विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अका ( टेंकड्या ) - पूर्व बंगाल आणि आसाम.  दरंग जिल्ह्याच्या उत्तरेकडील हिमालय पर्वताचा एक भाग.  या भागांत जंगल फार आहे.  येथें रानटी लोकांची वस्ती असल्यामुळें या भागाचा फारसा शोध लागला नाही.  अका नांवाच्या जातीचे दोन भाग आहेत.  १ हजारी खोआ व २ कपास चोर. आसामच्या राजांच्या कारकीर्दीत हे रयतेला फार त्रास देत असत.  अजून देखींल ते रयतेस थोडा फार त्रास देतातच.  हे तिबेटोब्रम्ही रक्ताचे असून लढवय्ये व स्वतंत्र वृत्तीचे आहेत.  त्यांच्या राहण्याची जागा अति सुरक्षित असल्यामुळें त्यांस ब्रिटिश रयतेस त्रास देण्यास फावतें.  यांच्यावर स्वारी करण्याचा जो खर्च येईल व त्यामुळे जो रयतेचा फायदा होईल त्यांत फार अंतर असल्यामुंळे त्यांच्यावर ब्रिटिश सरकार स्वारी करीत नाही.