विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजगर - हा प्रचंड सर्प अमरिकेंतील न्यू गिनी वगैरे उष्ण देशांत, हिंदूस्थानांत, हिंदी बेटांत व आफ्रिकेंत दलदलीच्या जागीं आढळतो. अजगराच्या सुमारें चाळीस जाती असून त्यांपैकीं बहुतेक अमेरिकेंत आहेत. मेक्सीकोपासून ब्रेझिल पर्यंतच्या प्रदेशांत एक जात आहे, तिचा रंग फिका तपकिरी असून त्यावर सुमारें १५।१८ पट्टे असतात. बहुतेक जातीच्या अजगरांचा स्वभाव अगदीं सौम्य असतो व ते माणसाळतात.

अजगराला स्वत:पेक्षा मोठे असलेले प्राणी गिळतां येतील इतका त्याला जबडा उघडतां येतो. अजगर ३० फूट देखील लांब असतो अशी विश्वसनीय माहिती मिळते. कित्येक वेळां साठ फूटांपर्यंत लांबीचे अजगर असल्याचें ऐकण्यांत येतें. प्राचीन रोम शहरच्या भरभराटीच्या काळांत लिहून ठेविलेल्या वर्णनांत १२० फूट लांबीचा अजगर बॅग्राडासच्या किनार्‍यावर होता असें आढळतें. हा अजगर मारण्याकरितां रेग्युसलच्या सैनिकांनीं सर्व प्रकारचीं हत्यारें चालवून पाहिलीं, पण एकाचाहि उपयोग झाला नाहीं. त्या अजगरानें शिपायांच्या टोळ्यांच्या टोळ्या घशाखालीं घातल्या, व अखेर मोठालीं किल्ल्यावर मारा करण्याचीं यंत्रें त्याच्यावर चालविलीं तेव्हां तो मरण पावला. ही अजगराची गोष्ट सर्वस्वी बनावट नसली तरी लांबीसंबंधी त्यांत बरीच अतिशयोक्ति असली पाहिजे यांत शंका नाहीं.

अजगर सबंध बोकड, किंवा डुक्कर किंवा माणूस गिळून खातात हें खरें आहे. १८६१ सालीं जार्डिन डिस प्लँटेस मध्यें एक अजगरानें पांघरण्याचें एक ब्लँकेट गिळून खाल्लें, पण तें पचून जाणें शक्य नसल्यामुळें चार आठवडे पोटांत राहून अखेर परत तोंडावाटे बाहेर पडलें व नंतर लवकर तें अजगर मरण पावलें.

अजगर या जातीच्या सर्पाचा उल्लेख वैदिक वाङ्‌मयांत, विशेषत: अथर्ववेदांत आहे. अश्वमेध यज्ञांत बळी द्यावयाच्या जनावरांच्या यादींत अजगर प्राणी आहे. पुराणांत अजगरासंबधाचा विशेष उल्लेख नलराजाच्या कथेंत येतो. निद्रित स्थितींत दमयंतीला नल सोडून गेल्यावर ती अरण्यांत नळाचा शोघ करीत हिंडत असतां एका धिप्पाड अजगरानें तिंला पकडलें व गिळण्यास सुरवात केली. तेव्हां ती मोठ्यानें आक्रोश करूं लागली. तो ऐकून व्याध धांवत आला व त्यानें तीक्ष्ण धारेच्या शस्त्रानें अजगराचें तोंड फाडलें व दमयंतील मुक्त केलें. अशा उल्लेखावरून फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत अजगरांचा त्रास असल्याचें दिसतें.