विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अक्रुर - आयुपुत्र नहुषराजा याच्या यदुनामक पौत्राच्या कुलांतील सात्वत वंशांतील, (हरिवंश पुराणाप्रमाणें १.३४) क्रोष्टूचा वंशज जो वृष्णि त्याचा पौत्र अक्रुर होय.  याच्या बापाचें नांव श्वफल्क असें असल्यामुळें याला श्वफल्कि असेंहि म्हटलें आहे.  याच्या रत्‍ना, उग्रसेना, अश्विनी इत्यादि स्त्रिया होत्या.  याला उग्रसेनेपासून सुदेव व उपदेव असे दोन पुत्र झाले.  हा वसुदेव व कृष्ण यांच्या समकालीन होता.  यानें आपली एक कुमारी या नांवाची बहीण वसुदेवास दिली होती. कंसानें रामकृष्णांना मथुरेस आणण्यासाठीं यालाच गोकुलांत पाठविले होतें. याचा स्यमंतक मण्याशीं फार संबंध येतो.

सूर्योपासना करणार्‍या सत्राजिताला हा स्यमंतक मणि सूर्यानें बक्षिस दिला होता.  सत्राजितानें तो आपल्या भावास दिला.  त्याजवळ स्यमंतकाबद्दल कृष्णानें याचना केली होती.  परंतु तो त्याला (कृष्णाला ) मिळाला नाहीं.  अक्रूरासहि तो मणि पहिजे होता.  त्यानें भोजाधिपतिशतधन्व्याकडून सत्राजितास मारिलें व स्यमंतक मणि मिळविला.  शतधन्व्यानें सत्राजितास मारल्याची हकीकत कृष्णास समजतांच तो शतधन्व्यावर चालून गेला.  शतधन्व्यानें मदतीसाठीं अक्रूराची वाट पाहिली.  परंतु कृष्णाशीं प्रत्यक्ष विरोध होईल म्हणून अक्रुर शतधन्व्याच्या मदतीस आला नाहीं.  शेवटीं कृष्णानें शतधन्व्याला मारिलें.  परंतु स्यमंतक मणि यानें अक्रुरास दिला असून अक्रुरानेंच शतधन्व्याकडून सत्राजिताचा वध करविला ही गोष्ट कृष्णाला समजली व अक्रुर द्वारकेंतून निघून गेल्याचेंहि समजले.  परंतु आपल्या ज्ञातीमध्यें भेद वाढेल म्हणून कृष्णानें त्याची उपेक्षा करुन त्याला परत द्वारकेंत बोलावून आणिलें.