विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडावद - मुंबई पूर्वखानदेश. चोपडयाच्या पूर्वेस १२ मैलांवर सुमारें पांच हजार लोकवस्तींचें गांव. पूर्वी हें महत्त्वाचें ठिकाण असून महालाचें ठाणें होतें. गांवामध्यें गढी होती तिची माती लोक नेतात व पूर्वीच्या कचेरीमध्यें हल्लीं शाळा भरते. येथें लालबागेमध्यें एक बांधलेली पायऱ्यांची जुनी विहीर आहे. ही एका शामदास गुजराथ्यानें बांधली. या खेरीज एक १०८९ हिजरी ( इ. स. १६७८ ) मध्यें बांधलेली मशीद असून तीवर फारसी लेख आहे. याच्या वायव्येस तीन मैलांवर उनबदेव नांवाचे उन्हाळें आहे. ( मुं. गें. )