विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनंतमूळ :- नांवें :- अनंत मूळ ( अनंत वेल ),सुगंधि पाला, सारिवा ( संस्कृत ), मग्रबु, उपळसरि, नन्नरि इत्यादि नांवें या वनस्पतीस आहेत. उत्तर हिंदुस्थानांत बंगाल प्रांतांत व दक्षिणेंत त्रावणकोर ते सिलोनपर्यंतच्या सर्व प्रदेशांत अनंतवेल सापडतो.
इंग्रजी सार्सापरिल्याचे तोडीचा रक्त शुद्ध करण्याचा गुण या वनस्पतींत असल्यामुळें तिचा एतद्देशीय औषधांत उपयोग करतात; बहुधा काढा किंवा पाकाच्या रूपांत अनंतमूळ देतात, सूज कमी करण्यास, प्रकृति स्वास्थ्याकरितां व मूत्ररेचक म्हणून याचा उपयोग होतो. अग्निमांद्य, ज्वर, रक्तदोष, उपदंशादि विकारावरहि अनंतमूळ देतात. कधीं कधीं सबंध वेलीची पूड करून तांदुळाच्या कण्हेरींत घालतात अगर वाळलेल्या पानांचा काढा करतात. बाजारांत अनंतमुळाच्या लहान लहान जुडया मिळतात त्यांत एका अथवा अधिक झाडांच्या
मुळया बांधलेल्या असतात. अनंतमुळाच्या एक शेरास १२ आण अगर रुपया पडतो. यूरोपमध्यें अनंतमुळाच्या एका पौंडाला १॥ अथवा दोन शिलींग पडतात.- [ वॅट; पदे; Ayurvedic system of Medicine by N.N.Sen Gupta Vot. III. ]