विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अणिमांडव्य - मांडव्य ऋषीचें नामांतर. -पूर्वी मांडव्य या नांवाचा महानिश्चयी व सर्वधर्मज्ञ असा एक ऋषि होता. त्यानें पुष्कळ कालपर्यंत निष्कामबुध्दीनें तपश्चर्या केली. एके दिवशीं दुसरीकडे चोरी करून मिळविलेलें धन घेऊन आश्रमांत लपण्यासाठी चोर आले. शिपायांस कांहीं संशय येऊन त्यांनीं त्या आश्रमांत शिरून चोहोंकडे पाहिलें तो त्यांस तेथें लपलेले चोर व लपविलेले धन हीं दोन्ही सांपडलीं. तेव्हां ऋषीची शंका येऊन राजानें त्या चोरांसह ऋषीस सुळावर चढविलें. प्राणांचें संयमन करून त्यानें तेथे वेदपठनपूर्वक तपश्चर्या करण्यास आरंभ केला. इतर ऋषी मांडव्य ऋषीची स्थिति अंतज्ञानानें पाहून अतिदु:खित होत्साते पक्ष्याचें रूप घेऊन ऋषीजवळ आले व राजाच्या अनुमतानें ऋषीस दिलेली शिक्षा फिरविली. पोटांत शिरलेला शूल काढावयास लागले तों तो कांहीं निघेना. तेव्हां तो मूळाशीं तोडला पण आंत जें शूलाग्र अडकलें होतें तें तसेंच राहिलें म्हणून याचें नांव अणि मांडव्य प्रकट झालें. ही शिक्षा ऋषीनीं लहानपणीं गमती खातर एका पतंगाच्या पुच्छाला काडी टोंचली म्हणून यमधर्मानें फर्माविली. अल्प अपराधाबद्दल असह्य पीडा होईल असा दंड व्यर्थ केल्यामुळें धर्मास शूद्र वर्णांत जन्म प्राप्त होईल असा ऋषीनीं शाप दिला. व चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असूं नये असा नियम बांधून दिला. [ म. भा. आदिपर्व १०७-८ ]