विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अद्रिका - यमुना नदींत अद्रिका नांवाची अप्सरा ब्रह्म शापानें मत्स्यी होऊन पडली होती. तिनें श्येनाच्या पायांतून पडलेंला वसुराजाच्या रेतानें पूर्ण असा द्रोण घेऊन त्यांतील वीर्य भक्षिलें. पुढें त्या मत्स्यीला दहाव्या महिन्यांत धीवरांनीं धरून फाडिले. तेव्हां तिच्या उदरांतून एक मुलगा व मुलगी अशी दोन मुलें बाहेर आलीं. त्यांनीं तीं बालकें उपरिचर राजाच्या पुढें ठेविलीं. मुलाचें नांव मत्स्य व मुलीचे नांव सत्यवती अथवा मत्स्यगंधा असें ठेवून मुलगी एका विकाला अर्पण केली. इकडे ती अद्रिकामत्स्यी दोन मानवांस जन्म दिल्याबरोबर तूं मुक्त होशील या उश्शापाच्या आधारानें मुक्त होऊन स्वर्गधामाला गेली (महा. आदि. ६३).