतिहास थोडक्यांत येणेंप्रमाणे :-
स्वायंभुव मन्वंतरांत ब्रह्ममानसपुत्र दक्षप्रजापति होता. त्याच्या सोळा कन्यांतील जी स्वाहा नांवाची होती ती याची स्त्री होती, आणि तिजपासून यास 'स्वारोचिष ' नांवाचा पुत्र व सुच्छाया नांवाची कन्या झाली होती.
त्यांतून कन्या उत्तानपादपुत्र जो ध्रुव त्याच्या शिष्ट नांवाच्या पुत्रास दिली असून त्याचा पुत्र 'स्वारोचिष' हा दुसरा मनु झाला.
याशिवाय पावक पवमान् व शुचि असे याचे तीन पुत्र असून, त्यांपासून ४५ अग्निदेवता कार्याच्या भिन्नतेमुळें भिन्न नामांनी प्रसिद्ध आहेत.
चालू (वैवस्वत) मन्वंतरांत वरुणानें ब्रह्मदेवास ॠत्विज करुन यज्ञ केला असतां त्यांत तीन ॠषि निर्माण झाले. त्यांतून भृगुॠषीस वरुणानें, कविॠषीस ब्रह्मदेवानें पुत्रत्वें करुन ग्रहण केलें. त्याचप्रमाणें अग्नीनें गिराॠषीस पुत्रत्वानें ग्रहण केलें होतें. अग्नीस ब्रह्मदेवानें कल्पारंभी, पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांमधील दिशेचें स्वामित्व दिलें होतें. म्हणून याच्यासंबंधानें त्या दिशेस आग्नेयी हें नांव मिळालें.
पूर्वी श्वेतकी राजानें अपरिमित यज्ञ केले, त्यांतील हविभक्षणामुळें यास जाड्य होऊन त्याचा निराशोपाय विचारण्यास हा ब्रह्मदेवाकडे गेला. त्या काळीं द्वापारयुग संपत आलें होतें. तें जाणून ब्रह्मदेवानें त्यास सांगितलें कीं, प्रस्तुत भूमीवर कृष्णार्जुन अवतरले आहेत. त्यांकडे तूं जाऊन खांडव नांवाचें वन भक्षणार्थ माग, तें तूं भक्षिल्यानें झालेल्या व्याधीपासून त्वरित मुक्त होशील. त्यावरुन ब्राह्मणवेषानें कृष्णार्जुनाकडे तें वन भक्षणार्थ मागितलें. त्या काली उभयतांनीं 'तथास्तु' म्हणून सांगितलें कीं, आम्हांपाशीं रथादि साहित्याची न्यूनता आहे, त्यावरुन अग्नीनें वरुणाजवळून कपिलध्वजयुक्त एक दिव्य रथ, व ' गांडीव ' या नांवाचें धनुष्य मागून आणून अर्जुनास, आणि वज्रनाथ नांवाचें चक्र व 'कौमोदकि ' नांवाची गदा कृष्णास दिली. तेणेंकरुन उभयतांहि संतुष्ट होऊन त्यांनी यास वनांत प्रवेश करुन तें भक्षिण्यास आज्ञा केली. तें वन अग्नि यथेच्छ भक्षण करूं लागला आहे हें इंद्रास कळतांच इंद्र निवारण करण्यास धांवून आला; तथापि कृष्णार्जुनांनीं त्याचा पराभव करुन त्यास परत लावलें. पंधरा दिवस खांडव यथेच्छ भक्षून अग्नि जाड्यापासून मुक्त झाला.
२ हि ब्रु ध र्मां तील अ ग्नि पू जा - अग्नि किंवा यज्ञकर्म यांचे उल्लेख 'हिब्रु ' धर्मग्रथांत फारच कमी प्रमाणांत आढळून येतात. या ग्रंथांत अग्न्युत्पतीची अशी आख्याइका आहे कीं जेहोवानें आदम् व ईव्ह ह्या मानवजातीच्या मूळ स्त्री पुरुषास अग्न्युत्पत्तीची पद्धतिं विवरण केली. ज्या वेळीं आदम हा पहिल्या अंधःकारांत गुरफटून गेला, त्यावेळीं ईश्वराच्या पवित्रमूर्तीनें त्याला अग्नि उत्पन्न करण्याकरितां दोन विटा दिल्या. अशा रीतीनें हिब्रु ग्रंथांत अग्नीची उत्पत्ति ईश्वरापासून झाल्याचें सांगितलें आहे.
३. झोरोआस्ट्रियन धर्मांतील अग्निपूजा - इराणी व भारतीय धर्मांतील अग्निपूजेमध्यें मुख्य दोन भेद दिसून येतात ते :- (१) इराणी धर्मांत प्रेतसंस्कारास पवित्र अग्नीचा निरुपयोग ; व (२) भारतीय 'अग्नि ' देवतेच्या मानानें इराणी ' आतर ' देवतेचें अपूर्ण काल्पनिक स्वरुप; कांहीं तज्ज्ञ लोकांचें तर असें मत आहे कीं, 'अग्नी ' ला इराणी धर्मांत देवतास्वरुप मुळींच आलें नाहीं. याशिवाय दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं भारतीयांतील अग्निपूजेचा र्हास होतां ती एका विशिष्ट ब्राह्मण वर्गाच्याच हातीं आली, परंतु सांप्रतचा प्रत्येक पारशी मनुष्य अत्यंत प्राचीन पद्धत्यनुसार अग्निपूजा करतो.
आतरो ( अग्नि ) हें दिव्य प्रकाशाचें पार्थिव स्वरुप आहे. अग्नि हा 'अहुरमझ्द' याचा पुत्र असून त्याच्यापासून झरदुष्ट्र जन्मला. अग्नि पांच प्रकारचा आहे. अहिर्मन् यानें अंधःकार व धूर अग्नीशीं मिश्रित केला. 'आतर' यानें 'आंग्र मैन्यू ' याशीं युद्ध करण्यांत 'आहुर' यास सहाय्य केलें. ह्या किंवा अशाच प्रकारच्या अनेक आख्याइका अवेस्ता व पल्हवी ग्रंथांत सांगितल्या आहेत. अग्नीचे संरक्षक यासच ह्या पंथांत धर्मगुरु समजतात. हे संरक्षक अग्नीस कधींही विझूं देत नाहींत. अग्नीमध्यें प्रेत जाळणें, शेण वर्गरेसारखे वाईट पदार्थ टाकणें यासारख्या कृत्यास देहांत शासन सांगितलें आहे. पारशी धर्मांतील उपासना व प्रातःकालीन प्रार्थनाप्रद्धति, प्राचीन वैदिक पद्धतीशीं सदृश आहे, परंतु या प्रार्थनेचें सर्व साधारण स्वरुप अव्यक्तोपासनापर आहे. पारशांत मोठे यज्ञ करण्याची पद्धती आहेच. तिचें वर्णन इतरत्र दिलें आहे.